वुमनहूड : ‘मीम’पणाची नको बाधा!

Radhika-Deshpande
Radhika-Deshpande

काही दिवसांपूर्वी एक ‘मीम’ तयार करण्यात आलं, ज्यामध्ये देविका आणि अरुंधती ही पात्रं दिसताहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत मी देविकाची भूमिका करते, जी अरुंधतीची खास मैत्रीण आहे. या मैत्रिणींची जोडी ‘शोले’ चित्रपटातल्या जय-वीरूसारखी गाजते आहे. त्यामुळे देविका कुठे काय करते, हे जाणून घेण्यासाठी अनेक सोशल नेटवर्किंग साइट्सवर माझी माहिती नेटवरूनच गोळा करून त्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला; ज्याला एक लाखाहून अधिक प्रेक्षकांनी बघितल्याची बातमी माझ्यापर्यंत पोचली. इतरही खूप गोष्टी झाल्या. पण, सर्वांत गंमत मला मीम्सची वाटली. अरुंधतीचं काम करणारी माझी सहकलाकार आणि मैत्रीण मधुराणी गोखले-प्रभुलकर हिच्यासोबत मी #कपलचॅलेंजबद्दल बोलते आहे, असा उल्लेख होता. या मीमला भरपूर लाइक्स आणि शेअर मिळाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अचानक मिळालेली लोकप्रियता, प्रसिद्धी हवीहवीशी वाटणं साहजिक आहे. पण, त्याचबरोबर लोकांचं आपल्याकडे लक्ष आहे, ते आपल्याला ‘फॉलो’ करताहेत आणि आपण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या नजरेखालून जाते आहे, हेही ध्यानात येतं आहे. इथून पुढे आपण जे वागतो, बोलतो, दिसतो आणि लिहितो तेसुद्धा प्रेक्षक, समीक्षक आणि टीकाकार बघणार. त्यावर ते चर्चा करून, थोडा मीठमसाला लावून बातमी करून आणि ठोकताळे लावून निष्कर्षही लावू शकतात, याची मला कल्पना आहे. सगळ्याची गंमत वाटते आहे खरी; पण दुसऱ्या क्षणी जबरदस्त जबाबदारीही वाटते आहे हो!

माझ्यातल्या कलाकाराला कसं वाटतं आहे, दोन शब्दांमध्ये सांगू? ‘शुभमंगल’ आणि ‘सावधान’! प्रसिद्धीची हवा माझ्याकडे येते आहे म्हटल्यावर ‘शुभमंगल’ होणारच; पण ‘सावधान’ यासाठी; कारण माझी परिस्थिती म्हणजे अगदी त्या बोहल्यावर उभ्या असलेल्या नववधूसारखी आहे. सगळ्यांचं लक्ष तिच्याचकडे. काही जण वधू पाटावरून घसरते का हे पाहण्यासाठी उत्सुक, तर बरेच जण ती समोर उभ्या असलेल्या वराच्या गळ्यात हार कसा घालते तो क्षण बारीक लक्ष देऊन एकाग्रतेनं पाहणार. मालिकेतली भूमिका प्रेक्षकांच्या घराघरांत पोचून त्यांच्या मनात घर करायला लागली, की अपेक्षा वाढतात. प्रेक्षकांचं अमाप, अफाट प्रेम मिळतं. पण, जरा पाऊल वाकडं पडलं, तर रोषही सहन करावा लागतो आणि परिस्थितीला तोंड द्यावं लागतं.

अशी परिस्थिती माझ्यावर उलटली, तर आपण ट्रोल झालो तर, नापसंत ठरलो तर, अशी मला भीती नाही. पण, अचानक मिळालेली प्रसिद्धी अचानक गायब झाली तर, अशी मनात पाल चुकचुकते, तेव्हा मी स्वतःला समजावते. ‘प्रसिद्धी’ म्हणजे बर्फाच्या शिखरावर लिहिलेली अक्षरं आहेत आणि कधीतरी त्या अक्षरांवर सूर्याची तिरीप पडली तर ती विरघळणार हे ध्यानात असू दे.

कलाकारांनी आपलं काम करत राहावं. आज मीम्स आले म्हणून फार हुरळून जाऊ नये किंवा उद्या व्यंग्यचित्र काढलं म्हणून राग किंवा वाईटही मानू नये. शेवटी कलाकार रसिकप्रेक्षकांसाठी असतो. खरंतर देविकावर लिहिणारे, बोलणारे, मीम्स बनविणारेसुद्धा कलाकारच. त्यांनीसुद्धा वेळ काढून, कल्पनाशक्तीला ताण देऊन आणि मेहनत घेऊन कलात्मकरीत्या लोकांपर्यंत मीम्स पोचवली. मीसुद्धा शोधून काढलं, की मीम्स बनविणारे हे कलाकार आहेत तरी कोण? रेश्मा शिंदे हिनं तिच्या कल्पनेतून ही मीम साकारली आहे. तिचा उल्लेख मुद्दाम करते आहे. देविका असो वा राधिका, इथं प्रत्येक जण आपली भूमिका निभावत आहे. त्याला उचलून धरायचं  का मोडून काढायचं, हे काय ते मायबाप प्रेक्षकांवर अवलंबून आहे. एका कलाकाराच्या आयुष्यात हेच काय ते शाश्वत आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com