जोडी पडद्यावरची : आठवणींचा 'मोगरा'

spruha-joshi-and-bhargavi-chirmule
spruha-joshi-and-bhargavi-chirmule

पुणे प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिलं ‘नेटक’ अर्थात इंटरनेटवरील लाईव्ह नाटक ‘मोगरा’ उद्या (ता. १२) रोजी सादर होणार आहे. तेजस रानडे यांनी हे नाटक लिहिले असून, त्यात स्पृहा जोशी आणि भार्गवी चिरमुले यांच्याही भूमिका आहेत. त्या निमित्ताने दोघींशी संवाद साधला. स्पृहा आणि भार्गवी यांची ओळख खूप वर्षांपासूनची आहे. स्पृहाची आई आणि भार्गवीची आई मैत्रिणी आहेत. भार्गवीची बहीण चैत्राली विद्याताई पटवर्धन यांच्या नाट्यशिबिरात होती, तेव्हा स्पृहाही त्यात होती. तिथेच स्पृहाची आणि भार्गवीची पहिली भेट झाल्याचे भार्गवीला आठवते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भार्गवी म्हणते, ‘स्पृहाला अनेक वर्षे मी या क्षेत्रात उत्तम भूमिका करताना पाहिले आहे. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच, त्याचप्रमाणे उत्तम निवेदिका, कवयित्री आहे. ‘मोगरा’च्या निमित्ताने आम्ही दोघी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत.’’ भार्गवीविषयी बोलताना स्पृहा म्हणाली, ‘भार्गवीताईचं ‘प्रपंच’ मालिकेतले काम मला खूप आवडते. तिच्या अनेक भूमिका मी पाहिल्या आहेत. ‘मोगरा’च्या निमित्ताने तिने तंत्रज्ञानाच्या नवीन पद्धतीशी सुद्धा स्वतःला उत्तम जुळवून घेतले आहे. आमच्यापेक्षा वयाने मोठी असूनही ती माझी छान मैत्रीण झाली आहे. तिचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे.’

‘मोगरा’मधील आपल्या भूमिकेविषयी भार्गवी म्हणते, ‘यात मी एका नर्तिकेची भूमिका साकारत आहे. करिअर आणि स्वतःचे जगणे, यातील द्वंद्व या भूमिकेतून मला साकारायला मिळते आहे. शिवाय नाटकाचा हा नवीन ‘प्रयोग’ हृषीकेश जोशी याच्या संकल्पनेतून साकार होत आहे. नाटक वेगळी प्रोसेस असते आणि आज तंत्रज्ञानाच्या पद्धतीतून ‘ऑनलाइन लाईव्ह नाटक’ ही कल्पनाच भन्नाट आहे. हे आम्हा सर्वांसाठी खूप आव्हान होते आणि ते पेलताना खूप मजा येत आहे. शिवाय या आधी अनेक कार्यक्रमात स्पृहा निवेदन करायची, मी नृत्य सादर करायचे. ‘मोगरा’च्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदा एकत्र काम करत आहोत.’

‘मोगरा’मधील भूमिकेविषयी स्पृहा म्हणाली, ‘यात मी ‘राधिका’ नावाच्या आत्मविश्‍वासू मुलीची भूमिका साकारत आहे. ही मुलगी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी आहे. ती स्वतःच्या वाटा शोधणारी, चित्रकार आहे. माझ्या पिढीशी रिलेट करू शकणारी ही भूमिका आहे. दिग्दर्शक हृषीकेश जोशी यांच्या काही प्रोजेक्टमध्ये आधी मी काम केले होते. पुन्हा एकदा ‘मोगरा’च्या निमित्ताने त्यांच्या दिग्दर्शनाचा अनुभव आम्हाला प्रेरणा देणारा आहे.’

लॉकडाउनचा काळ प्रत्येकालाच आव्हानात्मक होता. या काळात भार्गवीने तिच्या अभिनेत्री मैत्रिणींबरोबर नृत्याचे काही व्हिडिओज केले. एकमेकींकडून त्या सर्व मैत्रिणी नृत्याचे नवीन प्रकार शिकल्या, तसेच भार्गवीने स्वयंपाकातील नवीन पदार्थ शिकणे आणि योगासने करणे यासाठी वेळ दिला. योगासने आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, असे तिचे ठाम मत आहे. स्पृहालाही लॉकडाउनच्या निमित्ताने आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी जास्त वेळ देता आला. फेसबुक, इन्स्टा या ॲप्सवरून तिने अनेक कलाकारांच्या मुलाखती देखील घेतल्या. आपल्या मनातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिने डायरी लेखन सुरू केले. लोकांना ते वाचायला आवडले. त्यानंतर ‘खजिना’ आणि ‘इंक अबाऊट इट’ यासारख्या मालिका ‘स्पृहणीय’ या तिच्या यू-ट्यूब चॅनेलसाठी सुरू केल्या. भार्गवी आणि स्पृहा या दोघींनाही ‘मोगरा’ या नव्या प्रयोगाच्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल खूप उत्सुकता आहे.

(शब्दांकन - गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com