पालकत्व निभावताना... : स्वतःवरचा विश्वास

maintaining-guardianship
maintaining-guardianship

मुग्धा कमालीची नाराज होती. आधीच शाळा सुरू होत नसल्याने तिचा कशातच मूड लागत नव्हता. अशातच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तिचा मूड चांगलाच गेला होता. कारणही तसेच होते. पाचवीच्या परीक्षेला तिने दिलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत तिला चांगले गुण मिळाले होते. ती शाळेत पहिली आली होती. त्यामुळे या परीक्षेतही चांगले गुण मिळतील, अशी तिला अपेक्षा होती. अर्थात, शाळेतील शिक्षकांनाही तिच्याकडून अपेक्षा होती. मात्र, थोड्या गुणांनी तिला हुलकावणी मिळाली होती. घरातच शांत बसली असताना आई आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुग्धाचा पडलेला चेहरा पाहून तिने विचारले, ‘बाळा, काही होत आहे का?’ त्यावर फार न बोलता मुग्धाने थेट मुद्द्यालाच हात घातला. रडक्या आवाजात आईला बिलगत ती म्हणाली, ‘आई, यंदा मला शिष्यवृत्ती नाही मिळाली.’ तिच्या आईला काय झाले ते लक्षात आले. तिच्या हातात बरोबर आणलेला चॉकलेटचा बॉक्स देत म्हणाली, ‘अगं वेडाबाई, इतकं नाराज व्हायचं नसतं. मला सकाळीच तुझ्या बाईंचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितला निकाल. म्हणूनच मी बाहेर जाऊन तुला आवडीचे चॉकलेटचा बॉक्स घेऊन आले. अगं, ही परीक्षा महत्त्वाची असतेच; मात्र यश मिळालं नाही म्हणून इतकं नाराज व्हायचे कारण नाही. ही काही तुझी पहिली आणि शेवटची परीक्षा नाही. अगं, ही तर सुरुवात आहे. तुला यापुढील काळात अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे एका परीक्षेत अपयश आलं म्हणून नाराज व्हायचे काहीच कारण नाही.’’

‘अगं आई, मागच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मी शाळेत पहिली आली होते. आताही तसंच होईल अशी माझीच नाही, तर शिक्षकांची आणि माझ्या मैत्रिणींची अपेक्षा होती. प्रत्यक्षात भलतंच झालं. काय वाटत असेल शिक्षकांना आणि मैत्रिणींना? बरं झालं, शाळा बंद आहे, नाहीतर मला कोणाला तोंड दाखवणं अवघड झालं असतं,’’ मुग्धाने एका दमात आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. 

‘अच्छा, असं आहे तर...’ आईने वातावरण शांत होण्यासाठी दीर्घ पॉझ घेत उत्तर दिले. ‘‘बाळा, कोणाला काय वाटेल, कोण काय बोलतं, याला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं ना, मग असे प्रश्न निर्माण होतात. कोणाला काय वाटतं, यापेक्षा आपल्याला काय वाटतं ना, ते महत्त्वाचं आहे. आणि एका परीक्षेच्या निकालावरून तुझी हुशारी किंवा ‘ढ’पणा ठरत नाही. काही परीक्षा या आपल्यासाठी द्यायच्या असतात. आणि प्रत्येक परीक्षेत आपण ठरवल्याप्रमाणे यशस्वी होतोच असे नाही. कदाचित पुढीत काही गोष्टी चांगल्या होण्यासाठीही अपयश पदरी पडलं असेल. त्यामुळे कोणताही न्यूनगंड न ठेवता तू आत्मविश्वासानं परिस्थितीला सामोरी जा. पुढचा काळ हा तुझाच असेल. फक्त स्वतःवर विश्वास ठेव.’’

आईच्या या उत्तराने मुग्धा एकदम चार्ज झाली. ‘थँक्यू सो मच आई... तूच खरी माझी मैत्रीण आहेस,’’ असे म्हणत ती आईला बिलगली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com