
आरोग्यदायी आहारशैलीमध्ये अनेकदा आहारतज्ज्ञ तेलकट पदार्थांऐवजी उकडलेल्या पदार्थांचा पर्याय सुचवतात.
किचन गॅजेट्स : स्टेनलेस स्टील फोल्डेबल स्टीमर
आरोग्यदायी आहारशैलीमध्ये अनेकदा आहारतज्ज्ञ तेलकट पदार्थांऐवजी उकडलेल्या पदार्थांचा पर्याय सुचवतात. अशा वेळी भाज्या, अंडी, कडधान्ये, सीफूड वाफवण्यासाठी आजही बहुतेक स्वयंपाक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीच्या स्टीमरचा वापर केला जातो. याशिवाय बाबूंच्या स्टीमरचा वापरही बऱ्याचदा केला जातो. मात्र, स्टेनलेस स्टील फोल्डेबल स्टीमर नावाचा एक पर्याय अतिशय उपयुक्त आहे. पदार्थ वाफवण्याच्या जुनाट आणि कंटाळवाण्या, वेळखाऊ प्रक्रियेतून सुटका हवी असल्यास गृहिणींसाठी हा स्टीमर उत्तम पर्याय आहे.
गॅसवर कढईत किंवा एखाद्या खोलगट भांड्यात पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवा, मग त्याला ग्रीसिंग करा, त्यांनतर त्यावर पदार्थ ठेवा, वरून ताटाने झाका, मग पुन्हा ते ताट हलू नये म्हणून त्यावर वजन ठेवा, अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. पदार्थ वाफवताना कोणत्याही भांड्यात तळाला पाणी ठेवावे लागते. या प्रक्रियेच्या वेळी तळाशी असलेले पाणी आटल्यास त्यात पुन्हा पाण्याची भर घालताना मोठी तारांबळ उडते. परंतु स्टेनलेस स्टील स्टीमरच्या मध्यभागी असणाऱ्या हॅन्डलमुळे भांड्यातून स्टीमर सहजपणे उचलणे शक्य होते.
स्टेनलेस स्टील स्टीमरची वैशिष्ट्ये
स्टेनलेस स्टील स्टीमर बांबूच्या स्टीमरपेक्षा कमी जागा व्यापतो. पदार्थांची पोषणमूल्ये टिकवून ठेवतो.
हा स्टीमर स्टेनलेस स्टीलचा असल्याने दीर्घकाळ टिकतो. गंज प्रतिरोधक आहे; तसेच याला असणाऱ्या छिद्रांमुळे वाफेचे पाणी पदार्थावर पडून खराब होत नाही.
स्टीमर फोल्डेबल असल्यामुळे याचा उपयोग फक्त पदार्थ वाफवण्यासाठीच नव्हे, तर फ्रूट बास्केट, व्हेजिटेबल बास्केट म्हणूनही करता येतो. तांदूळ, डाळी, फळे, भाज्या धुण्यासाठी स्ट्रेनर म्हणूनसुद्धा याचा वापर करता येतो.
स्टीमरची रचना कोलॅप्सिबल असल्याने सहज उघडणे आणि बंद करणे शक्य होते. साधारण नऊ इंचापर्यंत स्टीमरचा विस्तार होतो. हा स्टीमर कोणत्याही भांड्यात अगदी सहजपणे बसतो.
स्टीमरच्या तळाला असणारे पाय सिलिकॉन बेस्ड आहेत, म्हणून हे स्टॅंड कोणत्याही भांड्यात ठेवल्यावर त्याला ओरखडे पडत नाहीत. स्टीमरला असणाऱ्या उंच पायांमुळे भांड्यात ठेवलेले पाणी उकळी आल्यांनतर स्टीमरच्या छिद्रांमुळे आतपर्यंत जात नाही. पदार्थ सुरक्षित राहतो. व्यवस्थितपणे वाफवला जातो.
Web Title: Article Kitchen Gadgets Stainless Steel Foldable Steamer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..