समानतेची बाराखडी

The veil of equality
The veil of equality

जगभरात आज जागतिक महिला दिन साजरा केला जातोय. लायबेरियातील महिलांचा लैंगिक संप, वुमेन्स डे ऑफ, ‘मी टू’ चळवळ ही सामुदायिक प्रयत्नातून बदल घडल्याची गेल्या वर्षातील ठळक उदाहरणे. अर्थात, हा बदल मर्यादित नाही. आपले बोलणे, वागणे आदींचा प्रत्येकालाच फायदा होऊ शकतो. ‘मी समानतेच्या पिढीतील : महिलांचे हक्क जाणणार’ ही संयुक्त राष्ट्रांची (यूएन) या वेळच्या महिला दिनाची थीम आहे. प्रत्येकाने स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘यूएन वुमन’ने सुचविलेली ही छोटी; पण महत्त्वाची १२ पावले टाकायला काहीच हरकत नाही.

1) घरकामात वाटा उचला
महिलांचे काम कधीही संपत नाही. पुरुषांपेक्षा महिलांना तिपटीने अधिक घरकाम व इतर कामे विनामोबदला करावी लागतात. यामुळे करिअरमधील प्रगती, अर्थार्जन, छंद आदींची त्यांची संधी हिरावून घेतली जाते. यासाठी पुरुषांनीही घरकामात वाटा उचलावा, पालकत्वाची जबाबदारी स्वीकारावी. इतर कामेही करावी. यासाठी घरात चर्चा करा व कामांचे वाटप करून घ्या. 

2) भेदभाव व अत्याचार संपवा
सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी महिलांना पुरुषांची शेरेबाजी, अश्‍लील विनोद आदींचा सामना करावा लागतो. अशावेळी तुम्ही सुरक्षित, आदरयुक्त पद्धतीने त्यांना आव्हान करू शकता. ‘स्त्रीला तिची जागा माहीत हवी’, अशी वक्तव्ये केली जातात. यांसारख्या रुढीबद्ध कल्पनांनाही आव्हान द्या. तुम्ही अत्याचाराविरुद्ध आवाज उठवा. मात्र, ते असुरक्षित वाटत असल्यास इतरांची मदत घ्या.

3) समान कार्यसंस्कृतीची मागणी करा
नेतृत्वात महिलांना समान वाटा, समान कामासाठी समान वेतन तसेच लिंग समानतेवरील शैक्षणिक अभ्यासक्रमांची मागणी करा. कुटुंबासाठी महिला नेहमीच आर्थिक, वैयक्तिक हिताचे बलिदान देतात. दोन्ही पालकांसाठी एकत्रित पगारी रजांचीही मागणी करायला हवी. प्रसूती रजेनंतर रुजू होणाऱ्या महिलांना प्रशिक्षण दिल्यास त्या रजेच्या काळातील कौशल्ये पुन्हा शिकू शकतील. नवजात मातांसाठी दूधासाठी फ्रिज, कामाच्या लवचीक वेळा आदी सुविधाही संस्थांमध्ये असाव्यात.

4) जबाबदारीने खरेदी करा
तुमच्या शॉपिंगच्या पद्धतीचा पर्यावरणावर, पर्यायाने महिला व मुलींच्या जीवनावर परिणाम होतो. हवामानबदलाच्या महिलांवर व्यापक परिणाम होतो. हवामान बदलातून निर्माण झालेल्या आपत्तींमुळे लैंगिक असमानता वाढते. त्यातून महिलांविरुद्धचा हिंसाचार, कुपोषणही वाढते. ते टाळण्यासाठी पर्यावरणपूरक उत्पादनांची निवड करा. 

5) तुमचे राजकीय हक्क वापरा
उच्चपदस्थ राजकीय वर्तुळात महिलांचे प्रतिनिधित्व नगण्य आहे. विविध देशांच्या संसदेत महिला सदस्यांचे प्रमाण केवळ २५ टक्के आहे. जागतिक नेतृत्वामध्ये महिला नेत्यांचे प्रमाण फक्त ७ % आहे. ते वाढविण्यासाठी महिलांनी मतदानाचे सोपे हत्यार वापरावे. मतदारयादीत नाव नसेल तर ते नोंदवा. कुटुंबीयातील सदस्य, मैत्रिणींनाही त्यासाठी प्रवृत्त करा. मताधिकार मिळण्यासाठी जगभरातील महिलांना मोठा संघर्ष करावा लागला, तुम्ही निदान एवढे तरी करायला हवेच.

