esakal | थॉट ऑफ द वीक - पूर्वग्रह व नाती 
sakal

बोलून बातमी शोधा

Thought-of-the-week

मिहीर व ईशाचे नुकतेच लग्न झाले होते. अरेंज मॅरेज असल्याने दोघांना अधिक वेळ सोबत घालवता आला नाही. मिहीर ऑफिसनंतर घरी खायला काहीतरी घेऊन जाण्यासाठी थांबला. ईशाने मला भूक लागली आहे, असा मेसेज केला होता. आपल्या बायकोला नक्की काय आवडेल, हे मिहीरच्या लक्षात येईना. ईशाचा फोन लागत नव्हता. काही न सुचल्यामुळे तो तसाच घरी आला. घरी येताच ईशाने विचारले, ‘काय आणले?’ मिहीरने सांगितले की काही सुचले नाही, तुला काय आवडते माहीत नव्हते म्हणून तसाच आलो.

थॉट ऑफ द वीक - पूर्वग्रह व नाती 

sakal_logo
By
सुप्रिया पुजारी, लाइफ कोच

मिहीर व ईशाचे नुकतेच लग्न झाले होते. अरेंज मॅरेज असल्याने दोघांना अधिक वेळ सोबत घालवता आला नाही. मिहीर ऑफिसनंतर घरी खायला काहीतरी घेऊन जाण्यासाठी थांबला. ईशाने मला भूक लागली आहे, असा मेसेज केला होता. आपल्या बायकोला नक्की काय आवडेल, हे मिहीरच्या लक्षात येईना. ईशाचा फोन लागत नव्हता. काही न सुचल्यामुळे तो तसाच घरी आला. घरी येताच ईशाने विचारले, ‘काय आणले?’ मिहीरने सांगितले की काही सुचले नाही, तुला काय आवडते माहीत नव्हते म्हणून तसाच आलो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यावर ईशाने खूप सुनावले. ‘फोन का नाही केला,’ यावरून आणखी वाद झाला. तिचा फोन लागत नव्हता, हे लक्षात येताच ईशा शांत झाली. काही दिवसानंतर मिहीर परत हॉटेलमध्ये गेला. यावेळी काहीतरी घेऊन जायचेच, असे त्याने ठरविले. मात्र, पुन्हा ईशाला काय आवडेल हे लक्षात येईना. त्याने परत फोन लावला, पण फोन लागला नाही. मागील अनुभवामुळे रिकामे घरी जायचे नाही, असे त्याने ठरविले. त्याने ईशाच्या आईला फोन करून ईशाची आवड जाणून घेतली व स्वतःच्या आवडीची एक डिश, अशा दोन डिश पार्सल ऑर्डर केल्या व त्या घेऊन घरी आला. पार्सल उघडताच ईशा परत नाराज झाली व मिहीरला बोलू लागली. ‘मी तुला आवडतच नाही का? मला काय हवे आहे, हे लक्षात का येत नाही? मी तुझा किती विचार करते आणि तू किती स्वार्थी आहेस, मी लग्नच करायला नको होतं, माझ्या मैत्रिणी मला सावध करत होत्या पण मी ऐकले नाही.’ ईशाचे विचार ऐकून मिहीरला वाईट वाटले. त्याला काहीच कळेना! पार्सल पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, हॉटेलवाल्याने चुकून एकच डिश पार्सल दिली होती व ती आपल्याच आवडीची निघाली!

घडलेला प्रकार ईशाला कळला तेव्हा तिला खूप वाईट वाटले, मिहीरही दुखावला गेला होता. चुकून पार्सल राहिले, मात्र आपल्या बाबतीत ईशाचे विचार ऐकून मिहीरला आणखीनच वाईट वाटले. ईशाच्या मनात अपराधी भावना होती, परंतु खूप उशीर झाला होता. दोघेही जड मनाने न जेवता झोपी गेले.

जेवढे दिसले, ऐकले व अनुभवले त्यावर अधिक माहिती न घेता एखादे मत बनवून, ते एकतर्फी निष्कर्ष काढणे, यालाच आपण पूर्वग्रह म्हणतो नाही का? मिहीर-ईशासारखे अनेक जण व अनेक नाती या पूर्वग्रहामुळे दुखावली जातात. पूर्वग्रहाचा आपल्या नात्यांवर कसा परिणाम होतो ते पाहू...

स्वतःबरोबरचे नाते सर्वाधिक विकसित मानले जाते. स्वतःवर विश्‍वास ठेवल्यास स्वतःबरोबरचे नातेही पूर्वग्रह विरहित बनते. हेच आत्मविश्‍वासाचे नाते इतर नात्यांना पोषक ठरते.

पूर्वग्रहामुळे नात्यातील विश्‍वास ठरवतो. योग्य पूर्वग्रह नाती जोडतात व टिकून ठेवतात. नात्यात विश्‍वास असतो, तेव्हा कोणत्याही घटनेची अधिक माहिती घेतली जाते, तसेच अधिक पडताळणीसाठी हक्काने प्रश्‍न विचारले जातात. परंतु चुकीच्या पूर्वग्रहामुळे एकतर्फी निष्कर्ष काढून नाती कमकुवत बनतात व तुटतात. कारण घटनेला दुसरीही बाजू असू शकते, हा विचार चुकीचा पूर्वग्रह करू देत नाही.

पूर्वग्रहामुळे खासगीबरोबरच व्यवयसायिक नात्यांचीही घडण होते. नात्यांमध्ये काही विश्‍वास असणारे पूर्वग्रह असतात. उदा. ‘समोरच्याचीही काही बाजू असेल, ती आपण जाणून घ्यावी,’ हा पूर्वग्रह नाती टिकवतो. अविश्‍वासाने भरलेले पूर्वग्रह दुसऱ्यांचे मत विचारात घेत नाही व ईशासारखी प्रतिक्रिया देतात. परिणामी नात्यांबरोबरच माणसे ही कायमची लांब जातात.

नात्यांबरोबरच आपल्या भावनिक विश्‍वावरही पूर्वग्रहाचा परिणाम होतो. चांगले पूर्वग्रह आपले भावनिक विश्‍व समाधानी करतात, पण नकारात्मकतेने व्यापलेले पूर्वग्रह भावनिकरित्या असमाधानी करून नवीन नकारात्मक पूर्वग्रहांना जन्म देतात.

लक्षात ठेवा! तुमचे आजचे पूर्वग्रह भविष्यातील नात्यांचा दर्जा व गुणवत्ता ठरवित असतात. त्यामुळे, आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या व जवळच्या नात्यांचे अपरिवर्तनीय नुकसान होण्याआधीच सावध व्हा व पूर्वग्रहविरहीत जगून स्वजागरुकता आत्मसात करा!

Edited By - Prashant Patil

loading image
go to top