थॉट ऑफ द वीक : माझा ट्रिगर

Supriya-Pujari
Supriya-Pujari

नेहा व आनंद यांच्या लग्नाला आज पाच वर्षे झाली. आनंदने आज खूप छान प्लॅन केला होता. तो आज लवकर घरी आला व पूर्ण सेलिब्रेशनची तयारी करून नेहाची वाट पहात होता. नेहा कामावरून घरी आली. थोडी नाराज वाटत होती. त्याने विचारले, ‘आज खूप दमली आहेस, असे वाटते. खूप काम होते का?’ नेहा दीर्घ श्‍वास घेत म्हणाली, ‘आज दिवस थोडा वाईट गेला. काय झाले होते...’ तिला मध्येच थांबवत आनंद म्हणाला, ‘अरे एवढेच ना, मग छोटी गोष्ट आहे.’ त्याला वाटले की असे म्हटल्यावर तिचा मूड बदलेल. अचानक नेहाचा चेहरा पडला. ती रागावून तिच्या रूममध्ये गेली व जोरात दार लावून घेतले.

आनंद थोडा आश्चर्यचकित झाला. कारण ती आधी अशी कधीच वागली नव्हती. इकडे नेहा रूममध्ये खूप नाराज झाली व तिचे विचारचक्र चालू झाले. तिला प्रश्न होता, ‘मी अशी का वागले? कामाच्या ठिकाणी मी किती शांततेने सर्व हॅँडल करते. पण मी आज आनंदवर इतकी का चिडले? आनंद तर माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची व्यक्ती आहे.’

नेहाने पूर्ण नाराजी दाखविल्यामुळे आनंदने सगळा प्लॅन कॅन्सल केला. थोडा वेळ गेल्यानंतर नेहा रूममधून बाहेर आली व चालण्यासाठी बाहेर पडली. एकच प्रश्न तिला सतावत होता, ‘मी अशी का वागले? ‘काहीतरी’ होते आणि मी अशी वागते.’

नेहासारखा हा प्रश्न आपल्यालाही अनेकदा पडत असतो. ‘काहीतरी’ होते आणि आपण आपल्याच नकळत वेगळे वागतो. हेच काहीतरी म्हणजे ‘ट्रिगर''.

आपल्या सर्वांमध्ये काही विशिष्ट ट्रिगर असतात. मग तो ट्रिगर एखाद्या घटनेचा, लोकांचा, जागेचा व काही शब्दांचाही! बहुतांश वेळा हा ट्रिगर आपल्या भूतकाळातील किंवा आपल्या लहानपणाच्या काही घटनांबाबत निगडित असतो.

ट्रिगर इतक्या लवकर काम करतो, की आपल्याला त्या वेळी कळत नाही की हा ट्रिगर आहे. या ट्रिगरमुळे बऱ्याचदा आपल्या जवळचे लोक दुखावले जातात. त्यांनाही कळत नाही, की काय करावे.

आता नेहाचा ट्रिगर आपण जाणून घेऊ. नेहा लहान असताना तिच्या आईला सांगायची, ‘आज शाळेत काय झाले व काही गोष्टींचा तिला कसा त्रास झाला.’ तिची आई कायम तिला म्हणायची, ‘अरे एवढेच ना, मग छोटी गोष्ट आहे,’ तिला खूप वाईट वाटायचे व ती आक्रमक वागायची. जशी नेहा उच्च शिक्षणासाठी बाहेर गेली, तेव्हादेखील ती तिच्या आईला सांगत होती की, एकटे राहिल्यामुळे तिला काय अडथळे येत आहेत.

त्यावरही तिला कायम हेच बोलले गेले, ‘अरे एवढेच ना, मग छोटी गोष्ट आहे.’ असे सातत्याने घडल्यामुळे तिच्या आतमध्ये एक स्वतःबद्दलचे मत (belief) निर्माण झाले ते म्हणजे, ‘मी जे काही बोलते ती छोटी गोष्ट आहे, मग ती महत्त्वाची करण्याकरिता काहीतरी आक्रमक वागणे हाच मार्ग,’ नेहाला पूर्वानुभवातून हेच उमजले होते, ‘माझ्या महत्त्वाच्या भावनांना छोटे म्हटले जाते, त्या वेळी आक्रमक होऊन त्याला महत्त्व द्यायचे’.

ट्रिगर असा काम करतो. आपल्या सर्वांच्या आयुष्यात असा एखादा ट्रिगर येतो, तेव्हा आपण तात्पुरता प्रयोग न करता तो कायमचा कसा डील करायचा ते पाहू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com