esakal | वुमनहूड : द मास्क
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika-Deshpande

मी काही दिवसांपूर्वी लॉकडाउन उघडल्यावर माझी सायकल काढली आणि निघाले. मी १० मीटर लांब जात नाही, तोच सायकल घेऊन मागे परतावं लागलं. कारण मास्क विसरले होते. गदाधारी भीमासारखं मस्कधारी ‘मी’ ने प्रवास सुरू केला. मास्क घातल्यावर कवच-कुंडल असल्यागत मला सुरक्षित वाटत होतं आणि मास्क घातला नाही म्हणून मांजरीसारखं कोणी आडवं येणार नाही हे निश्‍चित होतं.

वुमनहूड : द मास्क

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री

मी काही दिवसांपूर्वी लॉकडाउन उघडल्यावर माझी सायकल काढली आणि निघाले. मी १० मीटर लांब जात नाही, तोच सायकल घेऊन मागे परतावं लागलं. कारण मास्क विसरले होते. गदाधारी भीमासारखं मस्कधारी ‘मी’ ने प्रवास सुरू केला. मास्क घातल्यावर कवच-कुंडल असल्यागत मला सुरक्षित वाटत होतं आणि मास्क घातला नाही म्हणून मांजरीसारखं कोणी आडवं येणार नाही हे निश्‍चित होतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी कॉलेजमध्ये असताना उन्हापासून वाचण्यासाठी ओढणीचा मास्क करून चेहऱ्यावर बांधायचे तेव्हा पोलीस पकडायचे, आता मास्क घातला नाही म्हणून पकडतील अशी परिस्थिती आहे. दुरून आपल्याकडे चालत येणारा माणूस आपला कोण लागतो हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून ओळखता यायचं, पण आता कोण कोणाचा कोण लागतो हे सांगणं कठीण झालं आहे. हा फार्स पाहून आपल्याला नीटसं हसताही येत नाही. चेहऱ्यावर मास्क लावून अनुलोम-विलोम करीत, बंदिस्त श्‍वास घेत ओठांवर येणाऱ्या शब्दांचे कंपन अनुभवत, समोरच्या माणसाने दिलेले उत्तर कानांनी चाचपडत जगण्याला पर्याय सध्या आपल्याजवळ नाही. खरंतर आम्हा कलाकारांना ‘मास्क’, म्हणजेच ‘मुखवटा’ काही नवीन नाही.

नाटकातल्या नाट्याचं प्रतिबिंब दर्शवणाऱ्या दोन हसऱ्या आणि रडक्या मुखवट्यांची जोडी तुम्ही पाहिली असेलच. त्या मुखवट्यांकडं टक लावून पाहिल्या मला वाटतं, माणसाचं आयुष्य एखाद्या नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणं सुख-दुःख या दोन भावनांनी व्यापलेलं आहे. कधी हसरा, तर कधी रडका मुखवटा चढवून जीवनाच्या रंगमंचावर वावरत असतो. कोरोनाच्या मुखवट्यानं दोन्ही मुखवट्यांवर ‘मास्क’ चढवून ठेवला आहे. असं म्हणा की, त्या मुखवट्यांना दातखीळ बसली आहे आणि ते हसतायत का रडतायत हे आपल्याला कळत नाहीये. काही दिवसांपूर्वी मनोरंजनाची रुपेरी दुनिया काही काळ थांबली. मुखवट्यांवर मास्क चढवला गेला. मास्क घातलेला मुखवटा सगळ्यांवर आरूढ झाला.

आता हसावं का रडावं हेच आपल्याला कळेनासं होतंय, नाही? डॉक्टर, नर्स, इंजिनिअर, वैज्ञानिक, समाजसेवक, नाटककार आणि इतर कोणीही असो, सर्वतोपरीनं या महासंकटातून पर्यायी मार्ग शोधण्याचा करत आहेत. मार्ग सापडंल, कारण ज्ञानमार्गातून हे शक्य होणार आहे. नाट्यकलेच्या मुखवट्यांवर कोरोनाचे मास्क चढल्यास नाट्य संपेल आणि नाट्य संपल्यास कशालाच काही अर्थ उरणार नाही, कारण नाट्यकला ज्ञानमार्गाला नवरसांची जोड देऊन आपल्या जगण्याला अर्थ मिळवून देते. जगण्याची कला नाट्यातूनच घडत असते, नाही? कोरोनाचं स्वतःचंच महानाट्य सुरू आहे. कोरोनाचा ड्रॅगन आपल्याला रंगमंचावर एन्ट्रीच घेऊ देत नाहीये. 

मुखवटा आपल्याला बरंच काही शिकवून जातो आहे. दोन तोंडी माणसांना आरसा दाखवतो आहे. मुखड्याचा अहंकार बाळगणाऱ्याला जाऊन चिकटतो आहे. खरंतर आपण वेळोवेळी आपले मुखवटे बदलत असतो. मी सुद्धा अभिनेत्री, लेखिका, शिक्षिकेच्या खुर्चीत बसण्या अगोदर माझा मुखवटा बदलते. तसं करणं गरजेचं असतं. आपण सगळेच आपल्या नाते-संबंधात तसे करत असतो. सहज अदलाबदली करणं आणि नाक-तोंड दाबून मुसक्या बांधून मास्क चढवणं यात फरक आहे, नाही? काही वर्षांपूर्वी ‘द मास्क’ चित्रपट पाहिला होता. तेव्हा वाटलं होतं की, माझ्याकडंही असा मास्क असावा. सुप्त, दडलेल्या, अशक्य वाटणाऱ्या इच्छा मी पूर्ण करू शकले असते किंवा तो मास्क घालून सुपरहीरो बनून दुर्जनांचा नाश करून सज्जनांना विजय मिळवून देऊ शकले असते. अरेच्चा! विचारांच्या जगात भ्रमंती करत असताना मला कळलंच नाही मी पोचले ते. सायकल पार्क करून, हेल्मेट जागेवर ठेवून, मी घरात पोचले आहे. हात सॅनिटाईझ केले आहेत.

आरशासमोर उभी राहून, हळूच मास्क काढून माझा मुखडा मी बघते आहे. असंख्य मुखवट्यांच्या मागे दडलेल्या मला त्या सर्वसामान्य मुलीचा चेहरा दिसतो आहे, जिच्या मनगटात आहे, विचारांमध्ये सामर्थ्य आहे आणि असंख्य आशेची किरणं डोळ्यातून व्यक्त होताहेत. आणि ओठांवर शब्द फुटत नसले, तरी तिच्या अंतःकरणातून एकाच आवाज निघतो आहे, ‘हे ही दिवस जातील. गो कोरोना, गो.’

Edited By - Prashant Patil

loading image