ऑन डिफरंट ट्रॅक : 'पपेट शो'ची 'सोशल' उपासक

Papet-Show
Papet-Show

नाव : मृदुला केळकर
वय : ६० वर्षे
काम : कन्सल्टंट, ट्रेनर व पपेटीयर (puppeteer)

लोकसंस्कृतीचा कलात्मक आविष्कार म्हणजे लोककला. लोकसंस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचे कार्य  लोककला करतात. अशीच एक सुमारे चार हजार वर्षे जुनी प्राचीन लोककला म्हणजे ‘कळसूत्री बाहुल्यांचा खेळ’ अर्थात, ‘पपेट्री’. तिच्या माध्यमातून पूर्वी पौराणिक, ऐतिहासिक, मनोरंजनात्मक गोष्टी सांगितल्या जायच्या.

अबालवृद्धांपासून सर्व स्तरातील लोकांमध्ये ही लोककला लोकप्रिय आहे. आजकाल मनोरंजनाव्यातिरिक्त सामाजप्रबोधनासाठीही या कलेकडे पाहिले जाते. एक ६० वर्षांची हरहुन्नरी तरुणी - मृदुला केळकर, गेली २८ वर्षे या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम अव्याहतपणे करत आहे. मी ‘तरुणी’ म्हणते, कारण मृदुलाताईंचा उत्साह आणि जिद्द तरुणीपेक्षा कमी नाही. त्यांची पात्रे बोलतात, हसतात, गातात, खेळतात, नाचतात, हे पाहून या बाहुल्या नसून, आपल्यासमोर कोणीतरी जिवंत व्यक्तीच अभिनय करत असल्याचा भास होतो.

स्क्रिप्टमधील बोली भाषा, गोष्टीरूप कथानक व त्याला अनुरूप अशी पपेटची पात्रे यांमुळे शाळा, सामाजिक संस्था व गावांमध्ये पपेट शो लोकप्रिय होऊ लागले. कार्यक्रमापूर्वी प्रेक्षकांची गरज व सादरीकरणाचा विषय याची सखोल माहिती असणे आवश्यक असते. त्यानुसार मग त्यातील पात्रे, कथानक व संवादलेखन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सराव करणे खूप महत्त्वाचे असल्याचे, मृदुलाताई सांगतात. आजवर मृदुलाताईंनी महिला सक्षमीकरण, कचरा व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, शिक्षण, पर्यावरण व अशा अनेकविध सामाजिक विषयांवर जवळपास पंचवीस हजारांहून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. आजही लॉकडाउनच्या काळात त्या शाळांमधील सहकाऱ्यांसाठी गरजेनुसार छोटे-छोटे पपेट स्कीट शूट करून पाठवित आहेत.

खरेतर, मनोरंजनाबरोबर समाजप्रबोधन करणारी ही प्राचीन कला मृदुलाताईंसारख्या कलाउपासक जतन करत आहेत, याची समाजाने म्हणावी तशी दखल नाही घेतली, याची खंत वाटते. आज या लेखाच्या निमित्ताने, आपण ही कला, या कलेचा उद्देश व महत्त्व आणि मृदुलाताईंचे परिश्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवूयात.


मी १९९२मध्ये ‘पपेट्री’ माध्यमाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘वैयाक्तिक स्वच्छता’ या विषयावर एका अंगणवाडीत मी पहिला कार्यक्रम केला. त्यावेळी या माध्यमाची ताकद लक्षात आली. मनोरंजनातून दिलेला संदेश उत्तमरित्या पोचतो याची जाणीव झाली. प्रशिक्षणातून दिले जाणारे ज्ञान, कौश्यल्ये व दृष्टीकोन प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये रुजणे आवश्यक आणि यासाठी ‘पपेट्री’ हे माध्यम चपखल ठरते. 
- मृदुला केळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com