जनरेशन नेक्स्ट : सोशल मीडियाचं व्यसन

प्रसाद शिरगावकर
Thursday, 24 December 2020

सोशल मीडियाच्या वापरातला एक मोठा धोका म्हणजे सोशल मीडिया आणि एकुणात त्याच्यामुळं मोबाईलचं व्यसन लागणं. दिवस-रात्र सतत आपल्या मोबाईलमध्ये मान घालून बसलेली खूप माणसं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत असतील. देशात सध्या ३८ कोटी लोक सोशल मीडियाचा वापर करतात. कदाचित तुम्ही स्वतःही असं करत असाल!

सोशल मीडियाच्या वापरातला एक मोठा धोका म्हणजे सोशल मीडिया आणि एकुणात त्याच्यामुळं मोबाईलचं व्यसन लागणं. दिवस-रात्र सतत आपल्या मोबाईलमध्ये मान घालून बसलेली खूप माणसं तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसत असतील. देशात सध्या ३८ कोटी लोक सोशल मीडियाचा वापर करतात. कदाचित तुम्ही स्वतःही असं करत असाल! हल्ली बहुसंख्य लोक  सकाळी उठल्या उठल्या करत असलेली पहिली गोष्ट म्हणजे, मोबाईलमध्ये डोकावून व्हाॅट्सॲपवर काय आलंय, फेसबुकवर काय झालंय, इन्स्टाग्रामवर कोणी काय पोस्ट केलंय, आपल्या कालच्या पोस्टला किती लाइक मिळाले आहेत, हे सगळं सगळं अत्यंत कंपल्शन असल्यासारखं तपासून बघतात! त्याचबरोबर दर काही मिनिटांनंतर कुठं काय घडतंय, काय होतंय, काय चाललंय हे दिवसभर बघत राहायची लोकांना सवय लागली आहे.

आपल्या खऱ्या आयुष्यात आपल्या आजूबाजूला असलेली खरी माणसं यांच्याशी खराखरा संवाद साधायचा सोडून, सतत आभासी जगातल्या आभासी माणसांबरोबर सुरू असलेला संवाद आपल्याला जास्त आवडायला लागला आहे, त्याचं आपल्याला व्यसन लागायला लागलं आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. सोशल मीडियाद्वारे आपण अनेक लोकांशी जोडले जाऊ शकणं हे अत्यंत जादुई आणि महत्त्वाचं आहे, हे खरंच, ते करताना खऱ्या आयुष्यातल्या खऱ्या माणसांबरोबर नाती आपण सांभाळू शकत नसू आणि त्यात दुरावा निर्माण होत असेल, तर या आभासी जगाचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा आणि दूरगामी परिणाम होईल. असा होऊ नये, असं वाटत असल्यास सोशल मीडियाच्या अधीन होऊन, वाहवत जाऊन स्वतःच्या आयुष्यातल्या खऱ्या नात्यांपासून आपण दूर जात नाही आहोत ना, हे सतत तपासून बघणं गरजेचं असतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यसन लागू नये म्हणून

  • आपण दिवसातला किती वेळ सोशल मीडिया वापरणार आहोत, यावर बंधन घाला. 
  • आपल्या प्रत्येकाच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार हा वेळ बदलेल. अर्धा तास असू शकेल, एक तास असू शकेल कदाचित दोन तासही; पण याहून जास्त वेळ मी सोशल मीडियावर घालवणार नाही, असं स्वतःला ठामपणे बजावायचं आणि ते अमलात आणायचं. 
  • दर काही दिवसांनी, काही महिन्यांनी  काही काळासाठी सर्व प्रकारच्या सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहायचं. 
  • आपण एक आठवडाभर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सॲप वापरलं नाही, तर जगात आणि आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही हे पुन्हा पुन्हा अनुभवून बघायचं.  
  • सर्व कुटुंबीय एकत्र बसलेले असताना कोणीही आपला मोबाईल जवळ ठेवायचा नाही, किमान जेवताना सगळ्यांनी एकत्र बसून आपापले मोबाईल दूर ठेवूनच गप्पा मारत जेवायचं. 
  • कुठल्याही गेट-टुगेदरला किंवा पार्टीला सगळेजण भेटल्यानंतर आणि एकदा सेल्फी वगैरे काढून झाल्यानंतर, सगळ्यांनी आपले मोबाईल किमान अर्ध्या तासाकरिता आपल्या पिशवीत किंवा पर्समध्ये ठेवून मगच गप्पा मारायच्या. 

यासारखे काही नियम आपण करायला लागलो तर आपण स्वतः मोबाईल आणि सोशल मीडियाच्या व्यसनापासून दूर जायला लागूच आणि आपल्या कुटुंबीयांना आणि मित्र-मैत्रिणींनाही हे करायला आपण मदत करू शकू.  करून बघा. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Prasad Shirgavkar on Social media