ऑन डिफरंट ट्रॅक : दगडाशी भावनिक नाते...

Stone
Stone

नाव - लीना सौमित्र 
गाव - पुणे
व्यवसाय - फ्रीलान्स आर्टिस्ट व लेक्चरर

‘निसर्गातल्या प्रत्येकाचं आपलं असं काही म्हणणं असतं. निसर्गातील हे सुंदर घटक वेगवेगळ्या माध्यमातून मानवाशी भावनिक नातं जोडतात.’ हे सुंदर विचार आहेत ‘पेबल आर्टिस्ट’ लीना हिचे. अगदी ढोबळ अर्थाने विचार केला तर ‘पेबल आर्ट’ म्हणजे दगडांना रंगविणे किंवा सजविणे. आजकाल ‘DIY’ कलेच्या माध्यमातून अनेकांनी हा दगड रंगविण्याचा प्रयत्नही केला असेल. दगड रंगविणे म्हणजे ‘पेबल आर्ट’ नसून त्या दगडाचा पोत, रंग, आकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याची भावना समजून घेऊन त्याला नवीन रूप बहाल करणे होय.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लीनाच्या मते, ‘हो, दगडालाही भावना असतात आणि म्हणूनच तर दगडाचे, माझे व नंतर तो दगड ज्याच्याकडे जातो त्याच्याशी असे आमचे सर्वांचे भावनिक नाते तयार होते.’ दगड हातात आल्यानंतर त्याच्यावर कोणती रंगसंगती साधायची, ओतीव काम करायचे की एखादे साजेसे कोरीवकाम, प्राणी-पक्षी किंवा भौमितिक आकार अशा अनेक लहानसहान तांत्रिक बाबीतून प्रवास करून तो दगड नवे रूप साकारतो. बारकाईने पाहिले तर हे दगड खरेच आपल्याशी बोलतात, असे वाटते. आणि अशीच काही प्रतिक्रिया खुद्द अमिताभ बच्चन यांची होती. ‘त्यांना जेव्हा हे पेबल भेट म्हणून देण्याचा योग आला त्या वेळी विस्फारलेल्या नजरेने ते त्याच्याकडे पाहतच राहिले होते,’ लीना सांगते.

कधीतरी गंमत म्हणून दगड रंगविण्याच्या उद्योगातून तिला याचा छंदच जडला व पुढे या छंदातूनच ‘अश्मन’ची निर्मिती झाली. घरगुती प्रदर्शन, कार्याशाळांच्या माध्यमातून आपली कला कलारासिकांपर्यंत पोचवित अश्मन आता हळूहळू व्यवसायात पदार्पण करीत आहे. बाग, घर, कार्यालयांतील सजावटीबरोबरच या पेबल्सचा वापर करून चांदीमध्ये आकर्षक दागिनेही आता ‘अश्मन’च्या माध्यमातून घडविले जातात.

अमिताभ बच्चन, अच्युत पालव, अतुल कुलकर्णी, सखी-सुव्रत जोशी, चंद्रमोहन कुलकर्णी, शुभा गोखले यांच्या संग्रही हे पेबल्स आहेत. शिवाय ‘मुंबई आंतरराष्ट्रीय’ विमानतळावरदेखील ‘अश्मन’ची उत्पादने उपलब्ध आहेत. ‘आजवर या कलेच्या माध्यमातून अनेक मान्यवरांना भेटून माझे हे पेबल्स भेट स्वरूपात त्यांना देता आले. यानिमित्ताने माझी व माझ्या कलेची आठवण कायमस्वरूपी त्यांच्या स्मरणात राहते, यामुळे मला खूप समाधान व आनंद मिळतो,’ असे ती सांगते. एका सच्च्या कलाकाराला यासारख्या दुसऱ्या कौतुकाची थाप ती कोणती!  दगडातही देव शोधणाऱ्या आपल्या मानवी मनाला दगडातले हे मित्र नक्कीच साद घालतील, तेव्हा चला, एकदा ‘अश्मन’ची सफर करूयात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com