esakal | ‘पॉवर’ पॉइंट : फोकस ठरवा आणि टाका पुढचं पाऊल
sakal

बोलून बातमी शोधा

‘पॉवर’ पॉइंट : फोकस ठरवा आणि टाका पुढचं पाऊल

स्त्रीत्वात एक दुर्दम्य अशी शक्ती असते. सौंदर्यापासून बुद्धीपर्यंत प्रत्येक गोष्टींना किंचित पैलू पाडले, की ती झळाळून उठते. अशाच शक्तींची जाणीव करून देणारं हे सदर.

‘पॉवर’ पॉइंट : फोकस ठरवा आणि टाका पुढचं पाऊल

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

स्त्रीत्वात एक दुर्दम्य अशी शक्ती असते. सौंदर्यापासून बुद्धीपर्यंत प्रत्येक गोष्टींना किंचित पैलू पाडले, की ती झळाळून उठते. अशाच शक्तींची जाणीव करून देणारं हे सदर.

‘An arrow can only be shot by pulling it backward. So, when life is dragging you back with difficulties, it means that it’s going to launch you into something great. So just focus, and keep aiming.’

धनुष्यात ताणलेला बाण लक्ष्यावर सोडायचा असेल, तर आधी तो मागे खेचावा लागतो. मागे काही काळ त्याच ठिकाणी ताणून धरावा लागतो. नेमका फोकस ठरवावा लागतो आणि मग सोडावा लागतो. इंग्रजीमधलं हे वाक्य माझ्या डोक्यात पक्कं बसलंय. माझ्या मते बाण किती वेगात सोडला जातोय, यात ताकद दिसत नाही; तर तो किती काळ मागे घट्ट ताणून धरण्याची क्षमता होती, यात खरी ताकद, धैर्य दिसतं. समस्त स्त्रियांमध्ये अशीच कठीण गोष्टीही स्वतःकडे खेचून धरण्याची अफाट ताकद असते. फक्त ती ताकद, धैर्य आपल्याकडे आहे, याची जाणीव होऊ नये, असं वातावरण अनेकदा पुरुषप्रधान संस्कृतीत अनेकींच्या आजूबाजूला असतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘मैत्रीण’ सदरासाठी लिहिण्यास विचारल्यावर आधी वाटलं वर्षभर काय लिहिणार, मुलींचे विषय असे कितीसे असणार..? पण, नंतर वाटलं, वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या-माझ्यामधल्या ताकदीची जाणीव पुन्हा एकदा करून देण्यासाठी हे सदर उत्तम असेल. टीव्ही माध्यम बदलण्याचा निर्णय घेतल्यापासून हा असा बाण मी केव्हाचा मागं खेचून धरलाय. तो सोडण्यासाठीचा श्वास उरात पूर्ण भरेपर्यंत, ‘हातात बाण आहे’ ही भावनाच नव्या शक्यता निर्माण करते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरलेल्या वर्षात लॉकडाउन निमित्त ठरल्यानं नेहमीपेक्षा जास्तच काळ कुटुंबीयांसोबत घालवला गेला. यादरम्यान अनेकींना रोजच्या आयुष्यातली दुर्लक्षिलेली नाती कधी नव्यानं सापडली असतील. कधी रोजची घट्ट म्हणावी नातीही ‘दुर्लक्ष करावीत’ इतकी टोकाला गेली असतील. कधी नवं ध्येय मिळालं असेल किंवा ‘हे तर माझं ध्येय नव्हतंच’ असंही वाटलं असेल. एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून नात्यांमधला, ध्येयांमधला झालेला हा बदल या सदराच्या निमित्तानं आपण मांडूया का? हे काही फार तात्त्विक वगैरे नसेल. पण, अशा असंख्य मुली असतील, स्त्रिया असतील; ज्या कधी एकट्या बसल्यावर असे विचार करत असतील. ते विचार आपण इथं मांडूया का? 

ध्येय गाठताना नाती मध्ये आली असतील, नातं जपताना ध्येय मध्ये आलं असेल. असा गुंता पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या वाट्याला अधिक येतो. पण, हा गुंता हक्काच्या पुरुषाच्या मदतीनंच सोडवता येतो. स्त्री-पुरुष समानता ही तोकडे कपडे, सिगारेट, दारू याला पुरुषांनी स्त्रियांना दिलेली ‘परवानगी’ याच्याही पलीकडची असते. नातं-आणि ध्येय एकाच वेळी जपायला लागणाऱ्या ताकदीची, धैर्याची गोष्ट यापुढे आपण बघू. तुमच्या आयुष्यातला हक्काचा ‘तो’ डोक्यात ठेवा आणि या नव्या वर्षात हा बाण आणखी ताणून धरा... सोडलेल्या बाणाआड तो आला नाही तर नातं आपलं... नाहीतर बाणाच्या टोकावर असलेल्या धैर्याला उरात भरून पुढे घेऊन जाऊ. पुढच्या सदरात स्वतःबद्दल मनात विलक्षण प्रेम, विश्वास घेऊन मला भेटा.
(लेखिका पत्रकार आणि युट्यूबर आहेत.)

Edited By - Prashant Patil

loading image