वुमनहूड : पंगा

Radhika-Deshpande
Radhika-Deshpande

माझं आयुष्यात एकच स्वप्न होतं. शिकलेला नवरा मिळावा, मनमिळाऊ स्वभावाचे सासू-सासरे, एक गोड गोंडस बाळ, आपलं घर कलात्मकरीत्या सजवावं. वीकेंडला आम्ही सगळ्यांनी मिळून नाटक-सिनेमाला जावं. मीही सर्वसामान्य मुलींसारखं एवढं स्वप्न बघितलं होतं. फरक एवढाच, की मी हे स्वप्न अगदी इयत्ता चौथीत असल्यापासून बघत होते. माझी ही सगळी स्वप्नं पूर्ण झाली. शिकलेला देखणा नवरा, प्रेमळ सासू-सासरे, गोड गोंडस मुलगीही झाली. घर पण झालं. हे सगळं दोन वर्षात झालं हो! सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं, पण काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं.

पूर्वीसारखं कशावरही हसणं खिदळणं, गप्पा मारणं नव्हतं. मनात येईल तेव्हा बेफिकीर फिरायला जाणं नव्हतं. शरीराची झीज होईल असं कुठलंच काम मी करत नव्हते. माझं वजन सोळा किलोनं वाढलं होतं, घरची कितीही कामं काढली, तरी कौतुक करण्याइतपत काही विशेष काम नव्हतं. स्वतःचा चेहरा आरशात बघून ओळखू येत नव्हता. आता मला अंतराची आई म्हणून ओळखू लागले होते. पूर्वीची राधिका मी राहिले नव्हते. 

मी कधीच महत्त्वाकांक्षी नव्हते, पण कुठं चुकलंय का, असं वाटायला लागलं होतं मला. स्केटिंगमध्ये नॅशनल ब्राँझ, डिस्ट्रिक्ट लेव्हलची धावपटू, नृत्य आणि नाटकात प्रत्येक स्पर्धेत बक्षीस पटकावणारी, शाळेतली एनसीसी कॅडेट, कॉलेजमधली ‘मोस्ट ब्युटिफुल स्माईल’चा टॅग मिळवणारी. अंतरा तीन वर्षांची झाली होती आणि मी एकोणतीस वर्षांची. माझं घुम्यासारखं वागणं, तंद्री लागणं माझ्या नवऱ्याला कळलं होतं. ‘राधिका आपण बंगलोरहून पुण्याला शिफ्ट होऊ. तू नाटक-मालिकांमधून काम करायला सुरू कर. हळूहळू काम घे,’ त्यानं सुचवलं. 

‘मला नाही जमणार. मी एक आई आहे,’ मी म्हणाले. ‘विचार मी करतो आहे, तुला पाऊल उचलायचं आहे,’ तो म्हणाला. ‘परत नव्यानं सुरू करायचं? मी ऑडिशन्स द्यायच्या? वजन वाढलं आहे त्याचं काय करू? बराच गॅप गेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अंतराला, तुला सोडून जावं लागंल मला,’ माझा बचाव. दुसऱ्या दिवशीची पहाट लवकर झाली. कारण मी तोवर ‘हो’ म्हणाले होते. मी स्वतःशीच ‘पंगा’ घ्यायचं ठरवलं होतं. आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. आम्हा दोघांना जेवढे प्रश्न पडले नाहीत, तेवढे आमच्या आजूबाजूच्या लोकांना पडत होते. ‘बापरे छोट्या कपड्यातले फोटोशूट?, नाटक-सिनेमामध्ये काम करणाऱ्या लोकांची खूप डिव्होर्स आणि लफडी होतात...’

यातलं काहीच झालं नसल्यामुळं त्यांना नक्कीच डिप्रेशन आलं असावं. असो! हळूहळू मी इंडस्ट्रीत पाय रोवते आहे. पैसे न मिळणं, वेळेवर न मिळणं माझ्याबरोबरही झालं आहे. प्रसिद्धी मिळवायची म्हणून ती मिळत नसते. प्रसिद्धी पैशाइतकी चंचल असते. सहकलाकारांकडून त्रास झाला. माझी आई म्हणते, ‘आपल्याशी कोणीही कसंही वागलं, तरी आपण त्यांच्याशी चांगलंच वागायचं.’ तेच मी केलं.

माझे वडील नागपूरला नावाजलेले दिग्दर्शक आहेत, पण मी त्यांचा पायरी म्हणून वापर केला नाही. मी माझं पुस्तक हाती घेतलं आहे आणि त्यात परत एकदा रंग भरायचं ठरवलं आहे. माझ्या पप्पांनी मला एकदा सांगितलं होतं, ‘बेटा, लक्षात ठेव, बंड केल्याशिवाय क्रांती घडत नाही.’ हो पप्पा, खरं आहे. पिक्चर अभी बाकी है. ही तर सुरुवात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com