मेमॉयर्स : आईमुळेच घराला घरपण

Rupali-Bhosale
Rupali-Bhosale

आईबद्दल काय बोलावं, कुठून सुरू करावं, हेच कळत नाही. तिच्याबद्दल सांगण्यासाठी शब्द कमी पडतील. आई-बाबा आणि भाऊ माझ्यासाठी श्‍वास असून, ते माझे विक पॉइंट आहेत. त्यामुळं त्यांच्याविषयी मी भरभरून बोलते आणि मला त्यांचा अभिमानही वाटतो. माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण माझी आई. आजही मी तिच्याशी सर्वकाही मनमोकळेपणानं बोलते. मी तिला मोठ्यातली मोठी आणि छोट्यातली छोटी गोष्टही सांगते. आम्ही नेहमीच मैत्रिणीसारख्या गप्पा मारतो.

अनेकदा बाहेर जेवण करायला गेलो, तरी भरभरून बोलतो. ‘‘मी ‘व्हॅलेंटाइन डे’लाही आईला शुभेच्छा देते. ‘मदर्स डे’ एक दिवसापुरता साजरा न करता नेहमीच तिच्याबद्दल बोलून प्रेम व्यक्त करते. सकाळपासून रात्रीपर्यंत आई कुटुंबासाठी उभी असते. काही ना काही करीत असते. मात्र, आपण तिला गृहीत धरतो आणि तिचे आभार मानायचे राहूनच जातात. 

आपल्याकडून काही चूक झाल्यास ती समजून घेते. ती नेहमीच पाठिंबा देते. तिची ही स्ट्रेंथ अमूल्य आहे. अभिनय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी मला फोटोशूट करायचं होतं. त्या वेळी फोटोग्राफर वगैरे काही नव्हतं. स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढावे लागत.

फोटोशूटसाठी आम्ही स्टुडिओत गेलो आणि किती पैसे लागतील विचारले. त्यांनी सात हजार रुपये सांगितले. ही रक्कम आमच्यासाठी खूप होती. पण, फोटोशूट करिअरसाठी खूपच गरजेचं होतं. त्यामुळं आईनं स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून फोटोग्राफरला पैसे दिले. खरंतर या आणि अशा अनेक गोष्टी मनाच्या कप्प्यातच राहतील. 

माझ्या बाबांचं ऑपरेशन झाल्यावरही आई खंबीरपणे उभी राहिली. मला आठवतंय, त्या वेळी मी पहिलीला होते आणि भाऊ खूपच लहान. त्या वेळीही आईनं कुटुंबाला उभारी दिली. ती जशी भोसले यांच्या घरामध्ये हसतमुखानं आली, तसंच मला तिला कायमच पाहायचं आहे. माझं या मैत्रिणीवर खूप प्रेम आहे. तिला किती धन्यवाद द्यावे, हे कळत नाही. तिनं आम्हा सर्वांवरच भरभरून प्रेम केलं. तिच्यामुळंच आमच्या घराला घरपण आलं. त्यामुळं ती घरात नसल्यास घर शांत, उदास वाटतं. आई कायमच जवळ हवी. तिला हेल्दी आणि वेल्दी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा. 
(शब्दांकन - अरुण सुर्वे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com