डेली सोप : जुनं तेच सोनं!

ऋतुजा कदम
Sunday, 12 April 2020

लॉकडाउनमुळे आता सगळे लोक घरात आहेत. घरी बसून नेमके काय करायचे हा सगळ्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे दूरदर्शनने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा दाखवायला सुरुवात केली. दूरदर्शनसहित सगळ्याच वाहिन्या आपल्या जुन्या, लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवत आहेत.

लॉकडाउनमुळे आता सगळे लोक घरात आहेत. घरी बसून नेमके काय करायचे हा सगळ्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे दूरदर्शनने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा दाखवायला सुरुवात केली. दूरदर्शनसहित सगळ्याच वाहिन्या आपल्या जुन्या, लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय टेलिव्हिजनवर एकेकाळी राज्य करणाऱ्या काही जुन्या मालिका पुन्हा  सुरू झाल्यामुळे अनेकांना आनंद झालाय. ‘रामायण’, ‘महाभारत’ या प्रसिद्ध ऐतिहासिक पौराणिक मालिका पुन्हा टेलिव्हिजनवर सुरु करण्यात  आल्या आहेत. शिवाय प्रेक्षकांच्या आवडत्या आणखी काही मालिका प्रसारित व्हाव्यात, अशी मागणी प्रेक्षक सोशल मीडियावर करत आहेत.  लॉकडाउनमुळे सध्या सगळ्याच चॅनेल्सचे शुटिंग बंद आहे. त्यामुळे चोवीस तास द्यायचे काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. तर सगळे लोक घरात असल्यामुळे मोठा प्रेक्षकवर्ग लाभणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मालिका दाखविण्यात येत आहेत. दूरदर्शननंतर लाडक्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी झी मराठी वाहिनेनी उचलली आणि ‘तुला पाहते रे’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘जय मल्हार’ या तीन मालिका पुन्हा सुरु केल्या आहेत. 

सोनी टीव्हीनेही ‘सीआयडी’, ‘आहट’ आणि ‘ये उन दिनो की बात’ या तीन मालिका दाखवायला सुरुवात केली आहे.अनेक वर्ष छोट्या पडद्यावर चाललेली ‘सीआयडी’ खूप लोकप्रिय होती. कपिल शर्माच्या कॉमेडी शोचे शुटींगही थांबले आहे. पण, सोनी वाहिनेने जुने शो प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. या काही जुन्या भागांमध्ये कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर एकत्र काम करताना दिसत आहेत. 

दोघांमधील वादामुळे त्यांनी एकत्र काम करणे बंद केले होते. दूरदर्शनवर रामायण’, ‘महाभारत’, ‘ब्योमकेश बक्शी’ आणि ‘सर्कस’ या कार्यक्रमानंतर मनोरंजनात भर पाडली ती लोकप्रिय ‘शक्तिमान’ या मालिकेने.  कॉमेडी मालिकांनी ९०चे दशक खूप गाजवले होते. ''खिचडी'' आणि ''साराभाई vs साराभाई'' या दोन्ही कॉमेडी सिरियल्स पुन्हा सुरू होणे म्हणजे अनेकांसाठी पर्वणीच आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली होती. 

या मालिका छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस आल्या असताना सर्व कलाकार मंडळीही त्यांच्या घरी आहेत. पण, लाडक्या चाहत्यांची ते आवर्जून काळजी घेत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून चाहत्यांनी संवाद साधताना दिसतात. काही कलाकार मंडळी आपल्या मुलांसोबत चाहत्यांशी संवाद साधतात. लाइव्हच्या माध्यमातून प्रेक्षक त्यांचे प्रश्नही विचारु शकत असल्याने हा एका प्रकारचा व्हरर्चुअल संवाद घडतो. 

जुन्या मालिकांच्या प्रसारणामुळे सोशल मीडियावरही अनेक मीम्स व्हायरल होताना दिसतात. जुन्या मालिका पुन्हा एकदा बघतानाचा आनंद अनेकजण सोशल मीडियावर शेअर करत आहेत. जुन्या आठवणींना एका प्रकारचा उजाळा देण्याचा क्षण आहे. शेवटी ''जुनं ते सोनं'' असे म्हणत अनेकजण कुटुंबासोबत या मालिका पुन्हा एकदा आवडीने पाहात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rutuja kadam on old is gold