esakal | वुमनहूड : 'सवत' माझी लाडकी
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika-Deshpande

आमच्या लग्नानंतर काही महिन्यांतच ही लावण्यवती, प्रेमाच्या लाल रंगात न्हाऊन, नववधूप्रमाणे आमच्या आयुष्यात आली. हिच्या गुणांमुळे, रंगामुळे ती आतून बाहेरून सुंदर आहे हे पाहूनच माझ्या नवऱ्याने हिला पसंत केले होते. ही त्याची पहिली कार आणि माझी सवत ‘लाडो’. तिच्या लालचुटूक रंगामुळे ‘लाडो’ हे त्यानेच ठेवलेले नाव.

वुमनहूड : 'सवत' माझी लाडकी

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे)

आमच्या लग्नानंतर काही महिन्यांतच ही लावण्यवती, प्रेमाच्या लाल रंगात न्हाऊन, नववधूप्रमाणे आमच्या आयुष्यात आली. हिच्या गुणांमुळे, रंगामुळे ती आतून बाहेरून सुंदर आहे हे पाहूनच माझ्या नवऱ्याने हिला पसंत केले होते. ही त्याची पहिली कार आणि माझी सवत ‘लाडो’. तिच्या लालचुटूक रंगामुळे ‘लाडो’ हे त्यानेच ठेवलेले नाव.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

मला लहापणापासूनच कारची हौस नव्हती. भातुकलीचा खेळ आणि बाहुला-बाहुलीचं लग्न यातच मी रमायचे. लहानपणी माझ्या लहान भावाच्या हातातील खेळण्यातली कार माझ्या पाठीवरून चालवून तो माझ्या डोक्यावरून नाकावर आणून उतरवायचा, तेव्हापासून कार माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या डोक्यात जायची. 

आम्हा बायकांना एक कोडंच आहे. पुरुष मंडळींमध्ये चारचाकी वाहनाकडे बघून रोमांच कसा संचारतो? एखादी देखणी कार रस्त्यावरून गेली, की त्यांच्या भुवया उंचावतात, जबडा खाली आणि माना कशा वळू शकतात? तेही त्यांच्या डाव्या बाजूला त्यांची सुंदर सहचारिणी बसली असताना? आमची लाडो चौदा वर्षांची झाली आहे आणि दिवसागणिक नवऱ्याचं तिच्यावरचं प्रेम मी वाढतानाच पाहिलं आहे. स्त्रीसुलभ स्वभावाला हे सगळं पचवणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नसतं. कार आल्यानंतरचे नवरा-बायकोतले संवाद असे होतात. उदाहरणार्थ आमच्या दोघांतले संवाद. 
मी : चल, आपण आपल्या नवीन कारमध्ये बसून भाजी आणू. 
तो : नको नको तिथे लोक कसे चालतात आणि कशीही गाडी चालवतात. मी नाही कारला तिथे नेणार. 
मी : आज मस्त लाँग ड्राइव्हला जाऊ. 
तो : नको. लाडोचं सर्व्हिसिंग व्हायचं आहे. लांब कुठे घेऊन जायचं तिला. 
मी : चल, मस्त पाऊस पडतोय, सिंहगडावर जाऊ. 
तो : हो, पण जाताना दोन जोड घेऊन जाऊ. चिखलाचे पाय कारमध्ये आणाल. 
मी : चला निघूया. बरं मी कशी दिसते? 
तो : काही म्हणालीस? कार पुसत असल्याने तुझ्याकडे लक्षच गेलं नाही. 

पण माझ्या लक्षात आलं ही लाडो पार्किंगमध्ये दिमाखात उभी आहे, तोपर्यंत तिचेच लाड होणार. मग मीही इलेक्ट्रिक कार घेतली. तिचं नाव ‘भुका’ असं ठेवलं. तिला ‘सखी’चं स्थान दिलं; पण लाडोला मात्र नेहमीच खालच्या नजरेनं पाहिलं. तिला नेहमी सवतीचं स्थान दिलं. मग माझी सवत माझी लाडकी कशी, असा प्रश्‍न पडला असेल ना तुम्हाला? मी घेतलेली कार इलेक्ट्रिक, ती पुण्यातल्या पुण्यात नेता येत होती.

शूटिंगसाठी मुंबईला जायचं म्हटलं तर मला लाडोशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा मी आणि ती अधिक जवळ आलो. गेली सहा वर्षं आम्ही शेकडो वेळा मुंबई- पुणे असा प्रवास एकत्र केला आहे. एकमेकांबरोबर, एकमेकींसाठी असं म्हटलं तरी हरकत नाही. लाडोला निरोप देण्याची वेळ आली आहे आणि डोळ्यांतून अश्रू थांबतच नाहीत.

आमच्या बाळाला तूच सुखरूप घरी घेऊन आलीस. आई-बाबांना आपल्या मुलाच्या पहिल्या कारचा आनंदही तूच दिलास. नाटकाला लागणारं संपूर्ण नेपथ्य तू स्वतःमध्ये सामावून घेतलं. आइस्क्रीम पार्टी असो किंवा नाश्ता असो. रात्री-बेरात्री मी तुझ्याच भरोशावर घरी सुखरूप पोचले आहे. तुझ्यात बसून मी रडले आहे, आनंदी क्षण आठवून सुखावले आहे, एकटीनेच बडबड केली आहे, अनेकदा तुझ्यात बसून मला कथा, कविता सुचल्या आहेत. घरातल्या भिंतींना कान असतात, तुला तर भिंतच नाही. फक्त दार. जे मला आत घेण्यासाठी कायम आतूर. तू लवकरच जाणार. तुझं न् माझं नातं सवतीचं; पण बंध घट्ट होते. सखे, माझं तुला सांगणं एकच. ‘जाते आहेस तर जा बापडी. पण बाईची जात आहेस. जरा जपून जा गं बाई आणि सोबतीला माझ्या प्रेमाची शिदोरी बांधून देते आहे. तेवढी घेऊन जा. नाही म्हणू नकोस.’ ‘सवत’ माझी लाडकी. लाडो.

loading image
go to top