वुमन हेल्थ : गरोदरपणात जाणवणारा अशक्तपणा

डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ
Saturday, 26 December 2020

गरोदरपणात सामान्यपणे स्त्रीला थकवा, झोपाळूपणा, अशक्तपणा व कोणतेही काम करण्यास निरुत्साह जाणवू शकतो. लघवीला अनेकदा जावे लागणे, मळमळणे व उलट्या, रक्तशर्करेची बदलती पातळी ही काही कारणे आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता पुढची बघू या.

गरोदरपणात सामान्यपणे स्त्रीला थकवा, झोपाळूपणा, अशक्तपणा व कोणतेही काम करण्यास निरुत्साह जाणवू शकतो. लघवीला अनेकदा जावे लागणे, मळमळणे व उलट्या, रक्तशर्करेची बदलती पातळी ही काही कारणे आपण गेल्या आठवड्यात बघितली. आता पुढची बघू या.

हायपोटेन्शन 
गरोदरपणात स्त्रीचा रक्तदाब इतरांपेक्षा कमी होतो. कारण गरोदरपणात मातेच्या हृदयाकडून पोटातील बाळाकडे रक्तप्रवाह अधिक प्रमाणात वाहतो. रक्तदाब कमी होण्याबरोबरच डोकेदुखी, आळस येणे, मोठ्या प्रमाणावर घाम येणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे अशा समस्या येऊ शकतात. रक्तदाबाची पातळी सुरळीत राखण्यासाठी पाणी व द्रव पदार्थ भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरीरात होणारे बदल
गरोदरपणादरम्यान स्त्रीच्या शरीरात अचानक वजन वाढणे, हात व पायांवर सूज येणे, आठव्या व नवव्या महिन्यात पोटाचा घेर वाढणे, असे अनेक बदल होतात. त्यामुळे तिच्या पाठीच्या कण्यावर आणि शरीरावर मोठा ताण पडतो. त्यामुळे हालचालीही मंदावतात.

जीवनसत्त्वांची कमतरता 
अशक्त असलेल्या आणि रक्तातील हिमोग्लोबिन कमी असलेल्या स्त्रियांना जीवनसत्वांची कमतरता जाणवते. महिलांच्या रक्तात किमान दहा ग्रॅम हिमोग्लोबिन गरजेचे असते. गरोदरपणाच्या काळात हे प्रमाण राखण्यासाठी लोहाच्या गोळ्या घेणे आवश्यक आहे. या गोळ्यांचे ॲसिडिटी आणि उलट्या असे दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात औषध घेतल्यास; तसेच लिंबूपाणी घेत राहिल्यास ही समस्या कमी होते. बी १२ जीवनसत्वाच्या अभावामुळे अशक्तपणाची समस्या येऊ शकतात. स्नायू ताणले जाणे, झोपाळूपणा आणि अशक्तपणा टाळण्यासाठी बी १२ जीवनसत्त्व घेण्याची गरज असते. गरोदरपणाच्या काळात सांधेदुखी व तळपायातील वेदनांमुळे स्त्रीला त्रास होऊ शकतो. गुडघे व मनगटांमध्येही वेदना होऊ शकतात. अशावेळी ड जीवनसत्वाची पातळी तपासणे आवश्यक असते. मातेच्या शरीरात कॅल्शियम शोषले जाण्यासाठी ड जीवनसत्वाची गरज असते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक आहार घ्यावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे उपाय करा

  • आहाराचे नियोजन : या काळात डॉक्टरांच्या सल्ल्याने मातेच्या आहाराचे नियोजन कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. दर दोन तासांनी आहार घेणे फायदेशीर ठरते.
  • भरपूर पाणी पिणे :  या काळात पाणी व द्रव पदार्थ भरपूर घेणे आवश्यक आहे. दररोज तीन ते चार लिटर द्रव पदार्थ घेणे गरजेचे असून त्यात साधे पाणी, शहाळ्याचे पाणी, फळांचा रस, लिंबू पाणी यांचा समावेश असावा.
  • प्रथिनांचे योग्य प्रमाण : स्नायू मजबूत होण्यासाठी ताकद व स्टॅमिना वाढण्यासाठी आणि क्षमता उंचावण्यासाठी मातेने योग्य प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे बाळाचे वजन वाढणे; तसेच त्याचे स्नायू चांगल्या प्रकारे तयार होणे असेही फायदे होतात.
  • ध्यानधारणा : श्‍वसनाचे व्यायाम; तसेच अन्य व्यायामांबरोबर ध्यानधारणाही करणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्याबरोबरच शारीरिक क्षमता, तसेच श्वसनव्यवस्था सुरळीत होणे आणि अशक्तपणा कमी होणे असे फायदे होतात.
  • व्हिटॅमिन्स : व्हिटॅमिनची कमतरता जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य पूरक आहार नियमित घेणे आवश्यक आहे.
  • डॉक्टरांचा सल्ला : पहिल्या काही महिन्यांत प्रमाणापेक्षा अधिक मळमळ किंवा उलट्या होत असतील, तर त्वरित डॉक्टरांशी सल्लामसलत करावी. चौरस व पौष्टिक आहार आणि योग्य औषधे वेळेवर घेतल्याने अशक्तपणा कमी होऊन मातेची क्षमता वाढते.
  • विश्रांती : वर दिलेले सर्व उपाय केल्यानंतरही गरोदरपणाच्या काळात स्त्रीला आरामदायक आणि निरोगी वाटत नसेल, तर तिला संपूर्ण विश्रांतीची गरज असते. रात्रीची आठ तास, दिवसा दोन तास झोप आवश्यक असते. शारीरिक थकवा येईल असे कोणतेही काम करता कामा नये. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनी या काळात काम व घर यांत योग्य समतोल राखावा आणि विश्रांतीसाठी पुरेसा वेळ द्यावा. प्रोटिन असलेली बिस्किटे, फळे, सुकामेवा व फ्रूट ज्यूस असलेली बाटली या नेहमी आपल्याजवळ बॅगेत बाळगाव्यात आणि नियमित या पदार्थांचे सेवन करावे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dr Aasha Gawade on Women Health