वुमनहूड : #9मी

रानी (राधिका देशपांडे)
Saturday, 4 April 2020

मी मागचे ९ दिवस घरीच आहे. खरंतर दहा दिशांनी रामनवमीचे वारे वाहायला पाहिजे होतं, पण संपूर्ण जगाला साडेसाती असल्याप्रमाणे जाणवतंय. भूतलावरच्या प्रत्येक अणुरेणूच्या नाकी ९ आणले आहे, या covid-१९नं. आता काय करावं, हा प्रश्‍नच आहे.

मी मागचे ९ दिवस घरीच आहे. खरंतर दहा दिशांनी रामनवमीचे वारे वाहायला पाहिजे होतं, पण संपूर्ण जगाला साडेसाती असल्याप्रमाणे जाणवतंय. भूतलावरच्या प्रत्येक अणुरेणूच्या नाकी ९ आणले आहे, या covid-१९नं. आता काय करावं, हा प्रश्‍नच आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता गप गिळून ९चा पाढा म्हणतेय घरातल्या घरात. नव्यानं सगळ्या गोष्टी कळतायेत. ९च्या पाढ्यामध्येही प्रत्येक संख्येतल्या आकड्यांची बेरीज ९च येते! हे मला आत्ताच कळतंय. सारं जग आकुंचन पावतं आहे, त्यामुळं पृथ्वीचा आकार ही ९ भुजाकार झाला असावा, असं उगाच मला वाटतंय. मी गेले ९ दिवस अन् ९ रात्र घरची लक्ष्मणरेषा ओलांडलेली नाही. म्हटलं बाहेर घडतंय ते रामायण किराणा आणण्याच्या निमित्तानं दिसेल, तेव्हाच कळेल बाहेरची परिस्थिती काय आहे. पण कसलं काय!

बघते तर पुढचे ९ दिवस बाहेर जावं लागणार नाही, एवढं सामान घरात आहे. म्हणजे पुढचे काही दिवस मला एका गरोदर स्त्रीसारखं, म्हणजे ९ महिने आणि ९ दिवसांएवढे वाटणार आहेत. म्हणून शांत बसून राहिले. जुन्या अल्बममधला नऊवार नेसलेल्या आजीचा फोटो हातात घेऊन तिला विचारलं, ‘एका गरोदर स्त्रीप्रमाणं आंतर्बाह्य भावनिक, मानसिक आणि शारीरिक बदल होणार, असं दिसतंय.’ आजी फोटोतून बाहेर येऊन म्हणाली, ‘हो. तुला आठवतंय? भोलानाथ भोलानाथ हे गाणं तू मनापासून गायचीस. आपल्या तीव्र इच्छा कधी ना कधी पूर्ण होतातच. गाण्यातून विचारलेल्या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं तुला मिळाली बघ. गुढी पाडव्याला पुण्यात पाऊस पडला, शाळेला अचानक सुट्टी मिळाली, आठवड्याचे रविवार ७ झाले. 

आज सगळ्यांचीच आई दुपारी झोपते आहे आणि लाडू हळूच खाताना आवाजही होत नाहीये. कळकळीनं तुझं लेखन सुरू आहे आणि गणिताचा पेपर नसला तरी ढोपर दुखू लागलं आहे.’ मी म्हणाले, ‘हो आजी. पण आयुष्याचं गणित आहेच की! ते काही केल्या सुटत नाही आणि पेपरही संपत नाही बघ.’ आजी म्हणाली, ‘आयुष्याचं गणित सुटायला ते काय ०-९ आकड्यांएवढं सोप्पं आहे! आणि पेपर लिहिणं संपायला नकोच! सगळा शब्दांचा खेळ. खेळ सुरू ठेवायचा, उत्तरं सापडत जातात.’ मी म्हणाले, ‘अगं पण आजी, गणित हा विषय आहे आणि इथे शब्द नाही, तर अंक आहेत.’ आजी म्हणाली, ‘माझ्याकरता तरी शब्द आणि अंक हे निव्वळ मंत्र आहेत. त्यातलं तंत्र ओळख म्हणजे परीक्षा खेळ वाटेल आणि जादूसारखी परिस्थिती बदलेल.’ असं म्हणत नेहमीप्रमाणं विचार करायला लावणारं बीज पेरत आजी फोटोत गुडूप झाली. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं मी करायचं ठरवलं. पुढचे ९ दिवस थोडं उत्खनन, थोडं समीकरण आणि वशीकरण करायचं ठरवलं.

नाटकातल्या ९ रसांचं महत्त्व पुन्हा एकदा वाचून काढलं. ९ रात्र शुभचिंतन केलं. चैत्र रामनवमीच्या ९ देवींचं महत्त्व समजून घेतलं. ९ रत्न आणि त्यांचं महत्त्व व त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम जाणून घेतला. अकबराच्या दरबारातील ९ रत्न आपल्याही घरात ठेऊन घ्यायचे का, असा वेडा विचारही मनाला शिवून गेला. रोज रात्री गॅलरीत बसून आकाशातले ९ ग्रह शोधले. घरातल्या घरात किमान ९ वेळा तरी सूर्यनमस्कार करायचं ठरवलं. अंकशास्त्रातलं ९चं महत्त्व वाचायला वेगळीच मजा आली. ९ आकड्याचं भाग्य घेऊन आलेल्या ९ अफाट व्यक्तिमत्त्व शोधून काढली. ९ नंबरचा बुटांचा जोड नवरा घालतो, याचं मला हसू आलं. 

पत्त्यांमधल्या बदाम, इस्पिक, किल्वर आणि चौकटच्या नव्वीकडं उगाच हसून पाहिलं. एवढंच काय, तर ९ अक्षरांचा नवार्ण मंत्र असतो हे गूगल वर शोधून काढलं. अशा या ९ घाटांचं पाणी पीत आलेल्या माझ्या लेखन नाविकेला मी सकाळीच तुमच्या तिरी सोडते आहे. सध्या आपल्या सगळ्यांचाच #९मी टाइम सुरू असल्यामुळं मी तुम्हाला माझा ९मी लेख वाचण्याचा आग्रह धरणार नाही. चला! घड्याळात ९चा ठोका वाजला आहे. मी आता या लेखाचं फलित काहीतरी गोड बनवून साजरं करणार आहे. काय बरं करावं? काहीतरी केलं पाहिजे. चिरोटे करते. ९ पदरी चिरोटे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article radhika deshpande