वुमनहूड : वीर दौडू दे सात...

Horse-Riding
Horse-Riding

मी ताटाखालची मांजर कधीच नव्हते, मात्र मांजरीला भिणारी भित्री भागुबाई होते, अगदी २०१९पर्यंत. भूतदया, जीवदया पाळते, पण पाळीव प्राणी घरी आणण्या इतपत माझं प्राण्यांवर प्रेम नाही. त्याचं कारण मला प्राण्यांचा फारसा सहवास लाभला नव्हता, पण २०१९ मध्ये चित्र पालटलं. मी ठरवून पहिल्यांदा मांजरीला हातात घेऊन तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. हे माझ्या आयुष्यातलं आतापर्यंत केलेलं सर्वांत शौर्याचं काम समजते. त्यानंतर मात्र मी प्राणीमित्र झाले. 

रस्त्यावर सापडलेल्या जखमी बगळयावर इलाज केला. घरट्यातून पडलेल्या पाकोळीच्या पिल्लाला दाणा देऊन उडवलं. खरं वाटणार नाही, पण माझ्या हातून एका खारुताईनेही चिप्स खाल्ले. एका शॉर्टफिल्मसाठी आठ दिवस घरात कुत्रा पाळला. आमच्या घरासमोर पांढरी घोडी दिसली. ती जवळच्या एका गोठ्यातली आहे, तुरंगी तिचं नाव. लहानपणी ‘तुमचा आवडता प्राणी कोणता?’ या निबंधात मी घोड्याबद्दल लिहिलं होतं. आजही माझा तो आवडता प्राणी आहे. 

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात घोडा दुडक्या पावलानं लहानपणीच प्रवेश करतो. घोड्यावरचा लाडोबा बनून आजोबांच्या पाठीचा घोडा सगळ्यांनीच केला असेल. मी २०१८मध्ये घोडेस्वारी शिकण्याचं भूत डोक्यात घेतलं आणि आज सरपट चालीनं घोडेस्वारी करते. जवळजवळ ५०० किलो वजन असलेल्या या देखण्या प्राण्यानं मला शिकवलं, घडवलं आणि मोठं केलं. 

माझे घोडेस्वारीचे ‘सप्तरंग’..
‘गोल्डन स्टार’, ‘प्रिन्सेस’, ‘मूनलाईट’, ‘फ्लॅश’, ‘तुरंगी’, ‘हर्क्युलस’ आणि ‘डेझी’ या सात घोड्यांचा इथं उल्लेख करायला हवा. घोडेस्वारी हा एक खेळ आहे, पण त्याला कधीही पोरखेळ समजण्याची चूक करू नये. हलक्या काळजाच्या आणि दुबळ्या शरीरयष्टीच्या लोकांचं ते कामच नाही. ते अत्यंत धाडसाचं आणि संयमाचं काम आहे. गोल्डन स्टार हा माझ्या आयुष्यातला पहिला घोडा. त्याचा करडा रंग आणि काठियावाडी बांधा पाहून मी त्याच्या प्रेमात पडले, पण त्यानं मला दुसऱ्याच दिवशी साधारण पाच फुटावरून पाडलं. तिसऱ्या दिवशी सुद्धा तेच झालं. एकूण काय, ‘प्रेमात कोणी पडू नये’ असं त्यानं मला शिकवलं. मी पण पक्की, त्याच्या हळूच कानात सांगितलं, ‘‘मी तुझ्या प्रेमात आहे, प्रेमात पडले नाहीये.’’ आमची गट्टी झाली. आजही तो माझा लाडका आहे. प्रिन्सेस अरबी उंच घोडी, एकदम कडक चाल, पण मला फारशी आवडली नाही. मूनलाईट पांढरा शुभ्र, सडपातळ बांधा आणि अत्यंत चंचल. त्यानं एकदा माझ्या नकळत वेग घेतला, मला तर वाटलं नेतो हा मला थेट चंद्रावर. मी पण त्याचा लगाम असा खेचला की, त्याला त्याची नानी आठवली असेल. फ्लॅश शेंबडा, घाबरट. एकदा फटाक्यांचा आवाज झाला म्हणून पलटला पण मी त्याला ‘ईझी ईझी’ म्हणत शांत केलं. तुरंगी आमच्या घराच्या गल्लीत सापडली. एक दिवस अचानक हरवली, आम्ही दिवसभर शोधल्यावर सापडली. जीव काढला पोरीनं. मला ‘झांसी की रानी रणरागिणी’ या महानाट्यामध्ये रानी लक्ष्मीबाईची भूमिका करायची होती.

नागपूरला दहा दिवसांचं ट्रेनिंग होतं. हर्क्युलस हा घोडा ठरला. हा अत्यंत गुणी घोडा. एक दिवस त्याला जंगलात नेऊन प्रॅक्टिस करायची ठरलं. त्याला मोकळं रन दिसताच ताशी ६०-७०च्या स्पीडनं तो मला घेऊन सुटला. मला कारमध्ये बसून सोबत करत असलेल्यांनी माझं मरण पाहिलं, पण या वेळेला मी लगाम सोडला नाही. त्यानं जीवघेणी परीक्षा घेतली. पडण्याचा अनुभव मला होता आणि आता लढण्याचा अनुभव मला मिळाला. रानी लक्ष्मीबाई यांना कुठल्या यातनेतून जावं लागलं असेल, याची झलक मला नक्कीच मिळाली. नाटकाच्या मोठ्या पटांगणात तीन दिवस तीन शो होते.

प्रेक्षकांसमोर ९०० मीटरची घोडेस्वारी करायची होती, पण दोन तास अगोदर हर्क्युलसचा पाय लचकला. उरलेल्या पाच घोड्यांपैकी मला एकाची निवड करायची होती. प्रशिक्षण देणारे प्रमोद लाडवे सर म्हणाले, ‘‘तुला तुझ्या घोड्याची निवड करायची आहे.’’ मी प्रत्येक घोड्याचा स्वभाव विचारून तरुण, चंचल, सुंदर डेझीची निवड केली. 

प्राण्यांकडून काय शिकले 
मी प्राण्यांकडून निष्पाप, निरागस, निःस्वार्थ प्रेम करणं शिकले. शौर्य, धैर्य, धिटाईचे धडे घेतले. आत्मविश्वास, आत्मनियंत्रण आणि आत्मज्ञान वाढले. त्याचबरोबर विनम्रतेचा भाव स्थायी बाळगायला शिकवलं. स्वार होणं सोपं आहे, बसून मिरवणं त्याहून सोपं, पण ज्याला ‘कंट्रोल’ आणि ‘कमांड’ची गुरुकिल्ली गवसली त्याचीच लगाम खऱ्या लढवय्या बाजीगराची. आज एवढ्या मोठ्या आपत्तीनंतर आपल्या शरीरातील सात चक्र वीरासारखे दौडवण्याची गरज आहे. 
तुमच्यातील The Dark Horse बाहेर काढण्याची आज वेळ आलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com