esakal | जोडी पडद्यावरची - अभिनयात ट्युनिंग महत्वाचे 
sakal

बोलून बातमी शोधा

Shivraj-and-Shivani

सध्या वेब सीरिजचे माध्यम खूप लोकप्रिय होत चालले आहे. एम. एक्स. एक्सक्ल्युझिव्हची नवीन मराठी वेब सिरीज ‘इडियट बॉक्स’ नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यात शिवराज वायचळ आणि शिवानी रांगोळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. शिवराज यात ‘आकाश’, तर शिवानी ‘सायली’ची भूमिका साकारत आहेत. शिवराज आणि शिवानी दोघेही पुण्याचे. दोघांची पहिली भेट ‘नाट्यसंस्कार कलाअकादमी’च्या शिबिरात झाली.

जोडी पडद्यावरची - अभिनयात ट्युनिंग महत्वाचे 

sakal_logo
By
शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे

सध्या वेब सीरिजचे माध्यम खूप लोकप्रिय होत चालले आहे. एम. एक्स. एक्सक्ल्युझिव्हची नवीन मराठी वेब सिरीज ‘इडियट बॉक्स’ नुकतीच प्रदर्शित झाली आहे. यात शिवराज वायचळ आणि शिवानी रांगोळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. शिवराज यात ‘आकाश’, तर शिवानी ‘सायली’ची भूमिका साकारत आहेत. शिवराज आणि शिवानी दोघेही पुण्याचे. दोघांची पहिली भेट ‘नाट्यसंस्कार कलाअकादमी’च्या शिबिरात झाली. दोघेही गेली अनेक वर्षे एकमेकांना ओळखत आहेत. पुण्यात काही नाट्यविषयक उपक्रम आयोजित करण्यात दोघांचाही सहभाग असतो. ‘डबल सीट’ चित्रपटात दोघांनी छोटी भूमिका केली होती, तसेच ‘बनमस्का’ या मालिकेतही दोघांची भूमिका होती. शिवराजबद्दल बोलताना शिवानी म्हणते, ‘शिवराज अतिशय प्रामाणिकपणे काम करतो. आपल्या सहकलाकाराला योग्य स्पेस देतो. ही गोष्ट कलाकाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. शिवराज एक उत्तम चित्रकार आहे आणि त्याने त्याच्या या पैलूंकडेही लक्ष द्यावे, असे मला वाटते.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवानीबद्दल शिवराज म्हणतो, ‘शिवानी उत्तम अभिनेत्री आहे. सहकलाकारांसोबत काम करताना ती अर्थातच उत्तम सहकार्य करते. या तिच्या व्यक्तिमत्वातील चांगल्या गोष्टी आहेत. पण ती पटकन एखाद्या गोष्टीवर विश्‍वास ठेवते, हे थोडे तिने बदलले पाहिजे, असे मला वाटते.’ ‘इडियट बॉक्स’मध्ये शिवराज आणि शिवानी प्रमुख भूमिकेत आहेत. आपल्या भूमिकेविषयी शिवानी म्हणते, ‘मी ‘सायली’ची भूमिका करत असून ती एक आत्मविश्‍वासू, बिनधास्त मुलगी आहे.

आकाश (शिवराज) आणि सायलीची मैत्री आहे. सायलीचे आकाशवर प्रेम आहे, पण आकाशला शाश्‍वती आवडते. आपल्या मित्रासाठी सायली काय करते, हे तुम्हाला कळण्यासाठी अर्थातच ‘इडियट बॉक्स’ ही सिरीज पाहावी लागेल. आपल्या व्यक्तिरेखेविषयी शिवराज सांगतो, ‘मी साकारत असलेला ‘आकाश’ स्वप्नाळू आहे. तो एक संहिता लेखक, कॉपीरायटर असून, आभासी जगात जास्त रमणारा आहे. दूर असलेल्या गोष्टीच्या पाठी जाताना जवळच असलेल्या गोष्टीकडे तो दुर्लक्ष करत आहे, अशी ही भूमिका आहे.’

लॉकडाउनच्या काळात शिवानी नवनवीन पदार्थ करायला शिकली. शिवणकाम, चित्रकला या गोष्टीतही तिने वेळ घालवला. शिवराज म्हणतो, ‘या काळात चोवीस तास घरात असल्याने आपली आई कोणतीही तक्रार न करता किती काम करत असते, याची मला प्रकर्षाने जाणीव झाली. आता मी देखील घरातील कामांमध्ये मदत करू लागलो आहे.’ याच काळात शिवानीने ‘न्यूजरूम’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले. शिवराज यात निवेदकाची भूमिका करत होता. लॉकडाउनमध्ये घरच्या घरी राहून चित्रित केलेली ही मालिका होती. ‘इडियट बॉक्स’ ही वेबसिरीज पाच भागांची असून मराठीसह हिंदी, तमीळ, तेलगू या भाषांमध्ये एम. एक्स. प्लेयरवर ही सिरीज विनामूल्य पाहता येणार आहे.
(शब्दांकन - गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil

loading image
go to top