ऑन डिफरंट ट्रॅक - खाद्यसंस्कृतीची वाहक

Madhura Pethe
Madhura Pethe

नाव : मधुरा पेठे
वय : ३९ वर्षे
गाव : पुणे
व्यवसाय : फेसबुक कम्युनिटी लीडर

मी आजच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणे म्हणजे ‘लहान तोंडी मोठा घास’ घेण्यासारखे आहे. फेसबुकवरील ‘खादाड खाऊ’ या लोकप्रिय ग्रुपची सर्वेसर्वा मधुरा पेठे हिने आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून समविचारी, समरूची अशा महाराष्ट्र तसेच जगभरातील जवळपास तीन लाख खवय्यांना एकत्रित आणले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साधारण तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाचे हे जग सर्वांनाच नवीन होते, तेव्हा कुतूहल म्हणून आधी ब्लॉग व यातूनच पुढे या ग्रुपची सुरुवात झाली. मात्र, अगदी कमी कालावधीतच हा ग्रुप अत्यंत लोकप्रिय झाला. मधुरा म्हणते त्याप्रमाणे, हा ग्रुप म्हणजे आता लोकांकरिता ‘फूड इन्सायक्लोपेडिया’ झाला आहे. कारण इथे विविध खाद्यपदार्थ व खाद्यसंस्कृतींवर चर्चा, देवाण-घेवाण होत असते. रोज सुमारे सहाशेहून अधिक पोस्ट या ग्रुपवर होत असतात, यातूनच या ग्रुपची लोकप्रियता लक्षात येते.

एकाचवेळी सातत्य, नाविन्य, व्यवसाय अशा सर्वच गोष्टी सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत आणि ही कसरत मधुरा लीलया पेलते. मधुरा या ग्रुपची अॅडमीन असण्याबरोबरच ‘फेसबुक कम्युनिटी लीडर’ तसेच ‘सोशल मीडिया तज्ज्ञ’ देखील आहे. ‘हे क्षेत्र तसे नवीन व आव्हानात्मक आहे. कारण समोर प्रत्यक्षात न दिसणाऱ्या एका मोठ्या समूहाचे नेतृत्व करणे, त्याला एका सूत्रात बांधून ठेवणे, आपल्या उद्देशाप्रती वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे अशी महत्त्वाची जबाबदारी कम्युनिटी लीडरला पार पाडवी लागते आणि यावरच ग्रुपची प्रगती अवलंबून असते,’ असे मधुरा सांगते.

‘खाखा’ ग्रुपने आता व्यावसायिकांसाठी ‘केके मार्केट’ हे व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, ज्याद्वारे खूप मोठी व्यावसायिक उलाढाल होत असते. तसेच या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मधुरा त्यांना हक्काचा दुवा वाटते.

मधुराच्या या कामाची दखल इतर समाजमाध्यमे तसेच फेसबुकनेही घेतली आहे. एशिया-पॅसिफिक प्रदेशातील एक प्रभावशाली ग्रुप म्हणून ‘खाखा’ची निवड झाली आहे. शिवाय मधुरा ‘खाखा’सारख्या इतर ‘फेसबुक कम्युनिटीज्’ युजर्सना वापरण्यास अधिकाधिक सोप्या, सहज व उपयुक्त कशा होतील यांवर काम करणाऱ्या फेसबुकच्या एशिया-पॅसिफिक गटातील सदस्यांपैकी एक सदस्य आहे. याचबरोबर अनेक प्रसिद्ध कुकिंग शोमध्ये ती सहभागी झाली आहे. मधुराने चार वर्षांपूर्वी वेगळी वाट निवडली आणि त्यावरून ती यशस्वी वाटचाल करीत आहे. सातत्य आणि समर्पण असल्यास वेगळ्या वाटेवरून चालणे अशक्य नाही, हे मधुराच्या वाटचालीवरून लक्षात येते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com