ऑन डिफरंट ट्रॅक : गृहिणी ते ज्योतिषी

Minal-Kulkarni
Minal-Kulkarni

नाव : मीनल कुलकर्णी 
शहर : पुणे 
वय : ६५
व्यवसाय : ज्योतिष सल्लागार व प्रशिक्षक 
मनात जिद्द असेल, तर सांसारिक, सामाजिक किंवा वय अशा कोणत्याही आव्हानांना लिलया पेलता येते. सर्वसामान्य लोक निवृत्तीचा विचार करतात त्या वयात, म्हणजे वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. आज वयाच्या पासष्ठाव्या वर्षीही त्याच जिद्दीने त्या कार्यरत आहेत. मीनलताई ज्योतिष सल्लागार व ज्योतिष प्रशिक्षक आहेत. त्यांचे आजोबा ‘राजज्योतिषी’ तर वडीलही ज्योतिषशास्त्राचे  जाणकार व  मीनलताईंचे मार्गदर्शक. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर पदोपदी त्यांच्या मार्गदर्शनाची उणीव भासायची. त्यामुळे त्या या शास्त्राकडे वळल्याचे सांगतात. त्यांनी पारंपरिक ज्योतिषशास्त्रासोबतच वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, रमलशास्त्र, हस्तसामुद्रिक, टॅरोकार्ड रिडींग अशा विविध शास्त्रांचा अभ्यास केला आहे. त्यांचे अभ्यासवर्गही त्या घेतात. सुरुवातीची पाच वर्षे मोफत मार्गदर्शन केल्यानंतर आपल्या गुरूंच्या सांगण्यानुसार मुंबई येथे पारंपरिक ज्योतिषशास्त्राचे अभ्यासवर्ग त्यांनी सुरू केले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रथम केवळ पंचावन्न महिलांसाठी सुरु केलेले हे वर्ग आता सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी खुले आहेत. आतापर्यंत मुंबई, पुणे, कोल्हापूर व अमेरिकेतील हॅरिसबर्ग या ठिकाणांचे मिळून जवळपास पाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांत पारंगत झाले आहेत. ‘कुलकर्णी वास्तु-ज्योतिष फाऊंडेशन’ या त्यांच्या संस्थेमार्फत इच्छुकांना विनामूल्य पारंपरिक ज्योतिष शिक्षण दिले जाते. गेली पन्नास वर्षे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमात फलादेशासाठी सूक्ष्म व अचूक माहिती देणारे पुस्तक उपलब्ध नसल्यामुळे हा विषय शिकविला जात नव्हता. ते आता ‘सर्वतोभद्रचक्र आणि पारंपरिक ज्योतिषशास्त्र’ या त्यांच्या पुस्तकामुळे शक्य झाले आहे. या क्षेत्रातील त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल त्यांना या क्षेत्रातील अनेक मानाचे सन्मान व स्मृतिचिन्हे प्राप्त झाली आहेत.

‘ज्योतिषशास्त्र हे अंगभूत तर्कशास्त्रासह समजून शिकण्याची व  शिकवण्याची कला आहे,’ या त्यांच्या आत्मविश्वासामुळेच ‘एक गृहिणी ते यशस्वी ज्योतिष सल्लागार व प्रशिक्षक’ या मार्गावर यशस्वीरीत्या त्या वाटचाल करत आहेत. त्यांच्या या वाटचालीला पाहून ''आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे'', असे वाटते.

ज्योतिष हे वेदांच्या सहा अंगांपैकी एक अंग आहे. हे शास्त्र अवगत होण्यासाठी शुचिर्भूतपणासोबतच काही नियमांचे पालन व सखोल अभ्यासाची गरज असते. परंतु, सध्या  केवळ अर्थार्जनाचे साधन म्हणून या शास्त्राचा वापर होतोय. त्यामुळे विश्वासार्हता कमी होऊन ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धेच्या नजरेतून पाहिले जात आहे. ज्योतिषशास्त्रातील शास्त्रोक्त ज्ञान जास्तीत-जास्त लोकांपर्यंत विनामूल्य पोचविण्याचा माझा मानस आहे. 
- मीनल कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com