वुमनहूड : मर्दानी आणि तलवार

Radhika-Deshpande
Radhika-Deshpande

झाँसी की रानी लक्ष्मीबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवर या ऐतिहासिक भूमिका एका मागून एक माझ्या भाग्यात आल्या तेव्हा माझे गुरुजी श्यामराव जोशी यांनी मला सांगितलं, ‘‘राधिका लक्षात ठेव इतिहास घडविणारी माणसं थोर मनाची, उदार अंतःकरणाची आणि खंबीर मनगटाची असतात. तुला या भूमिकांसाठी तयार होण्यासाठी तसं व्हावं लागेल. तरच तू या भूमिका खऱ्या अर्थानं जगू शकशील.’’ मी तयार होते. नागपूरला तालमी सुरू झाल्या ‘झाँसी की रानी-रणरागिणी’ या नाटकासाठी तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे धडे घेणं आवश्यक होतं.

दिग्दर्शक नचिकेत म्हैसाळकर यांनी चोख वेळापत्रक तयार केलं होतं. सकाळी ६ ते ८ घोडेस्वारी, १२ ते २ डबिंग, दुपारी ३ ते ६ तलवारबाजीचे प्रशिक्षण आणि संध्याकाळी ७ ते ११ महानाट्याची तालीम. ते मंतरलेले १५ दिवस जोखमीचे, कष्टाचे पण तितकेच समाधानकारक आणि आनंद देणारे. आपल्याला बाजी मारायची आहे. तलवार हातात घ्यायची आहे आणि नुसतीच धरायची नाही, तर ती उचलून वारही करायचा आहे, पण ते ही कोणाला इजा न होऊ देता. खोट्याचा खरा आभास! खरीखुरी रणरागिणी वाटायला हवी. त्याचा आव आणायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही, हे मला कळत होतं.

लहानपणापासून पाटी-पेन्सिल धरणारी मी, मला आता तलवार धरून ती लीलया पेलून फिरवायची होती. मला तलवारबाजी कोण शिकवणार याची मला उत्सुकता होती. वेदांग चट्टेने मला तलवारबाजी अधिक रंजक आणि सोपी करून शिकवली. पहिल्या दिवशीचा धडा शिकवताना मला म्हणाला, ‘तलवार धरायची कशी इथपासून ती आता बोलते कशी, हा प्रवास आपण करणार आहोत’. ‘बोलते कशी?’, मी विचारलं. म्हणाला ‘हो! का आपणच बोलू शकतो का...? आपल्या हातातली तलवार नाही?’

मी १५ दिवसांची तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकताना राधिकाची ‘रणरागिणी’ कधी झाले, कळलंसुद्धा नाही. एकदा तलवार हातात धरली की, क्षणात जिज्ञासा, जागरूकता, जिद्द, जबाबदारी आणि जिंकण्याची इच्छा निर्माण होते. शिवकालीन पद्धतीनं वेदांगनं मला तलवार बाजी शिकवली. आपले देशी खेळ आपण शिकवले पाहिजे, जगवले पाहिजे आणि त्यात नवीन काहीतरी जोडले पाहिजे, म्हणून या तरुणानं त्याच्या ५ मित्रांबरोबर ‘वीरांगण’ नावानं शासनमान्य संस्था सुरू केली आहे. आमचे प्रयोग झाले, फाइट सिक्वेंस सुपरहिट ठरला. मी त्याला विचारलं, ‘तुला काय देऊ? चॉकलेट?’ तो म्हणाला, ‘नको ताई. मला चॉकलेट नको. एक करशील? तू जिथं जाशील आणि जिथं संधी मिळंल तिथं आपले देशी खेळ खेळायला प्रवृत्त करशील? लाठी, पट्टा, बाणा, तलवार, जबरदांडा, भाला, पाश असे अनेक सुंदर खेळ लुप्त होत आहेत. तुझ्या बाजूनं तू लोकांपर्यंत पोचवले तर बरं होईल.’ त्याचं एवढंसं म्हणणं मी पूर्ण करायला हवं, नाही का?

‘स्वराज्यरक्षक संभाजी’च्या सेटवर मला मनापासून शिकवणारे मुंबईचे चंद्रकांत साठे यांचाही उल्लेख करायला हवा. त्यांनी तन्मयतेनं आणि मोठ्या आत्मीयतेनं मला पवित्रा, वार शिकवले. माझे फाइट सीन मालिकेत नसतात, तरीही मी इच्छा व्यक्त केली म्हणून शिकवले. मला म्हणाले, ‘तुम्ही शिका, तुमच्यासारख्या मुलींनी शिकलं पाहिजे.’ पुण्यात येऊन अभिजित लुगडे निःशुल्क शिकवतात, या सगळ्यांचं काम, मनही मोठं आहे. 

शरीराची लवचिकता, मनाची स्थिरता आणि बुद्धीची प्रगल्भता या खेळांमुळं वाढते. हे तलवारीच्या धारेप्रमाणे सत्य आहे. ‘मर्दानी’ म्हणवून घ्याच एकदा स्वतःला. एकदा डाव खेळा. बाजी मारा. माझ्या मन, मनगट आणि मेंदूमध्ये जशी बळकटी आली, तसा माझ्या लेखणीतून तुमच्यावर हळुवार फुंकर घालीत तुम्हालाही हा खेळ खेळायला प्रवृत्त करणारा हा शब्दांचा वार समजा हवं तर...

तलवार हाती धरीत घोड्यावर बसून मर्दानी खेळाचे प्रतिनिधित्व करणारी मी एक रणरागिणी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com