वुमनहूड : ...अँड क्लिक

रानी (राधिका देशपांडे)
Saturday, 16 May 2020

‘...अँड क्लिक’ म्हणजे मुद्दाम काढून घेतलेले फोटो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एकदा तरी हा प्रसंग येतो आणि ‘भावी अभिनेत्रीं’च्या आयुष्यात तर तो विधिलिखितच असतो! तुम्हाला दिसतो आहे तो माझा सोळाव्या वर्षी काढलेला फोटो आहे. सडपातळ बांधा आणि लांब केस ही माझी ओळख होती.

‘...अँड क्लिक’ म्हणजे मुद्दाम काढून घेतलेले फोटो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एकदा तरी हा प्रसंग येतो आणि ‘भावी अभिनेत्रीं’च्या आयुष्यात तर तो विधिलिखितच असतो! तुम्हाला दिसतो आहे तो माझा सोळाव्या वर्षी काढलेला फोटो आहे. सडपातळ बांधा आणि लांब केस ही माझी ओळख होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी विवेक रानडे या नागपुरातल्या मोठ्या फोटोग्राफरचा माझ्या आईला फोन आला. घरातील बरे कपडे घालून स्टुडिओत पोचले. एका ब्युटिशियननं माझा मेकअप केला. माझी फोटो काढून घेण्याची ही पहिलीच वेळ होती. विवेकदादाला हव्या तशा पोझेस देत गेले. मला कळेच ना, हा माझे एवढे फोटो का काढतोय... कधी हात गालावर, कधी अधांतरी डोक्यावर, कधी डोळे तिरके अशा वेगवेगळ्या सूचना तो देत होता. माझ्या अर्धवट वयाला ते कळेना. साधारण ५०-१०० फोटो काढून झाल्यावर दुसऱ्या लुकमध्ये फोटो काढायचं ठरलं. आता फ्लॉवर पॉटऐवजी नुसती खोटी फुलं ठेवली होती आणि त्यांच्याकडं मी प्रेमानं पाहतेय, असे फोटो काढायचं ठरलं. मग मी त्यांचा सुगंध घेत असल्याचं ‘नाटक’ केलं.

कधी स्टुलावर चढून, कधी पाठीतून वाकून, कधी एका हाताच्या ढोपरावर तोल सांभाळत तो फोटो काढत होता. दोनतीनशे फोटो काढले तरी विवेकदादाच्या चेहऱ्यावरचे भाव ठीक आहेपासून हा बरा आला असेल, हा छान आहे एवढेच. तो ‘अँड क्लिक’चा जमाना होता. तेव्हा आता मिळते तशी लगेच डिजिटल इमेज मिळायची नाही. त्यामुळं आले ते फोटो भगवान भरोसे. त्यानी रेडी, स्टेडी अँड क्लिक म्हटलं की, मी टाईमिंगनी स्माईल करायचे. चुकून डोळे मिटले तर झालं... सगळ्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखं वाटायचं.

मुळात आपण खरंच सुंदर आहोत का ते आपण सुंदर दिसलो नाही तर, फोटो चांगले येतील नं, आपले एवढे फोटो का काढतोय हा, माझ्या मैत्रिणी मला हसणार तर नाहीतना, अशा शंकांमध्ये प्रवास सुरू होता. साधारण ५०० फोटो काढले. त्यातून फक्त २५ फोटो चांगले आलेत असा लॅंडलाईनवर फोन आला. पण प्रश्न वेगळाच होता. संपादकांना माझे फोटो आवडतील की नाही, यापेक्षा माझ्या घरचे आणि माझे मित्रमैत्रिणी माझ्यावर हसू नये म्हणजे मिळवलं.

