मेमॉयर्स : माझी आई ‘सुपरमॉम’!

Megha-Dhade
Megha-Dhade

आपल्या सुखदुःखात सहभागी असतात, नेहमीच आपल्या सोबत असतात त्यांना आपण मित्रमैत्रीण म्हणतो. माझी मैत्रीण आईच आहे. माझ्या सर्व सुखदुःखात ती बरोबरच असते. तिनं मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. आमच्या घरामध्ये फिल्मी नव्हे, तर शैक्षणिक वातावरण होतं. तरीही वडिलांनंतर अभिनयात येण्यासाठी सर्वांत जास्त सपोर्ट केला तो आईनं. तिच्या संस्कारांमुळंच मी इंडस्ट्रीजमध्ये ताठ मानेनं उभी आहे.

या क्षेत्रामध्ये चांगली व वाईट माणसंही आहेत. पण, संरक्षणाचं कवच असल्यास वाईट प्रवृत्ती आपल्याकडं पोचू शकत नाहीत. माझ्याकडं आईच्या संस्कारांची कवचकुंडलं आहेत. बारावीनंतर मी मुंबईत आले. एकटी राहिले. अभिनयात येण्यासाठी कोणत्याही मोहाला बळी पडले नाही. आई-वडिलांचं नाव मोठं करण्याचं ध्येय मी ठेवलं होतं. त्यासाठी जिद्द, मेहनत आणि पेशन्स ठेवावे लागणार होते, याची जाणीव मला होती. 

माझा अभिनयाचा प्रवास सुरू होण्यापूर्वीच बाबा आम्हाला सोडून गेले. पण, आई खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. मी नाव मिळवण्यासाठी झटत होते. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये पाच-पाच दिवस टास्क करत होते. सर्वांना खाऊ-पिऊ घालत होते. सर्वांशी सलोख्यानं राहून घरही सांभाळत होते. या सर्व गोष्टींचे खूप कौतुक होत होतं आणि अनेकजण विचारत होते, ‘हे सर्व तुला कसं जमतं?’ या सर्वांमागे माझी आई होती. ती फक्त गृहिणीच नाही, तर होममेकर, मल्टिटास्कर, मल्टिटॅलेंटेड आहे. 

माझ्या आईला भटकंतीची, प्रवासाची आवड आहे. ती वर्षातले सहा महिने रेल्वेतच असते! तिला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात व त्यांची शिदोरी ती आमच्यासाठी सोडते. तिला निसर्ग आणि बागकामाचीही आवड आहे. आई-बाबांच लग्न झालं तेव्हा आमचं कुटुंब खूप मोठं होतं. आम्ही जळगावमध्ये आणि बाकीचे कुटुंबीय गावाकडं राहत होते. अनेकजण शिक्षणासाठी आमच्या घरी राहायचे. आमच्या घरी नातेवाइकांचा मोठा राबता असायचा. माझे बाबा समाजवेडे होते, मात्र आईनं त्यांना कधीच थांबवलं नाही. ती सर्वांसाठी नेहमीच झटत असते. 

माझी आई सुपरमॅनसारखीच आहे. तिला तिच्या मनाप्रमाणे जगायला आवडतं. तिचं लग्न दहावीतच झालं आणि तिच्या पोटी आम्ही चार भावडं जन्माला आलो. तिनं घरकाम व आम्हाला सांभाळून एमएपर्यंतचं शिक्षण घेतलं. बारावीनंतर मी जेव्हा मुंबईत आले, त्या वेळी अभिनयात येण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचवेळी शिक्षणही घेत होते. मी तिच्याकडूनच प्रेरणा घेतली. माझी आई शिवणकाम, भरतकाम, एम्ब्रॉयडरी करते. साबण, शॅम्पू व मसालेही बनवते. ती उद्योजिकाच आहे. लोकांकडून माझं कौतुक होतं, त्या वेळी लक्षात येतं की, हे सर्व मी आईकडूनच शिकले. म्हणून मी देवाला विचारते, ‘देवा, तू मला अशी आई दिली नसती तर मी काय केलं असतं?’ 
(शब्दांकन - अरुण सुर्वे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com