रंगसंवाद : प्रेरणादायी कलाऋण

महेंद्र सुके
Sunday, 19 April 2020

लॉकडाउन काळात अनेकांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्‍न पडला असतानाच, काहींनी समाजमन गुंतवून ठेवण्यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. कोरोनाशी वेगवेगळ्या यंत्रणा थेट लढत असताना काही यंत्रणा नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठीही झटत आहेत. सारेच एकमेकांना धीर देऊन भविष्यातील संकटावर मात करण्यासाठी कामाला लागले आहेत.

लॉकडाउन काळात अनेकांना वेळ कसा घालवायचा हा प्रश्‍न पडला असतानाच, काहींनी समाजमन गुंतवून ठेवण्यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. कोरोनाशी वेगवेगळ्या यंत्रणा थेट लढत असताना काही यंत्रणा नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठीही झटत आहेत. सारेच एकमेकांना धीर देऊन भविष्यातील संकटावर मात करण्यासाठी कामाला लागले आहेत.

कोविड-१९ समूळ नष्ट झाल्यानंतर लॉकडाउन काळात झालेले नुकसान भरून काढावे लागणार आहे. नव्याने सारे सुरळीत होण्यासाठी समाजमनाची मोठी शक्ती खर्च करावी लागणार आहे. एकमेकांना आधार देण्याची गरज पडणार आहे. सध्याच्या काळात ज्या यंत्रणा ‘कोरोना’शी लढताहेत, त्यांचा उचित सन्मान करावा लागणार आहे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे आपले साऱ्यांचेच कर्तव्य ठरणार आहे. तेच ऋण फेडण्यासाठी श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आर्ट ऍम्बसी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘कलाऋण’ हा उपक्रम राबवला आहे. या लॉकडाउनच्या काळात जे चित्रकार, शिल्पकार, हस्तकलाकृतीकार घरात आहेत, त्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

घरात बसून आपण या उपक्रमासाठी आपली कलाकृती तयार करावी आणि ती ‘कलाऋण’साठी द्यावी, अशी आयोजकांची अपेक्षा आहे. त्या कलाकृती एकत्र करून, प्रदर्शन भरवले जाणार आहे. त्या कलाकृतींचा रसिकांना आस्वाद घेण्यासाठी ठेवण्यात येतीलच, याशिवाय त्यांची विक्रीही करण्यात येणार आहे. त्यातून मिळणारा निधी कोरोनाच्या लढाईत आपल्या प्राणाची बाजी लावून जे वेगवेगळ्या क्षेत्रांतील ‘सैनिक’ लढताहेत, त्या पोलिस, प्रशासन यंत्रणा, डॉक्‍टर्स, परिचारिका, स्वच्छतादूत, स्वच्छता कर्मचारी, समाजसेवकांचा यथोचित सन्मान करून त्यांच्याप्रति ऋण व्यक्त करण्यात येणार आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कलावंताने तयार केलेले चित्र, शिल्प, हस्तकला या आर्टवर्कचे छायाचित्र काढून artembassy.in@gmail.com या मेलवर पाठवायचे आहे. या कलाकृतींची माहिती एकत्र झाल्यानंतर, प्रत्यक्ष कलाकृती कुठे जमा करायची, याची माहिती कलावंतांना देण्यात येणार आहे. त्यानंतर त्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या उपक्रमासाठी प्रशांत वेदक आणि सुमित पाटील यांना कलावंतांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फक्त व्यावसायिकच नव्हे तर हौशी कलावंतही आपले आर्टवर्क या उपक्रमासाठी देत आहेत. त्यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचाही समावेश आहे. व्यावसायिक कलावंतांसह हौशी आणि विद्यार्थी कलावंतांच्या भावनांचा कलाप्रेमी म्हणून आयोजकांनी आदर व्यक्त केला आहे. जी कलाकृती ‘कलाऋण’साठी देण्यात येते, ती कुणाची आहे यापेक्षा त्यांच्या मनातील भावना महत्त्वाची आहे. ही सद्‌भावना समाजमनासाठी प्रेरणादायी प्रकाश देणारी ठरो! 

कलाकृती पाठवण्याचा पत्ता - artembassy.in@gmail.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mahendra suke on art