6) मुलींना स्वत:चे मूल्य शिकवा
तारुण्यात पदार्पण करण्यापूर्वीच मुलींमध्ये स्वत:चे स्थान, भूमिकेबद्दलचे मत तयार होते. समाजात तुम्ही कुणावर तरी अवलंबून असणाऱ्या, असमर्थ असल्याचे त्यांना सांगितले जाते. त्यानुसार, वर्तन करण्याची सूचनाही मुलींना केली जाते. अशा प्रकारच्या रुढीबद्ध असमानतेमुळे मुलींना त्यांची खरी क्षमता ओळखता येत नाही. त्यामुळे, मुलींच्या मनात बालपणापासूनच त्या मुलांइतक्‍याच सक्षम, लायक असल्याचे रुजवा. बुद्धिमत्ता, नेतृत्व आदींबाबत त्यांचे कौतुक करा. 

7) स्त्रीवादी पुस्तके, चित्रपटांना पसंती द्या
एखाद्या लेखिकेने लिहिलेले पुस्तक घ्या किंवा महिला दिग्दर्शिकेचा चित्रपट पाहा. पुस्तके, चित्रपट, वृत्तपत्रे आदींचा समानतेच्या आकलनावर दीर्घकाळ परिणाम होतो. अजूनही या उद्योगावर पुरुषी वर्चस्व आहे. महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून साकारले जाते. तुम्ही महिलांनी निर्मिती केलेले चित्रपट पाहून, पुस्तके वाचून नारीशक्तीचा आवाज बुलंद करू शकता.

8) पुरुष हो..ला आव्हानं द्या!
पुरुषासारखा राहा, मुले रडत नाहीत. पुरुषत्वाच्या यांसारख्या कल्पना मुलांना नाउमेद करतात. त्यानंतर, पुरुषही मोकळेपणाने भावना व्यक्त करत नाहीत. तुमच्या कुटुंबात किंवा नात्यात पुरुषत्वाच्या संवेदनशील, काळजी घेणाऱ्या नव्या अभिव्यक्तीला पाठिंबा द्या. मुले, पुरुष मोकळेपणाने भावना व्यक्त करू शकतील, अशा वातावरणाला प्रोत्साहन द्या. त्यांना व्यक्त होण्याची संधी द्या. त्यांची चेष्टामस्करी करू नका.

9) निमित्त व्हा!
लिंग समानतेवरचा एखादा गट शोधा किंवा तुम्ही तयार करा. संयुक्त राष्ट्रांच्या वूमेन्स जनरेशन इक्वालिटी मोहिमेत सहभागी व्हा. तुमच्यासारख्या समानतेची मागणी करणाऱ्या मैत्रिणींना एकत्र करा. तुमच्या देणगीतूनही महिलांविरुद्धची हिंसा कमी होईल. आर्थिक समावेशकता वाढून महिला व मुलींना समान हक्क मिळण्यात मदत होईल. पहिले पाऊल महत्त्वाचे ठरते. तुम्ही या विषयावरील एखादा लेख लिहू शकता किंवा तुमच्या गावातील चर्चासत्रालाही उपस्थित राहू शकता.

10) सौंदर्याच्या मापदंडांना आव्हान द्या
ठिकाणानुसार सौंदर्याचे मापदंड बदलतात. मात्र, ते स्त्रीत्वाच्या उथळ, अवास्तव संकल्पनेला प्रोत्साहन देतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांकडून अधिक वेळ, पैशाची अपेक्षा ठेवली जाते. त्यातून स्त्रीची उपभोग्य वस्तू प्रतिमा बळकट होते. जाहिरातींमध्येही महिलांच्या अशा प्रतिमांचा वापर केला जातो. सौंदर्याच्या तुमच्या मनातील कल्पनांचा पुनर्विचार करा.

11) इतरांच्या निवडींचा आदर करा
प्रत्येक व्यक्तीला आपले शरीर, कुटुंब, भविष्य आदींचा निर्णय घेण्याचा हक्क असतो. एखाद्याची निवड तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर का, हा प्रश्न स्वत:लाच विचारा. तुम्ही कधीही न निवडलेला पर्याय समजून घेणे अवघड असते. तो निवडलेल्या व्यक्तीच्या जागी स्वत:ला ठेवून इतरांच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करा.

12) दुहेरीत्व नाकारा
स्त्री-पुरुषसारख्या संकल्पनेत तृतीयलिंगी व्यक्तींचे अस्तित्वच नाकारले जाते. प्रत्येक संस्कृतीत त्यांचे अस्तित्व असतेच. जगभरात तृतीयलिंगी किंवा ट्रान्सजेंडर व्यक्तींना भीषण अत्याचाराचा सामना करावा लागतो. त्यांच्या हक्कांचे रक्षण हाही लिंग समानतेचा अविभाज्य भाग होय. आपली दररोजची भाषा या सर्वांत मोठी भूमिका बजावते.

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महिलांसाठीच्या विविध कोर्सेसची माहिती घेण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com