मेमॉयर्स : आईच मैत्रीण

शिवानी रांगोळे, अभिनेत्री
Sunday, 26 April 2020

आईमुळेच माझी अभिनय क्षेत्राशी ओळख झाली. ती शिक्षिका असल्यामुळे शाळेमध्ये नाटक बसवत असे. माझे सर्व मित्रमैत्रिणी तिला रांगोळे बाई म्हणून ओळखत असे. आजही तिचे सर्व विद्यार्थी तिच्या संपर्कामध्ये आहेत. कारण, ती सर्वांची लाडकी शिक्षिका होती आणि आजही आहे.

आईमुळेच माझी अभिनय क्षेत्राशी ओळख झाली. ती शिक्षिका असल्यामुळे शाळेमध्ये नाटक बसवत असे. माझे सर्व मित्रमैत्रिणी तिला रांगोळे बाई म्हणून ओळखत असे. आजही तिचे सर्व विद्यार्थी तिच्या संपर्कामध्ये आहेत. कारण, ती सर्वांची लाडकी शिक्षिका होती आणि आजही आहे.

आईमुळेच मी ही लहानपणी हळूहळू स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यासाठी आई मला भाषण, गोष्टी लिहून देत असे. तसेच, मलाही त्यासाठी विचार करण्यास भाग पाडत असे. त्यामुळे मलाही लहानपणापासून लिहिण्याची सवय लागली. आईला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे.

त्यामुळे मलाही जेव्हापासून वाचायला येऊ लागले, तेव्हापासून मी ही पुस्तकांच्या प्रेमात पडले. लहानपणी मला कधीही टीव्ही बंद कर किंवा जास्त वेळ बाहेर खेळू नको, असे सांगावे लागले नाही. कारण, तिनेच मला पुस्तक वाचायची सवय लावली. विविध स्पर्धांमध्ये भाग घेताना ती माझ्याकडून चोख तयारी करून घेत असे. त्याचप्रमाणे एखादा परफॉर्म चांगला झाला नाही तर मला स्टेजवरून खाली उतरायला सांगायची. त्यानंतर पुढच्यावेळी काय सुधारणा करायची, हे सांगायची. म्हणून कितीही पारितोषिकं मिळाले तरीही माझे पाय जमिनीवरच असायचे. अजूनही माझी मालिका, नाटक, वेब सीरिज पाहून जर तिला काही गोष्ट आवडत नसल्यास किंवा काही चुका झाल्या असल्यास ती नेमक्‍यापणाने सांगते. मालिका सुरू झाल्यानंतर मी पाहिला फीडबॅक तिचाच घेते.

माझ्या स्वभावातील चांगल्या आणि वाईट गोष्टी तिला माहीत आहे. पण, तरीही ती मला चुका करण्याची मुभा देते. कोणताही निर्णय मी तिचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय घेत नाही. शॉपिंगसाठीही आम्ही एकत्र जातो. अभिनयात एखादे नवीन काम मिळाले की मी सर्वांत अगोदर तिलाच सांगते. आमचे नाते आई आणि मुलीपेक्षा मैत्रिणींसारखेच जास्त आहे. 

सध्या मी स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेमध्ये रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारत आहे. खरंतर रमाबाईंची भूमिका साकारणं माझ्यासाठी आव्हानच होतं. पण, मी ते यशस्वीरीत्या पेललं आहे. यापूर्वी मी झी युवा वाहिनीवर ‘बन मस्का’ व ‘आम्ही दोघी’ या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तसेच, ‘वेलकम जिंदगी’ या नाटकातही अभिनय केला असून नेटफिलिक्‍सवरील ‘सी’ या हिंदी वेबसिरिजमध्येही मी अभिनय केला आहे. या प्रत्येक गोष्टीमध्ये आईचा मला पाठिंबा अन प्रोत्साहन मिळत गेलं. त्यामुळे मी अभिनयात चांगल्याप्रकारे पाय रोवू शकले.
शब्दांकन - अरुण सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shivani rangole on mother friend