मेमॉयर्स : आईकडून स्वावलंबनाचा धडा

Pritam-Kagane
Pritam-Kagane

आईबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. तसं पाहिल्यास बहुतेक सगळेच माझ्या मताशी सहमत असतीलच. ‘श्‍यामची आई’ पुस्तक वाचलं आणि त्यातलं वाक्‍य मनात अगदी घर करून बसलं... ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी.’ माझंसुद्धा तसंच काहीसं आहे, असं म्हणता येईल; कारण आज मी जे काही करू शकले आणि करतेय त्यामागं माझ्या आईचा मोलाचा वाटा आहे. तिचे सल्ले, पाठिंबा आणि मार्गदर्शन आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. शिक्षणाची आवड आणि महत्त्व आईनं माझ्या मनावर अगदी लहानपणापासून कोरलं. वाचन आणि शिक्षण या गोष्टी आयुष्यात कोणत्याही क्षणी तुम्हाला उपयोगी येतात आणि माझ्या आईनं मला सतत याची जाणीव करून दिली. कदाचित याच मार्गदर्शनामुळं कला क्षेत्रात येण्याआधी मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपीमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं. अभिनय क्षेत्रात येण्यासाठी बाबांना मनवण्याचं काम आपसूक आईकडेच होतं. आईनं फक्त बाबांना यासाठी तयारच केलं नाही, स्वतः माझ्यासोबत मुंबईला आली आणि माझ्या स्ट्रगलचा अनुभवही घेतला. ऑडिशनसाठी, स्क्रिप्ट निवडण्यासाठी तर आईची मदत असायचीच.

आज मी आजवरचा माझा चित्रपटसृष्टीतला प्रवास पाहते, तेव्हा प्रत्येक वळणावर कुठं ना कुठे तरी आईची सावली दिसते. तिनं माझ्यासाठी घेतलेल्या कष्टांचे ठसे माझ्या आठवणींमध्ये स्पष्ट उमटले आहेत. एखाद्या व्यक्तिरेखेचा अभ्यास कसा करावा, त्या व्यक्तिरेखेला कशी वेशभूषा साजेशी असेल किंवा त्या व्यक्तिरेखेची बोलीभाषा कशी असेल, यावर आई माझ्यासोबत आजही चर्चा करते. त्या अनुभवाचा उपयोग मला पदोपदी होतो. महत्त्वाचं म्हणजे, हे सगळं करत आईनं मला घरातली कामंही शिकवली. कामासोबत घर सांभाळणं प्रत्येकाला आलंच पाहिजे, ही तिची धारणा आहे. आई म्हणते, ‘‘तुम्ही कितीही मोठं व्हा, पण स्वतः दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून राहून चालत नाही. स्वावलंबन, शिक्षण आणि वाचन हे तीन मित्र नेहमीच जवळ करावेत.’

शब्दांकन - अरुण सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com