जनरेशन नेक्स्ट : सोशल ‘हॅकर्स’पासून सावधान!

Hackers
Hackers

सोशल मीडियावरचा आपला वावर कितीही आनंददायी आणि उपयुक्त असला, तरी त्यात अनेक प्रकारचे धोकेही असतात. या धोक्यांपासूनच्या बचावाची माहिती असणं गरजेचं आहे. उदा... तुम्हाला तुमच्या मित्र किंवा नातेवाइकाकडून किंवा एखाद्या सोशल मीडियावर जोडल्या गेलेल्या व्यक्तीकडून मेसेज येतो. ‘मी कुठंतरी खूप अडचणीत सापडलो आहे, मला तातडीनं अमुकएक रुपयांची गरज आहे. पुढील नंबरवर ते पैसे तातडीनं पाठव प्लीज,’ तुम्हाला त्या मित्राची काळजी वाटते आणि घाई गडबडीत असाल, तर काहीही शहानिशा न करता तुम्ही ते पैसे पाठवता आणि फसता. सोशल मीडियावरच्या ‘हॅकर्स’कडून हा फसवणुकीचा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. 

हॅकर्सचे उद्योग...

  • ‘अकाउंट हॅक करणे’ म्हणजे एकाद्या अकाउंटवर अनधिकृतरीत्या ताबा मिळवणं. अकाउंट हॅक करणाऱ्या व्यक्तीला ‘हॅकर’ असं म्हणतात. 
  • आपल्या अकाउंटवर ताबा मिळवून पैसे किंवा माहिती चोरणं किंवा व्हायरस पसरवणं अशा विविध हेतूंनी ते अकाउंट हॅक करतात. 
  • आपलं युजरनेम सोशल मीडियावर दिसतं, हॅकर्स पासवर्ड चोरून अकाउंटचा ताबा घेतात. 
  • त्यानंतर आपली सर्व व्यक्तिगत खासगी माहिती, आपली मित्रयादी इत्यादी माहिती आपसूक चोरता येते. याशिवाय त्यांना आपल्या नावानं आपल्या मित्र-मैत्रिणींना मेसेजेस पाठवता येऊ शकतात आणि त्यातून त्यांची फसवणूक करता येते.
  • व्हायरस किंवा अश्लील साहित्य पसरवण्यासाठी ते आपल्या अकाउंटचा वापर करू शकतात. यातून आपलं नाव विनाकारण खराब होण्यापासून मित्रांचं आर्थिक नुकसान होण्यापर्यंत काहीही घडू शकतं. 

ही काळजी घ्या

  • आपला पासवर्ड कोणीही सहज ओळखू शकेल असा ठेवू नये. अत्यंत अवघड पासवर्ड ठेवावा आणि तो दर काही महिन्यांनी बदलत राहावा. 
  • बहुसंख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ची (TFA) सोय असते. म्हणजे, पासवर्ड आणि OTP किंवा एखादा कोड टाकूनच लॉगिन करता येतं. जिथं ही सोय आहे, तिथं ती सुरू करावी. 
  • आपला मोबाईल किंवा स्वतःचा लॅपटॉप इत्यादी सोडून कोणत्याही ‘पब्लिक’ कॉम्युटरवरून (उदा. सायबर कॅफे) आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लॉगिन होणं टाळावं. लॉगिन करावं लागल्यास आठवणीनं लॉगआउट व्हावं.
  • गुगलचं प्लेस्टोअर किंवा ॲपलचं ॲपस्टोअर सोडून इतर अनधिकृत ठिकाणांवरून इन्स्टॉल करणं टाळावं. अनधिकृत ॲप्समध्ये पासवर्डची चोरी करणारी ॲप्स असतात.
  • आपल्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये योग्य ॲन्टिव्हायरस सॉफ्टवेअर वापरावं. त्यामुळं पासवर्ड चोरणारी सॉफ्टवेअर्स किंवा ॲप्स वेळीच ओळखून ती उडवता येतात.

आपण सोशल मीडियावर आपली अधिकाधिक वैयक्तिक माहिती टाकायला लागलो आहोत आणि अधिकाधिक लोकांशी तिथंच संवाद साधायला लागलो आहोत. आपण पाकीट, पर्स किंवा बँक अकाउंट चोरांपासून जितक्या कसोशीनं जपतो तितक्याच कसोशीनं आपलं सोशल मीडिया अकाउंट हॅकर्सपासून जपणं महत्त्वाचं बनलं आहे! 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com