वुमनहूड : एक ‘निरोप’पत्र

Radhika-Deshpande
Radhika-Deshpande

वर्ष २०२०,
मी तुला हे पत्र लिहिते आहे. मी ठरवलं होतं तू आल्यापासून तुला काही बोलायचं नाही. सगळं निमूटपणे सोसायचं. पदरी पडलेलं सगळं भोगायचं. झालेला त्रास, होणारी अस्वस्थता, वाढत चाललेली बेचैनी, उदासीनता, सगळं सगळं मूग गिळून सहन करायचं. सकारात्मक ऊर्जा वाढवायची, आहे त्यात सुख मानायचं, फार मोठी स्वप्नं बघायची नाही, एक एक करत दिवस पुढे ढकलायचा. एका सोशिक, सुज्ञ, कष्टाळू, कर्तृत्ववान, होतकरू, गृहदक्ष स्त्रीप्रमाणे सगळं सहन करायचं. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑक्टोबर उजाडला आहे आणि आता नऊ महिने झाले तुझा भार आम्ही वाहतो आहे. तुला सहन करतो आहे. तू सांगितल्याप्रमाणे वागतो आहोत. मूग गिळून मास्क चढवायला सांगितलेस- आम्ही ते चढवले, शंभर वेळा हात धुवायला लावलेस, धुतले. ‘बाहेर गेलात तर खबरदार’ म्हणालास, आम्ही गेलो नाही. तू आल्यापासून चांगलं काही घडलंच नाही असं नाही. वाईट काळात माणूस जास्त शिकतो. तू वाईट आहेस असं मी म्हणत नाही; पण वाईट काळ सांगून येत नाही तसा तूही आलास. आता तू वाईट का चांगला हे अद्याप आम्ही ठरवणार नाही- कारण तुझे अजून तीन महिने बाकी आहेत. आणि मग तू जाशीलच. तू येताना पिशवी घेऊन आला होतास ती भरायला घेते आणि आशा करते तू ती घेऊन जाशील. निघताना तुला उशीर नको व्हायला आणि काही राहून गेलं असं तुझं नको व्हायला म्हणून.

सांग काय भरू तुझ्या पिशवीत? बऱ्याच जणांचे पगार कमी झाले, अनेक जण उपाशीपोटी गेले, काही बेघर झाले, तर काहींना घरच्या वस्तू विकाव्या लागल्या. काहींना देवाघरी जावं लागलं, तर काही लोकांना देशोधडीला लावलंस. तू काळ बनून आलास आणि सगळ्यांवर ठरवून राज्य केलंस. राजाला रंक केलंस; पण रंक राजा बनल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही.

कोरोना घराघरांत ठाण मांडून बसला आहे. काही ठराविक लोकांनी जंगलात एका ठिणगीपासून वणवा पेटावा, तसा कोरोना पसरवायचा प्रयत्न केला. अशा संकटात सीमाविस्ताराची स्वप्नं पाहणाऱ्या शेजारच्या कर्मदरिद्री लोकांनी सीमेवर उपद्व्याप केले, अशा वृत्तींना घेऊन जातोस का?

शाळा आणि देवळांना लागलेली कुलपं आहेत ती आधी घेऊन जा. सिनेमा हॉल, नाट्यगृहं, क्रिकेट स्टेडियमच्या खुर्च्या रिकाम्या आहेत. त्यांचं रिकामपण घेऊन जा. सुशांतसिंहच्या मृत्यूचे ठोकताळे लावणारे काही मीडियावाले त्याची गरमागरम ताजी बातमी करून आपापल्या पोळ्या त्यावर भाजतात. अशा चर्चाही घेऊन जा. पालघरमध्ये साधूंना मारण्यात आलं- कारण आपली सद्सद्विवेकबुद्धी इतकी ठिसूळ झाली आहे. अशा निकामी बुद्धीला घेऊन जा. कुठे महापूर आला, तर कुठे जंगलाला आग लागून निष्पाप जनावरं गेली. ही अस्थिरता आणि अशांतता पिशवीत भरून देते आहे. आणि हो, पिशवी मोठी देते बाबा रे; पण न विसरता कोरोनाला आठवणीनं घेऊन जा.

तू काही चांगलं केलंच नाही असं मला नाही म्हणायचं, उदाहरणतः आम्हा माणसांना आरसा दाखवलास. आम्ही घरी आणि घरच्यांना वेळ द्यायला शिकलो, काही वाईट ॲप्स बंद झाली. रस्त्यावरचे अपघात कमी झाले, लाखो मदतीचे हात पुढे आले. माणसातला देव दिसायला लागला. ऑनलाईन लग्नं झाली, हळुवार पावलांनी गणपती बाप्पाही आला बरं का दारी. शिक्षणपद्धतीत सुधारणा झाली. बळीराजाला मानानं जगता यावं याकरिता पावलं उचलली जात आहेत. आम्ही २०२१ च्या तयारीला लागलो आहोत. तेव्हा तू आता जा. म्हणजे अजून काही राहिलं नाही ना रे बाबा तुझं काही?

अजून तीन महिने आहेत तुझ्याकडे. तुझ्या लेखी जे चांगलं आहे तेच तू देशील. वाईट बनायला कोणाला रे आवडतं, सांग बरं! येणाऱ्या काळात आम्ही तुला ‘मास्टर’ म्हणू. कारण तू तुझ्या पद्धतीनं आम्हाला चांगलाच धडा शिकवलास, कारण एक गोष्ट खरी आहे, आमच्या पापाचा घडा भरला होता खरा. आता आलाच आहेस तर शेवटचे तीन महिने गुण्यागोविंदाने रहा. जाताना मी तुला निरोप द्यायला असेन; पण तेवढी ती तुझी मी भरून दिलेली पिशवी मात्र आठवणीनी घेऊन जा. नेशील ना?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com