वुमनहूड : दगड

Radhika-Deshpande
Radhika-Deshpande

दगडी भिंत, दगडी चाळ, दगडूशेठ हे तुम्ही ऐकून असाल. रस्त्यावरचे दगड, डोंगरावरचे दगड, पायाखालचे दगड हे तुम्ही पाहिले असतीलच; पण तुम्हाला ‘माझे’ दगड माहीत नसतील. खरं तर दगड या विषयावर तू लिहावंस, अशी फर्माईश माझी मैत्रीण डॉ. विलासिनी चौधरीनं केली आहे. म्हणून मी जीव... आपला दगड मुठीत घेऊन हा लेख लिहायला घेते आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...तर मला दगड वेचायला आवडतात आणि मी ते घरी घेऊन येते. हा छंद मला कसा लागला त्याची एक छोटीशी गोष्ट आहे. माझे आजोबा देवाची पूजा करायचे. आठ वर्षांची असताना मी एकदा त्यांच्या बाजूला पूजेला बसले. माझी नजर देव्हाऱ्यात असलेल्या शाळिग्रामावर पडली. त्यांनी मला तो पुसून ठेवायला सांगितला. शाळिग्राम एक उभट, गोल, गुळगुळीत, सुंदर, आकर्षक दगड असतो. मी त्याने मोहित झाले आणि त्याच संध्याकाळी हळूच तो काढून घेतला. रात्रभर उशाशी ठेवून कोणाच्याही न देखत त्याला हातात घेऊन पाहत बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी आजोबांनी देव्हाऱ्यात पाहिलं, तर शाळिग्राम नाही. घरात बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि माझ्या कानावर पडली.

माझ्या कानाखाली उशी आणि उशीखाली शाळिग्राम होता. यापुढे त्याला देव्हाऱ्यातून उचलायचा नाही, अशी मला ताकीद देण्यात आली. हळूहळू माझं दगडप्रेम वाढत गेलं. समुद्रकाठी लोक पाण्यात खेळतात, रेतीची घरं बनवतात; पण तुम्हाला मी दगड वेचताना दिसेन. नदीकाठी गेलो, तर तिथंही मी पाण्यातले दगड शोधताना दिसेन. डोंगरावर चढताना मी मागे राहिले, तर समजावं- मला एखादा सुंदर दगड सापडला आहे.

दगड माझ्याशी बोलतात. त्यांची स्वतःची कहाणी असते. काही राजबिंड्या राजकुमारापेक्षाही देखणे, तर काहींचा स्पर्श गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षाही लुसलुशीत वाटतो. खरं तर ही सगळी माझी माणसं आहेत. मी वेचलेली, माझी झालेली. काही दगडांना स्पर्श केल्यावर माझ्यात खोल खोल पाणी वाहते आहे असा भास होतो, तर एखादा दगड हातात धरून ठेवावासा वाटतो आणि त्याच क्षणी मी माझे डोळे घट्ट मिटून घेते. त्यांच्याकडे प्रेमानं बघता आलं पाहिजे. वेळ काढून त्यांच्याबरोबर बसलात, तर ते तुम्हाला पैलतीरी नेतील, तर कधी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतील.

दगडांकडून कितीतरी गोष्टी िकण्यासारख्या आहेत. बघा ना, राग आला की लोक दगडाला लाथ मरतात. मनासारखं झालं नाही, तर तोच दगड पाण्यात फेकतात. आपण त्याच्यावर पाय देतो, तेव्हा चूंसुद्धा करत नाही. उलट आपल्या यशाची पायरी होणं दगड पत्करतो. भिंत बनून शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी उभा राहतो. कधीतरी एकटाच डोंगरावर टोकाशी तटस्थ, एखाद्या सर्कशीतल्या कलाकाराला लाजवेल अशी करामत दाखवत उभा राहतो. दगडाला कधी कमी लेखू नये, तुच्छ समजू नये. आपल्यापेक्षा त्याची संख्या जास्त आहे. मनात आणलं, तर प्रलय आणू शकतो आणि मनोभावे पूजाल तर किमया अशी, की त्यात देव दिसायला लागतो. 

आमच्या समोरच्या खोलीत फ्लॉवरपॉट नसून स्वच्छ धुतलेल्या दगडांनी भरलेला ‘दगडपॉट’ आहे. त्यात तुम्हाला विविध रंगांचे आणि आकारांचे दगड बघायला मिळतील. लेह-लडाख ते कन्याकुमारीचे दगड माझ्याकडे आहेत. गंगा नदीत डुबकी मारत असताना अचानक माझ्या पायाला लागलेला दगड आहे. तो मी तिनं दिलेला आशीर्वाद मानते. फार दगड वाढले, की मी त्यांची समजूत घालते. मनावर दगड ठेवून त्यातले काही वाहत्या नदीत परत सोडते. फार अडकून पडायचं नसतं. काही जन्मोजन्मांचे सोबती. तर काही त्या क्षणांचे सोबती. दगड वेचणारी मी एक वेडी. यातून नेमकं काय मिळतं मला ठाऊक नाही; पण पावलं आपोआप थबकतात. नजर त्याच्यावरच पडते. गुडघे वाकतात. मान खाली जाते. हात हळूच त्याच्यापाशी जातात. तो अलगद माझ्या तळहातावर येतो. मी हळूच त्याला विचारते, ‘‘बोल, काय करू मी तुझं?’’ पुढचं त्याच्या मर्जीवर असतं... दगडालाही मन असतं.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com