वेगळ्या वाटा : वस्ताद कौसल्या!

Kaushalya-Wagh
Kaushalya-Wagh
Updated on

रायगाव हे पंढरपूर-मल्हारपेठ रस्त्यावरच एक गाव. या परिसराला कुस्तीची परंपरा आहे. पैलवान व्हायचं हेच एकमेव ध्येय असलेली पिढी. सगळ्यालाच प्रतिकूल परिस्थितीमुळं पैलवान होता यायचं नाही. हा भाग त्या काळात दुष्काळी असल्याने बरेच जण वास्तवाचं भान आलं की, लंगोट खांद्यावर टाकून कुस्ती सोडायचे. रायगावचा कृष्णा वाघ असाच एक अर्ध्यात कुस्ती सोडलेला पैलवान. तो गरिबीला कंटाळून मुंबईला गेला. हमाली करू लागला. 

काही दिवसांनी लग्न झालं. संसारात रमला. कुस्तीचं वेड कमी झालं नव्हतं. मग त्यानं ठरवलं, आपल्या पोरांना कुस्ती शिकवायची. पोरांना, म्हणजे मुलगा विकास आणि मुलगी कौसल्याला. वयाच्या सातव्या वर्षांपासून कृष्णा भावा-बहिणीची लढत लावू लागला. त्यांना डाव शिकवू लागला. मुंबईत एका बागेत सराव घेऊ लागला. हळूहळू पोरं चांगली कुस्ती खेळू लागले. मुलीला खेळात चांगली गती होती. वडिलांना कौतुक वाटू लागलं. तिचा आत्मविश्वास वाढला.

एक दिवस गावातील यात्रेत कौसल्या कुस्तीच्या मैदानात फिरू लागली. तिच्या जोडीत लढणारी मुलगी नव्हती. मग एका मुलाशी तिची कुस्ती लागली. त्या मैदानातील सगळ्यांना या कुस्तीच एक आकर्षण होतं. मग झालेल्या कुस्तीत कौसल्यानं त्या मुलाला चितपट केलं. तिला त्या फडावर लोकांनी उचलून घेतलं. पैसे देऊन कौतुक केलं. कृष्णा वाघ यांच्या पोरीची पंचक्रोशीत चर्चा झाली. त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही. मुंबईत सराव करत असतानाच तिची भारतीय खेल प्राधिकरणात निवड झाली. रायगावची एक पोरगी कुस्ती खेळते, हा विषय चर्चेचा आणि बातमीचा झाला होता.

तिच्या नावावरून गावाची ओळख झाली.ती कुस्तीत आपलं नाव कोरत असतानाच एक दिवस बातमी आली, ‘रायगावची कौसल्या वाघ हिला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर.’ गावाला तिचा अभिमान वाटला. पोस्टर लागले. फटाके फुटले. गावानं आनंद साजरा केला. कौसल्याची बबिता फोगटशी कॅम्पमध्ये लढत झाली, तर नॅशनल लढतीत रितू फोगटसोबत लढत झाली. त्या वेळी कौसल्यानं तिला हरवलं. तिला कांस्यपदक मिळालं. तिला चौदा राष्ट्रीय पदकं मिळाली आहेत. मुंबई येथील एका स्पर्धेत बबलू यादव यांच्यासोबत तिची कुस्ती झाली होती, तेव्हा उपस्थित असलेल्या अभिनेता सलमान खाननं कौसल्याचं कौतुक केलं.

एका हमाली करणाऱ्या कुस्तीप्रेमी वडिलांची मुलगी ते एक नामवंत महिला कुस्तीगीर हा प्रवास पूर्ण केल्यावर कौसल्याला वाटू लागलं, ‘प्रोत्साहन देणारे आई-वडील मिळाले म्हणून मी पैलवान झाले. मुंबईला शिकता आलं. पातियाळा इथं जाता आलं. पण कुस्तीगीर व्हायची इच्छा असणाऱ्या इतर मुलींचं काय?’ या विचारातून ती कुस्तीत येऊ पाहणाऱ्या मुलींसाठी स्वतःच्या गावात मोठं कुस्ती संकुल उभारत आहे. स्वतःचे कुटुंब आणि समाजातील दानशूर लोकांच्या मदतीनं हे केवळ मुलींसाठी असलेलं आणि एका स्त्रीनं उभारलेलं ग्रामीण भागातील पहिलं कुस्ती केंद्र आहे. ती पैलवान होती; पण आता तिला वस्ताद व्हायचं आहे. आधी तिनं काही मुलींना कुस्तीचे धडे दिले आहेत, पण आयुष्यभर तिला ही वस्ताद म्हणूनच वाटचाल करायची आहे. त्यासाठी ती स्वतःच्या गावात मुलींसाठी कुस्ती केंद्र उभारण्यात मग्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com