वुमनहूड : हृदयात वाजे समथिंग!

रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री
Sunday, 12 July 2020

दाटीवाटीनं वाढलेल्या वृक्षवल्लींनी बहरलेली एक वनराई आहे. वनराजाबरोबर झुलताना वनमालासारखी ‘मी’ मला दिसते आहे. हरिततृणांच्या मखमलींवरती काजवे, आकाशात स्वच्छंद उडणारे पक्षी आहेत, तर हत्ती आपल्या सोंडेने हळूच झोके देतो आहे. काल्पनिक वाटतं आहे ना सगळं? मी तिथं असते तर, आत्ताचं वास्तविक जग मला कल्पनेच्या पलीकडलं वाटलं असतं, नाही?

दाटीवाटीनं वाढलेल्या वृक्षवल्लींनी बहरलेली एक वनराई आहे. वनराजाबरोबर झुलताना वनमालासारखी ‘मी’ मला दिसते आहे. हरिततृणांच्या मखमलींवरती काजवे, आकाशात स्वच्छंद उडणारे पक्षी आहेत, तर हत्ती आपल्या सोंडेने हळूच झोके देतो आहे. काल्पनिक वाटतं आहे ना सगळं? मी तिथं असते तर, आत्ताचं वास्तविक जग मला कल्पनेच्या पलीकडलं वाटलं असतं, नाही?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आजचं जग मला जादूई वाटतं. जादूची कांडी फिरवली, की वस्तू दारात हजर. तुमच्या हृदयात काहीतरी वाजल्यावर ते तुमच्या मोबाईलला समजलंच म्हणून समजा. आपला मोबाईल ‘फोन’ नसून हृदयाबाहेरचं आपलं, आपल्या मुठीत मावेल, एवढं हृदयच आहे, असं मला वाटतं. 

मगर आणि माकडाची दंतकथा आठवते का? त्यात माकड मगरीला म्हणतो, ‘मी येतोय खरा तुझ्याबरोबर, पण तुला हवं असलेलं माझं गोड काळीज मी एका झाडावर ठेवून आलो आहे. तेवढं मला घेऊन येऊ दे.’ खरंतर काळजाऐवजी मोबाईल असं म्हणायचं असंल! आजच्या युगात आपण माकड असू, तर आपले मोबाईल हे आपले काळीज असून, आपली सगळी माहिती कैद आहे. या ‘माहिती’च्या जगात आत्ताच्या मगरींना, म्हणजेच हॅकर्सना आपल्यापेक्षा आपल्या मोबाईलमध्ये जास्त रस आहे. आपले बँक डिटेल्स, कुंडली, वैयक्तिक संवाद, वेळापत्रक, सगळं मोबाईलमध्ये बंदिस्त आहे. परवा एक जण म्हणाला, ‘अगं, तिच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचं असल्यास तिचा मोबाईल एक दिवसासाठी मिळव. संपूर्ण माहिती डाऊनलोड करता येईल.’ खरंच आपण एवढे यांत्रिक झालो आहोत का?

साधं सोपं सरळ काही राहिलेलंच नाहीये. तांत्रिक घडामोडी एवढ्या वाढल्या आहेत की, अपडेटेड नसल्यास मला मागच्या बाकावरची विद्यार्थिनी वाटायला लागतं. मोबाईल ब्लड प्रेशर चेक करू शकतो म्हणे. मी मोबाईलला हृदय म्हणते, ही अतिशयोक्ती नाही. पौराणिक कथांमधल्या देवी देवतांसारखं आपल्यालाही काही गोष्टी शक्य व्हायला लागल्या आहेत काय, असं वाटतं. मी आमच्या शूटिंगच्या सेटवर काय चालले आहे असं मैत्रिणीला विचारता तिनं व्हिडिओ कॉल करून परिस्थितीचा आढावा द्यावा. एका गूगल कमांडनं ती वस्तू खरंच तुमच्या मोबाईलमध्ये हजर होते, हे अनाकलनीय आहे.

मोबाईलच्या काचेवर गुदगुल्या केल्यागत पासवर्ड टाइप केल्यावर एखाद्या गुरुकिल्लीनं खजिना सापडावा, असा आनंद होतो. मोबाईल आपल्याला आपल्या अंतरात्म्याचा आरसा दाखवतो, तर इतरांना त्याचं प्रतिबिंब. स्वतःच्या मनात डोकावता नाही आलं, तर स्वतःच्या मोबाईलमध्ये डोकावून बघा. मोबाईलला स्वच्छ आणि सुंदर ठेवा, कारण अनेकदा तो गुरूचं काम करतो. लॉकडाउनमध्ये चार भिंतींच्या पलीकडं त्यानंच मला नेलं आहे. मोबाईलची सवय आणि व्यसन बारीक रेष सांभाळणं गरजेचं आहे. हृदयात सतत डोकावत राहिल्यास बुद्धीचा वापर कधी करायचा? भारत सरकारनं मोबाईलमधील काही चीनी ॲप काढून टाकले, तेव्हा काहींच्या हृदयाचे ठोके चुकले म्हणे. काही दिवसांपूर्वी हातातल्या हृदयाची ओपन हार्ट सर्जरी केली. नको ते ॲप्स, मेसेजेस सगळे डिलीट करून टाकले. चांगल्या गोष्टींसाठी जागा करावी म्हणून नव्हे, तर ‘आयफोन’ सोडून एक सॉलिड फोन घेतला म्हणून. आमची नाट्य-सिनेसृष्टी मोबाईलच्या भरवशावर चालते. म्हणूनच अपग्रेडेड व्हर्जनचा फोन घेतला. 

माणूस माणसाला जोडण्याचं काम मोबाईल करतो. जग जवळ आलं त्याच्यामुळंच. नवी दृष्टी मिळाली आणि दृष्टिक्षेपात गोष्टी पोचल्यात त्याच्यामुळंच. संपूर्ण जगाला गती मिळाली आहे. मोबाईल वरदान की शाप हा मुद्दाच नाहीये. त्याचा नुसता वापर होतो आहे, की उपयोग? हृदयात समथिंग वाजतं आहे की, हातातलं हृदयच एव्हरीथिंग होऊन बसलंय? की आपण यंत्रासारखे वागायला लागलो आहोत? की खऱ्या आणि खोट्या जगताला फरक लक्षात येईनासा झालाय? मला आज त्या पिंपळाच्या झाडाखाली झुल्यावर बसून हिंदोळे घेत मुक्त श्वास घ्यावासा वाटतो आहे. सोबतीला हवे आहेत काजवे, पक्षी, हत्ती, वनराजा आणि हरिततृणांची मखमल. हृदयस्पर्शी पण अशक्य वाटतं आहे ना? जरा थांबून विचार करा. घाई कशाची आहे?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article radhika deshpande on womenhood