दोन दिवसांनी परत फोन आला, संपादकांना फोटो आवडले. छापतो म्हणाले आहेत. आईला तर एवढा आनंद झाला. जणू देवानी पावतीच फाडून दिली असावी, तिच्या पोटी सुंदर मुलगी जन्माला आल्याची! त्या २५ फोटोंमध्ये मी सुंदर दिसते आहे का बंदर, हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय विश्वास बसणार नव्हता. आईनं ते जगभर मिरवले, पण मला मात्र मी माझा चेहरा कुठं लपवू असं झालं होतं. अहो, फोटोत मी गरजेपेक्षा आणि मुळात असल्यापेक्षा जास्त चांगली दिसत होते. ‘तो मी नव्हेच’ किंवा ‘ती फुलराणी’ किंवा ‘सुंदर मी होणार’पासून ‘आपण यांना पाहिलत का?’पर्यंतच्या छटा मला दिसल्या. अहो ही फोटोग्राफी आहे. इतनी भी सुंदर नहीं हूं मैं! रातोरात मी संपूर्ण नागपुरात फेमस. पण तो काळ गेला आणि फोटो काय ते राहिले.

आठवणी ताज्या झाल्या आणि या फोटोमधली खरी मी माझ्याशी बोलू लागले. सध्या सगळेच आठवणीतले क्षण वेचताहेत. काही जुने फोटो नुकतेच सोशल मीडियावर टाकले, तर धडाधड लाइक्स, कमेंट्स पाहून आनंद झाला. पण थोड्या वेळानं तो मावळला. का? कारण आताच्या फोटोंपेक्षा जुन्याच फोटोला जास्त लाइक्स आले हो!

माझासुद्धा जुने अल्बम उघडण्याचा वेडेपणा करून झाला. एका क्लिकमध्ये अडकलेले क्षण सारे, क्षणार्धात वेचले आणि हलकेच अश्रू बनून ओघळलेही. जणू कोणीतरी क्लिकचं बटन दाबावं आणि त्या अल्बममधले फोटो आपल्या डोळ्यांसमोर एखाद्या स्क्रीनप्लेसारखे नाचावेत. काही फोटोमध्ये मामाचं गाव, चॉकलेटचा बंगला, मोरपिशी स्वप्न, पत्त्यांचा रंगलेला डाव, काजळ टीप लावून तयार झालेली मीपण होते. अख्खं जग फिरून आल्याचा अनुभव होता. तुम्ही कुठं कुठं फिरून आलात? कोणी हिरव्यागार शेतात आजोळी, तर कोणी परदेशातल्या आयफेल टॉवरखाली, असे तुम्ही तुम्हाला सापडलात की नाही? अंतर्मुख झालात, हरवलात.‘अँड क्लिक’ नंतरचा फोटो म्हणजे ज्यात तुम्ही अधिक चांगले दिसता ते तुम्ही सोशल मीडियावर टाकले असतील, खरं की नाही? माझ्या असं लक्षात आलं आहे की, माणूस क्षणांमध्ये जगतो.

त्याच्या क्षणांची त्याच्या डोळ्यात फोटोग्राफिक इमेज तयार होते. कधीकधी ती रेडी, स्टेडीनंतरच्या ‘अँड क्लिक’मध्ये काबीज होते. आम्ही कलाकार फोटो काढून घेण्यात माहीर असतो. त्याचा प्रसिद्धीसाठी वापर करतो. फोटो काढून कलाकाराला योग्य ते काम मिळतं याबद्दल दुमत होऊ शकते, पण मिळालेला आत्मविश्वास आणि संधी यांकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. खरंतर फोटोग्राफीचं महत्त्व मला या रियलाईझेशनच्या काळात समजलं आहे.

फोटोग्राफी आणि फोटो म्हणजे आपल्या आयुष्यातले आपण वेचलेले सुवर्णक्षण, मग ते अगदी कॅंडिड का असेना. फोटोमध्ये जादुई ताकद असते.

आपल्याला खदाखदा हसवण्याची आणि मुसूमुसू रडवण्याचीही. माझं काय म्हणणं आहे, ‘‘अहो, असा किती दिवस जुना अल्बम हाती धरून गेलेले क्षण कुरवाळत बसणार आहात? लवकरच लॉकडाउन संपेल. रेडी आणि स्टेडी राहा. एक नवा कोरा अल्बम बोलक्या इमेजेसनी भरून काढा. आलेला क्षण आपल्या डोळ्यात साठवा आणि त्याचा गंध हृदयी दरवळू द्या. 

जरा इकडं बघा, कॅमेराकडं. आयुष्य खूप सुंदर आहे. स्माईल प्लीज... अँड क्लिक!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article radhika deshpande on womenhood