थॉट ऑफ द वीक : घर आवरा; आयुष्य सावरा

सुप्रिया पुजारी, लाइफ कोच
Friday, 8 May 2020

आजपर्यंत आपण चूक-बरोबरचा गोंधळ, वर्तमानकाळाचे महत्त्व, आपल्या भावनिक गरजा व याचा आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. आपण या लॉकडाउनच्या काळात मानसिक प्रतिकारशक्ती कशी वाढवायची व ती का उपयोगी आहे, याचाही विचार केला. आता हळूहळू आयुष्य पूर्ववत व्हायला सुरुवात होईल. आपल्या जबाबदाऱ्याही वाढलेल्या असतील, आयुष्य नक्कीच बदललेले असेल, कामाचा व्याप वाढेल.

आजपर्यंत आपण चूक-बरोबरचा गोंधळ, वर्तमानकाळाचे महत्त्व, आपल्या भावनिक गरजा व याचा आपल्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. आपण या लॉकडाउनच्या काळात मानसिक प्रतिकारशक्ती कशी वाढवायची व ती का उपयोगी आहे, याचाही विचार केला. आता हळूहळू आयुष्य पूर्ववत व्हायला सुरुवात होईल. आपल्या जबाबदाऱ्याही वाढलेल्या असतील, आयुष्य नक्कीच बदललेले असेल, कामाचा व्याप वाढेल. त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होईल. हे सर्व विचार काही नवीन नाहीत. महत्त्वाचा प्रश्‍न हा आहे, की लॉकडाउनमुळे सर्व त्रास झाला की आपण शिस्त म्हणजे काय, हे नव्याने शिकलो? कोणतीही गोष्ट वेळेशी बांधलेली नसतानाचा आपण किती शिस्तीचे आहोत, ते समजते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेळेचे नियोजन हा विषय आपण बऱ्याचदा वाचतो. आपल्या लेखमालेतही हा विषय सारखा आहेच, मात्र वेळेबरोबरच आणखी एक महत्त्वाची बाब आहे. ती म्हणजे ‘वातावरण’. आता हे वातावरण म्हणजे काय? याचे अनेक संदर्भ आहेत.

कुणी म्हणेल बाह्य, कुणी म्हणेल अंतर्मन, कुणाला वाटेल भोवतालच्या लोकांचे वातावरण... हे सर्व बरोबर आहे. मात्र आज आपण आपल्या घरातील वातावरणाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा परिणाम आपल्या जीवनशैली व कार्यक्षमतेवर होतो. आपली जीवनशैली सक्रियपणे सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे आपल्या भोवतीच्या वस्तू, कागदपत्रे यांचे आयोजन करणे आहे. आपल्या मेंदूला संघटित करण्यास शिकवण्याची ही सुरुवात आहे.

आपल्याला अतिस्वच्छता, अतिआयोजन करायचे नाही. यामधील अतिपणा एक प्रकारची ऑब्सिझिव्ह-कंपल्सिव डिसऑर्डर (ओसीडी) आहे. परंतु, आपल्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त नियोजन आपण नक्कीच करू शकतो.

आयोजन योग्य मार्गावर असल्यास....
1) तुमचा वेळ वाचेल व तुम्हाला अधिक शक्ती मिळेल.
2) सर्व गोष्टी व आयुष्य सोपे व गतिमान होईल.
3) तुमची कार्यक्षमता वाढलेली जाणवेल.
4) महत्त्वाची कामे करायला अधिक वेळ मिळतो आहे असे वाटेल.
लक्षात ठेवा! घराचे आयोजन हेच आयुष्याचे आयोजन आहे.

ते कसे करायचे ते पाहू
1) घरातील व आयुष्यातील क्षेत्रांचे गट करा

आयोजन सोपे करण्यासाठी क्षेत्रांचे गट करा. उदा. वाहने, कपडे, घरातील खोल्या, ऑफिस साहित्य, छंदाचे सामान आदी व निरीक्षण करा. आयोजनाची कुठे गरज आहे? काय जुने झाले आहे? कोणता गट अधिक महत्त्वाचा आहे. हे सर्व करून तुम्ही तुमच्या मेंदूला काय महत्त्वाचे आहे व त्याचे आयोजन कसे करायचे याची सवय लावाल.

2) खोल्यांचे आयोजन
घरातील खोल्या, त्यातील सामान याचे निरीक्षण करा. कुठे दुरुस्तीची गरज आहे. त्याचे आयोजन असे करा, की महत्त्वाच्या गोष्टी हाताशी येतील. तुमचा वेळ वाचेल. सर्व खोल्या आयोजित केल्यानंतर लक्षात येईल, की आपण किती शक्ती वाया घालवत होतो. खोल्या आयोजित झाल्यावर आपल्या मेंदूमध्ये अधिक जागा मिळते महत्त्वाच्या कामांसाठी. खोल्यामध्ये अशा काही वस्तू ठेवा (घरातील वस्तूंपैकी), की तुमची नजर गेल्यावर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.

3) शरीराचे आयोजन
आठवड्यातील किती वेळ तुम्ही स्वतःच्या शरीरासाठी देता? केसांपासून पायाच्या तळव्यांपर्यंत नजर टाका. खोल्यांसारखेच याचेही आयोजन करा. निरोगी शरीरासाठी कुठे लक्ष देणे गरजेचे आहे? मग अगदी ते नखे कापणे असुदे, नाहीतर वजन कमी करणे. लक्ष देऊन तातडीने काम करा व एका निरोगी शरीराकडे वाटचाल सुरू करा.

4) सर्व गट तपासून घ्या
सर्व गट तपासून घ्या. त्यांचे आयोजन करा. वेळ वाचेल तसे आयोजन करा. सकारात्मकता येईल अशा  गोष्टी कायम नजरेसमोर ठेवा. अगदी प्रत्येक खोलीत हे सर्व केल्याने तुमचे अंतर्मन आयोजित व्हायला सुरुवात होईल. कोणते विचार मनात नको आहेत, कोणते विचार सकारात्मकता देतात, कोणती कामे मनात हाताशी असावी हे उमजते. तुम्हाला लक्षात येईल की, आपण कुठे आळस करतो, कुठे जास्त वेळ घालवितो, कुठे कमी वेळ मिळतो इत्यादी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article supriya pujari on home and life