वुमनहूड : आमचे 'कला-कार'!

Radhika-Deshpande
Radhika-Deshpande

मी काही आठवड्यांपूर्वी ‘सवत माझी लाडकी’ या नावाने माझ्या ‘लाडो’बद्दल, म्हणजेच कारबद्दल लेख लिहिला होता. मी कधीतरी तिला ब्युटी पार्लरमध्ये ट्रीटमेंटसाठी नेते. त्याला ‘स्पा ट्रीटमेंट’ म्हणतात. यंदा ‘लाडो’ला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली, तीही खास लोकांकडून. तिच्या हक्काच्या पार्किंगमध्येच तिचं व्हॅक्यूम क्लिनिंग, शॅम्पू वॉश, डॅशबोर्ड पॉलिश, म्हणजे सोप्या भाषेत मॅनिक्युअर, पेडिक्युअर, हेड मसाज आणि वॅक्सिंग झालं. मी दोन कारणांसाठी खूष आहे. एकतर माझ्या सखीला ‘क्लीन अँड शाइन’च्या टीमने घरी येऊन ट्रीटमेंट दिली आणि ती देणारे होते पुण्याचे रंगकर्मी! होय, हे कलाकार लॉकडाउनआधी नाटकाचे बॅकस्टेज सांभाळत आणि आता कोरोनाच्या काळात त्यांनी हा पर्यायी व्यवसाय म्हणून निवडला आहे... 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना काळात आपण सगळेच मानसिक, आर्थिक उलथापालथीतून सावरण्याच्या प्रयत्नात आहोत. आमचे कलाकार मित्रही यातून सुटलेले नाहीत. मनोरंजन हे प्राथमिक गरजांमध्ये मोडत नसल्याने अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय गेले. या परिस्थितीत आम्ही कलाकार मंडळींनी या मित्रांना मदत करायचं ठरवलं आणि जमेल तशी मदत केलीही. मात्र, हा काळ २-३ महिन्यांसाठी मर्यादित नाही. त्यामुळे प्रत्येकानं पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. अशा वेळी राहुल जोशी यांना सुचलेली ‘कार वॉश’ची कल्पना गणेश माळवदकर, यशोदीप खरे, पुष्कर देवगावकर यांनी उचलून धरली. मी त्यांचं बघितलं. मला त्यांचं कौतुक वाटलं. ते ‘लाडो’ला रंगमंचाप्रमाणंच तयार करत होते.

रंगमंच व्यवस्था पाहणाऱ्या गणेशनं व्हॅक्यूम क्लिनर हातात घेतला, लाइटस् पाहणाऱ्या यशोदीपनं सफाई कुठून करायची, कुठं किती वेळ लागेल आणि त्याला काय काय लागणार आहे हे राहुलला सांगितलं आणि डॅशबोर्ड पॉलिश करायला घेतला. यशोदीप म्हणाला, ‘‘हे लाईटप्रमाणंच आहे. कसा आणि कुठल्या रंगाचा लाईट पाडायचा आहे, त्या प्रमाणं मी पॉलिशिंग करतो.’’ आमचा मेकअप करणाऱ्या पुष्करनं तितक्याच तन्मयतेनं बाहेरून वॅक्स पॉलिश करायला घेतलं. मॅनेजमेंट पाहणारे राहुल हातात पॉलिश, फडकी, ब्रश, एक बादली पाणी घेऊन उभे होते. एखादा रंगमंच सजतो आहे, असंच मला वाटत होतं.

पडद्यामागील रंगकर्मी कामात वाघ असतात. त्यांच्याकडं प्रत्येक समस्येवरचा तोडगा असतो. त्यांना नवीन काहीतरी सुचत असतं आणि कल्पकता असते. आम्हा कलाकारांना हाती घेतलेल्या कामात स्वतःला झोकून द्यायची सवय असते. प्रेक्षकांच्या टाळ्यांमध्ये आमचा आनंद असतो. गरजू, कष्टाळू, जिद्दी आणि तितकेच नम्र आणि संयमी बनायला आम्हाला आमची कर्मभूमी शिकवते. रंगभूमीची पूजा करून तिच्याशी प्रामाणिक राहणारे कलाकार पडेल तेव्हा कंबर कसून काम करायला तयार असतात आणि कुठल्याही परिस्थितीत मान ताठ ठेवून, चेहऱ्यावर स्मित ठेवून आत्मविश्वासानं सामोरे जायला आम्हाला आमची उदात्त रंगभूमीच शिकवते. माझे वडील म्हणतात, ‘‘राधिका तू एक कलाकार आहेस. पडेल ते काम करायला शिकायचं.’’ आई म्हणते, ‘‘कोणालाही मदतीचा हात द्यावा लागल्यास सर्वांत आधी तुझा हात पुढं आला पाहिजे.’’ सध्याच्या परिस्थितीत ही वाक्य मी कायम लक्षात ठेवते. 

माझ्या ‘लाडो’ला तयार करणाऱ्या कलाकारांबरोबर काढलेला हा फोटो अशाच एका प्रयत्नाचं उदाहरण. नवीन काही करू पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराला माझ्या शुभेच्छा आहेत. पुण्याच्या या रंगकर्मींनी सर्वांसाठी उदाहरण घालून दिलं आहे. मी त्यांची सातवी प्रेक्षक (कस्टमर) आहे. मी ‘लाडो’च्या ड्रायव्हिंग सीटवर बसताच एक नवीन नाट्य रंगेल... नाटकाचं नाव असेल ‘नवराई नटली.’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com