वुमनहूड : ‘काटा’ आणणारं ‘वजन’

वुमनहूड : ‘काटा’ आणणारं ‘वजन’

वजन म्हटलं, की लोकांच्या अंगावर ‘काटा’ येतो. वजन हा शब्दच मुळात वजनदार आहे, त्यामुळे त्याला दुर्लक्षित करणं सोप्पं नाही. वजन हा शब्द जेवढ्यांदा आपण घेऊ तेवढं त्याचं जडत्व वाढतं आणि एकदा का तो अंगाला चिकटला, की मग कॅलरीज, फॅट्स, बॉडी मास इंडेक्ससारखे शब्दही आपल्याला चिकटतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला आठवतं आहे. कॉलेजच्या ट्रेनिंगसाठी मी मुंबईला पंचतारांकित हॉटेलात काम करत असताना पार्ले ते अंधेरी लोकल ट्रेननं मुंबईत प्रवास करायचे. तेव्हा ट्रेनमध्ये फोन नंबरसहित लिहिलेलं असायचं, ‘वजन घटादो’ किंवा ‘लूज वेट नाऊ, आस्क मी हाऊ.’ मला सुरुवातीला काही कळायचं नाही. नेमके कुठले व्यायामप्रकार आणि गोळ्या देत असतील बरं? पंचतारांकित हॉटेलमध्ये इन हाउस जिम होती. तिथं वजन कमी करण्यासाठी जागच्या जागी धावतात आणि स्वतःला हलकं वाटण्यासाठी वजन उचलतात, हे पहिल्यांदाच पाहिलं.

मुळातच लहानपणापासून काटक, त्यातून धावपटू; शिवाय दोन वेळचं आईनं वाढलेलं सगळं संपवायचं. बाहेरचं जेवण महिन्यातून एकदा कधीतरी. तेव्हा झिरो फिगर मुलांनासुद्धा माहिती नव्हती. फिगर होती ती फक्त गणित आणि चित्रकला या विषयात. वजन होतं कष्टानं कमावलेल्या नावाला आणि शब्दाला वजन होतं त्याच माणसाला, जो ‘बोले तैसा चाले’ या म्हणीला जगला... पण, आता तसं नाही. आता ज्यांची पोटं बाहेर असतात, ज्यांचे पगार गलेलठ्ठ असतात आणि पाकिटात पगार मावेनासा होतो, असे लोक माझ्याबरोबर जिममध्ये ट्रेडमिलवर दिसतात. लहानपणी शाळेत न्यायला-आणायला हातरिक्षावाले काका असायचे. ते त्यांच्या रिक्षात आम्हा मुलांना बसवून घाम गाळत मोठ्या कष्टानं अंगाची झीज करत शाळेत पोचवायचे. त्यांच्याकडे बघून कष्टाचं महत्त्व कळलं. पण, त्याचबरोबर असंही ठरवलं होतं, की मोठं झाल्यावर आपलं वजन यांच्यापेक्षा जास्तच असायला हवं. आता कार चालवत असताना बाकीच्यांचं वजन जाणवत नाही. पण, कधी कधी घेतलेल्या ईएमआयचं वजन जाणवतं. आता काहीच पूर्वीसारखं राहिलेलं नाही. माझं स्वतःचं वजनसुद्धा नाही. शेवटी कसं आहे. सगळ्या गोष्टी वाढण्यासाठी आहेत. वाढतावाढता वाढत जाऊन शून्य मंडळाला भेदायचं आहे. 

आपण लोकांच्या सांगण्यावरून डाएट हा प्रकार जेवणात आणतो. कारण, एव्हाना बालपणी नुसताच पाठ केलेला श्लोक आपण विसरलो आहोत किंवा त्यात डाएटचा चातुर्यपूर्वक उल्लेख आहे, हे आपल्या लक्षात राहिलेलं नाही. ‘उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म’ म्हणजे काय आपण समजूनच घेत नाही.

शेवटी मी फक्त माझ्या लिखाणात वजनी वाक्यांचा वापर करून वजनदार करते आहे. त्याशिवाय का तुम्ही इथवर वाचणार आहे? एकदा का हे वजनदार वाक्य उतरवलं, का मला हलकं वाटणार आणि मी मोकळी होणार. कशासाठी? अहो, फराळ घेतला आहे करायला. दिवाळी आहे ना. डबे भरायला हवेत. निदान भरायला घेताना तरी कॅलरीज आणि फॅट्स कमी होतील. पुढचं पुढे. मी तुम्हाला इथं काहीच सुचवायला जात नाही आहे, नाहीतर तुम्ही म्हणाल फुकटचे सल्ले देते आहे म्हणून. हां... पण हे सगळं खाल्ल्यावर तुम्ही वजनाचा विचार कराल, हे मला माहिती आहे. त्यामुळे तो तुम्ही आधीच करा... आणि हो... नुसता विचार करून, नुसतंच पाणी पिऊन आणि पुस्तकं वाचून वजन कमी होत नाही. दुसऱ्यांनी वजन कसं कमी करायचं, हे सांगून किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तर नाहीच नाही. अहो, वजनाचं सोडा. आधी जगून पाहा. मस्त खा, स्वस्थ राहा, मज्जा करा. अहो, हा पृथ्वीवरचा कधीही न संपणारा वजनदार विषय आहे. शेवटी आपल्याच कर्माची फळं, दुसरं काय! चला. कामाला लागूया.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com