बुकीश : रहस्यकथांची राणी

माधव गोखले
Saturday, 7 March 2020

तिच्या ‘माऊस ट्रॅप’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला त्याला आता ६७ वर्षे आणि ४ महिने होऊन गेले आहेत. तेव्हापासून आजपर्यंत लंडनमधल्या वेस्ट एन्डमध्ये ‘माऊस ट्रॅप’चे प्रयोग अव्याहत सुरू आहेत. इतकंच नव्हे तर आजच्या घडीला नाटकाच्या तिकिटांचे ७ नोव्हेंबरपर्यंतचे प्लॅन ओपन आहेत. अगदी पाच-सहा महिन्यांपूर्वी चेन्नई, बंगळूर, मुंबईमध्येही ‘माऊस ट्रॅप’चे प्रयोग झाले होते. दंतकथा बनून राहिलेल्या या नाटकाची लेखिकाही दंतकथेत शोभावं असंच आयुष्य जगली.​

तिच्या ‘माऊस ट्रॅप’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला त्याला आता ६७ वर्षे आणि ४ महिने होऊन गेले आहेत. तेव्हापासून आजपर्यंत लंडनमधल्या वेस्ट एन्डमध्ये ‘माऊस ट्रॅप’चे प्रयोग अव्याहत सुरू आहेत. इतकंच नव्हे तर आजच्या घडीला नाटकाच्या तिकिटांचे ७ नोव्हेंबरपर्यंतचे प्लॅन ओपन आहेत. अगदी पाच-सहा महिन्यांपूर्वी चेन्नई, बंगळूर, मुंबईमध्येही ‘माऊस ट्रॅप’चे प्रयोग झाले होते. दंतकथा बनून राहिलेल्या या नाटकाची लेखिकाही दंतकथेत शोभावं असंच आयुष्य जगली. आजही सर्वाधिक भाषांतरे झालेल्या लेखकांच्या यादीत तिचंच नाव पहिल्या क्रमांकावर आहे-विल्यम शेक्सपिअरच्याही वर. तिच्या नावावर गुप्तहेरकथा, कादंबऱ्या, नाटकं अशी त्र्याऐंशी पुस्तकं आहेत, आणि तिच्या पुस्तकांच्या आजवर खपलेल्या प्रतींची संख्या तीस कोटींच्या अलीकडे-पलीकडे आहे, यावर साहित्यविश्‍वाचा विश्वास आहे. डेम अगाथा ख्रिस्ती-रहस्यकथांची राणी!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातलं हे शेवटचं वर्ष अगाथा ख्रिस्ती यांच्या चाहत्यांसाठी विशेष महत्त्वाचं, कारण येत्या ऑक्टोबर महिन्यात अगाथा ख्रिस्ती यांची पहिली गुप्तहेरकथा, ‘द मिस्टेरियस अफेअर अॅट स्टाइल्स’, प्रसिद्ध होऊन शंभर वर्षे होत आहेत. दोन पौंडाच्या एका विशेष नाण्याच्या रूपाने या शताब्दीची स्मृती जपली जाणार आहे.

‘द मिस्टेरियस अफेअर...’ अगाथानी लिहिली ती बहिणीशी लागलेल्या पैजेखातर. तिच्या जगप्रसिद्ध मानसपुत्राचा, गुप्तहेर हर्क्युल पायरोचा जन्म याच कथेतला. या पहिल्याच पुस्तकाने बाईंना गुप्तहेर कथालेखिका म्हणून मान्यता मिळवून दिली असली तरी त्यांची सर्वांत गाजलेली रहस्यकथा आहे, ‘अँड देन देअर वेअर नन’. सहासष्ट गुप्तहेर कथांच्या मालिकेतली पहिली कथा पुस्तक रूपाने प्रसिद्ध होण्याकरिता मात्र अगाथाला पाच वर्षे वाट पहावी लागली आणि प्रसिद्ध होण्यापूर्वी सहा प्रकाशकांनी ती नाकारली होती. सुरुवातीला मेरी वेस्टमॅकॉट या टोपण नावाने लिहिणाऱ्या अगाथानी नंतर मागे वळून पाहिलंच नाही; तिच्या कथा, कादंबऱ्यांची भाषांतरं तर झालीच, चित्रपटही झाले, ब्रिटनच्या महाराणीकडून ‘डेम’ हा किताब देऊन अगाथाचा सन्मान करण्यात आला. चित्रपटांविषयी फार ममत्व नसणाऱ्या अगाथावर एक चित्रपटही निघाला. चित्रपटांप्रमाणेच रहस्यकथांच्या या राणीला गर्दीचं, कर्कश आवाजांचं आणि ग्रामोफोनचंही वावडं होतं. पुस्तकं, प्रवास, चवीने खाता येतील असे पदार्थ, नाटक यात मात्र ती रमायची. तिच्या काहीशा गूढ खासगी आयुष्यात तिने जोपासलेला छंद म्हणजे बागकाम, असाही उल्लेख अगाथावरच्या लिखाणात सापडतात.

‘अॅन अॅटोबायग्राफी’ या पुस्तकात अगाथानी स्वतःबद्दल लिहिलं आहे. मात्र ते प्रसिद्ध व्हावं अशी तिची इच्छा नव्हती. अगाथाच्या मृत्यूनंतर हे लिखाण प्रसिद्ध झालं. त्यानंतर सात वर्षांनी जेनेट मॉर्गन यांनी ‘अगाथा ख्रिस्ती’ याच नावाने अगाथाची अनेक बाजूंनी ओळख करून देणारं चरित्र लिहिलं. हे चरित्र लिहायचं ठरलं ते चरित्र प्रसिद्ध झालं हा प्रवासही मॉर्गन यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत रेखाटला आहे. ही प्रस्तावनादेखील मुळातून वाचण्यासारखी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article madhav gokhale on dame agatha khisti