esakal | वुमनहूड - आम्ही शाळेत जाणार नाही / आहोत.... 
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika-Deshpande

‘इथं कोणा कोणाला अजूनही शाळेत जावंसं वाटतंय, त्यांनी हात वर करा. जो आधी हात वर करेल, त्याला बोलण्याची संधी मिळंल,’ असं माझ्या शिक्षिकेनं सांगितलं. ‘बाई मी’, असं म्हणत मी हात वर केला. बाईंनी मला बोलण्याची संधी दिली. ‘बाई, शाळा कधी सुरू होणार,’ असं विचारलं आणि मी स्वप्नातून जागी झाले. लक्षात आलं, मी शाळा कधीच सोडली.

वुमनहूड - आम्ही शाळेत जाणार नाही / आहोत.... 

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री

‘इथं कोणा कोणाला अजूनही शाळेत जावंसं वाटतंय, त्यांनी हात वर करा. जो आधी हात वर करेल, त्याला बोलण्याची संधी मिळंल,’ असं माझ्या शिक्षिकेनं सांगितलं. ‘बाई मी’, असं म्हणत मी हात वर केला. बाईंनी मला बोलण्याची संधी दिली. ‘बाई, शाळा कधी सुरू होणार,’ असं विचारलं आणि मी स्वप्नातून जागी झाले. लक्षात आलं, मी शाळा कधीच सोडली. खरंच आपलं शाळेत जाणं सुटतं? बालपणी शाळेत विद्यार्थी म्हणून, मग शाळेत जाणाऱ्या मुलांचे पालक म्हणून आणि मग आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून इच्छुक विद्यार्थ्यांचे शिक्षक बनून आपली शाळा सुरूच राहते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी शाळेत जायचे तेव्हा माझे वडील आणि गुरू संजय पेंडसे त्यांच्या दिग्दर्शनाखाली शेखर लाड यांनी लिहिलेल्या ‘आम्ही शाळेत जाणार नाही’ नाटकात काम केलं होतं. माझ्या वडिलांनी त्यांच्या दिग्दर्शनातून विद्यार्थ्यांच्या समस्यांवर भाष्य करणारं, मुलांनी सादर केलेलं, मुलांचं नाटक उभं केलं. प्रेक्षकांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक वर्ग. या नाटकाचे अनेक प्रयोग नागपूरच्या शाळा शाळांतून होऊन तेव्हाच्या शिक्षण पद्धतीत सकारात्मक बदल झाले. ‘छान झालं हं तुझं काम,’ असं म्हणत माझ्या शिक्षिकेनं पाठीवरून हात फिरवला. नाटकामुळं मला शिक्षण पद्धतीकडं पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. मी आनंदाने शाळेत जायला लागले.

मात्र आज शाळा कुठं आहे? दप्तर, टिफिन, वह्या-पुस्तकं, हक्काचा बेंच, मधली सुट्टी, स्कूलबसचा प्रवास, फळा, रंगीत खडू आणि चापून चुपून घातलेल्या दोन वेण्या, गुड मॉर्निंगचं गाणं, वर्गाच्या बाहेर उभं राहणं, मैत्रिणीसाठी जागा पकडणं, प्रमुख पाहुण्यांचं भाषण डोक्यावरून गेलं तरी टाळ्या वाजवणं हे सगळं आज कुठं आहे? कोरोनाच्या काळात ‘व्हर्च्युअल स्कूल’ सुरू करावं लागलं, ती काही खरीखुरी शाळा वाटत नाही. अनेक गोष्टी समजेना झाल्यावर मी  गुरूस्थानी असलेल्या ब्ल्यू रिज पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता क्षीरसागर यांना फोन लावते. परवा असाच फोन करत वेडा प्रश्‍न केला, ‘मला असं का होतंय?

मला शाळेत जावंसं का वाटतंय?’ त्या हसून म्हणाल्या, ‘कारण तुला अभ्यास करायचा नाही. तुला तो गंध, स्पर्श, तो जिव्हाळा घरात बसून मिळत नाहीये. विद्यार्थी एकमेकांचा सहवास घडावा आणि साऱ्यांनी अनुभवांनी शिकावं म्हणून येतात. हेच नेमकं घरात बसून होत नाहीये. कोरोनानं घरबसल्या
प्रत्येकाची शाळाच घेतली आहे. मुलांचा गोंगाट, शाळेची घंटा आणि मुलांची धावपळ बघायला डोळे आतुरले आहेत. मुळात आत्ताची घरात भरलेली शाळा केवळ पर्याय आहे. कायमचा इलाज कसा असू शकेल? शेकडो वर्षांपासून चालत आलेली गुरुकुल पद्धती आणि गुरू-शिष्य परंपरा मोडून काढण्याइतपत कोरोना शक्तिशाली नाही. काही गोष्टी खोडून नव्यानं लिहून काढण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

प्रत्येक शिक्षक आज विद्यार्थीदशेत पोचला आहे आणि प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्याला शिकवू शकेल अशी परिस्थिती आहे. बालपण मागून मिळत नाही मोठेपण अनुभव आल्याशिवाय येत नाही. मोठी हो आणि सध्या तरी तुला आवडत नसलेल्या शिक्षकांकडून तुला न आवडणारा धडा घे. कारण शिक्षण घेणं खडतर व्रत आहे आणि ते तू पूर्ण करायलाच हवं.’ मी ‘हो’ म्हणत परत प्रश्‍न केला, ‘मग शाळेचं काय? शाळा कधी सुरू होणार?’ त्या हसून म्हणाल्या, ‘लवकरच!’ मला माझं उत्तर मिळालं. किमान माझ्या मुलीचं आणि माझं ठरलं आहे. कोरोना घरात दामटून सारखे धडे गिरवायला लावतो आहे. असं कोणी शिकवतं का? अशा बंदीशाळेत आम्हाला जायचं नाही. लवकरच बाहेर पडून चिमण्यांची शाळा भरताना आम्ही पाहणार आहोत. आमची शाळा खूप मोठी आहे. घराबाहेर पडून ती सुरू होते. शाळेची घंटा वाजेलच. बाहेर पडूया आणि ‘अ’पासून ‘ज्ञ’पर्यंत नव्यानं शिकूया..

Edited By - Prashant Patil

loading image