esakal | मेमॉयर्स : ‘आई हा माझा आत्माच’
sakal

बोलून बातमी शोधा

Rutuja-Bagave

खरं तर आईबद्दल बोलताना मला खूपच कमाल वाटतं. कारण, मी कमाल बाईच्या पोटी जन्म घेतल्याचं मला सतत जाणवत असतं. माझी आई डॉ. प्रतिभा बागवे ही माझा आत्मा अन् ईश्‍वरही आहे. तिच्याबद्दल जितका आदर आहे, तितकीच ती माझी मैत्रीण आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी मी तिला मनमोकळेपणाने सांगू शकते. आज मी अभिनेत्री म्हणून किंवा माणूस म्हणून आहे, हे केवळ तिच्यामुळेच. अभिनयाचे पहिले धडे तिनंच मला दिले.

मेमॉयर्स : ‘आई हा माझा आत्माच’

sakal_logo
By
ऋतुजा बागवे, अभिनेत्री

खरं तर आईबद्दल बोलताना मला खूपच कमाल वाटतं. कारण, मी कमाल बाईच्या पोटी जन्म घेतल्याचं मला सतत जाणवत असतं. माझी आई डॉ. प्रतिभा बागवे ही माझा आत्मा अन् ईश्‍वरही आहे. तिच्याबद्दल जितका आदर आहे, तितकीच ती माझी मैत्रीण आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी मी तिला मनमोकळेपणाने सांगू शकते. आज मी अभिनेत्री म्हणून किंवा माणूस म्हणून आहे, हे केवळ तिच्यामुळेच. अभिनयाचे पहिले धडे तिनंच मला दिले. कारण, तिला अभिनेत्री व्हायचं होतं; पण त्या वेळी घरून तिला सपोर्ट मिळत नव्हता. राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा ती करत होती. आकाशवाणी, ‘सह्याद्री’ला ती कार्यक्रमाला जात होती; पण पूर्णपणे अभिनयातच जाण्यासाठी फारसा पाठिंबा नव्हता. त्यामुळे तिला मेडिकलचा अभ्यास करावा लागला. आता ती डॉक्टर म्हणून काम करत आहे; पण लहानपणापासून कुठे ना कुठे ती माझ्यात अभिनय रुजवत होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लहानपणी आई मला वक्तृत्व, वेशभूषा, एकपात्री स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत असे. त्यामुळे मला अभिनयाची गोडी लागली. तिनं लहानपणी मला प्रत्येक सुटीत अभिनयाच्या शिबिरांमध्ये पाठवलं. भरतनाट्यम शिकवलं. तिनं माझी एकही मोठी सुटी वाया नाही घालवली. प्रत्येक सुटीत काही ना काही शिकायला भाग पाडलं. आता मला पेटी वाजवता येते, क्राफ्टच्या गोष्टी करता येतात. स्विमिंग, हॉर्स रायडिंग करता येतं. मी रायगडला मिलिटरी स्कूलला गेले. तिथं होस्टेलमध्ये राहिले. ट्रेनिंग घेतलं.

कारण, मी कुणावरही डिपेंन्ड राहू नये, हे तिला नेहमीच वाटत होतं- कारण तीही एनसीसीमध्ये होती. भावनिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी आत्मनिर्भर कसं व्हावं, याचे धडे मला मिलिटरी स्कूलमध्ये मिळाले. मला खूप शिस्त लागली. स्वतःचे निर्णय कसे घ्यायचे, हे समजलं. व्यक्तिमत्त्व विकासासही हातभार लागला. या सर्व गोष्टी मला माणूस म्हणून घडवत होत्या अन् आईनं मला प्रोत्साहन दिलं. 

एमडी कॉलेजला असताना मी एकांकिका करत होते. त्यावेळी रात्रभर आम्ही तालीम करायचो; पण तिनं मला कधीच विरोध केला नाही. तिनं मला एकदा सांगितलं, की ‘तुला स्वातंत्र्य दिलं, त्याचं स्वैराचारात रूपांतर करू नको.’ हे वाक्य माझ्या डोक्‍यात बसलं अन्‌ आईचा विश्‍वास जपणं ही माझी जबाबदारी समजू लागले. त्यामुळे कामाच्या वेळी काम, मस्करीच्या वेळी मस्करी व अभ्यासाच्या वेळी अभ्यासच केला. पदवी सायन्समधूनच कर, ही तिची अट होती. त्यानंतर मी मॅथेमॅटिक्‍स ग्रॅज्युएट झाली. आपल्याला नुसतं अभिनेत्री नाही व्हायचं तर हुशार अभिनेत्री व्हायचं, असं आई नेहमीच सांगत होती. त्यानुसार मी मार्गक्रमण केलं. 

पीएचडी मिळवायची हे आईचं स्वप्न होतं. त्यामुळे वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी ती सिंगापूरला गेली. तिथं अभ्यास केला. परीक्षा दिली अन् तिनं पीएचडी मिळवली. शिक्षणाबरोबरच ती इतर गोष्टीही शिकत असते. तिची हीच क्वालिटी मला खूप आवडते अन् ती माझ्यातही आली. आईच माझी आयडॉल आहे. तिला पाहूनच मी मोठी झाले. घर आणि व्यवसायात ती सुवर्णमध्य गाठते.

स्वयंपाक, देखरेख, साफसफाई, अभिनय अन् मिलिटरी ट्रेनिंग मी तिच्यामुळेच शिकले. तिची मी शतशः ऋणी राहीन. अकरावीत मला बेस्ट ॲक्‍ट्रेस ॲवॉर्ड मिळालं अन् ते आईच्या हातात दिलं, त्या वेळी तिचे पाणावलेले डोळे, तिच्या डोळ्यांत दिसणारं कौतुक मला भारावून गेलं अन् त्याचवेळी मी अभिनय क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला. सध्या मी ‘कलर्स मराठी’वर ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. यापूर्वी मी ‘नांदा सौख्य भरे’, ‘गोजिरवाण्या घरात’, ‘तू माझा सांगाती’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दूर्वा’ आदी मालिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. 
(शब्दांकन - अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

loading image