वुमनहूड : माझी दुसरी बाजू 

रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री
Saturday, 5 December 2020

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, माणसाच्या मेंदूच्या सुद्धा. वटवृक्षाच्या सुद्धा दोन बाजू असतात, जमिनीखालची आणि जमिनीवरची; पण बघताना मात्र आपल्याला एकच बाजू दिसते. माझ्याही दोन बाजू आहेत. प्रत्येकाच्या असतात. पण, होतं असं, की या धकाधकीच्या जीवनात आपण विसरून जातो, की आपल्यालाही दुसरी बाजू आहे. खरं तर इतरांनाही दुसरी बाजू असू शकते, हेसुद्धा आपल्याला लक्षात राहत नाही.

प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, माणसाच्या मेंदूच्या सुद्धा. वटवृक्षाच्या सुद्धा दोन बाजू असतात, जमिनीखालची आणि जमिनीवरची; पण बघताना मात्र आपल्याला एकच बाजू दिसते. माझ्याही दोन बाजू आहेत. प्रत्येकाच्या असतात. पण, होतं असं, की या धकाधकीच्या जीवनात आपण विसरून जातो, की आपल्यालाही दुसरी बाजू आहे. खरं तर इतरांनाही दुसरी बाजू असू शकते, हेसुद्धा आपल्याला लक्षात राहत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्या पोस्ट वाचून सोशल मीडियावर काही लोक मला मेसेज करून विचारतात : ‘तुम्ही नेहमीच एवढ्या आनंदी कशा राहता?’ मला त्यांनी विचारलेल्या प्रश्नात असलेल्या विश्वासाचं कौतुक वाटतं. अर्थात, त्यांना तसं वाटणं साहाजिक आहे; कारण माझ्या पोस्ट/विचार सकारात्मक ऊर्जा देणारे असतात. दुःखं कोणाला नसतात? मलाही आहेत. फरक फक्त एवढाच, की माझी दुःखं ही फक्त माझी आहेत. त्यावर पुणेरी पाटी आहे : ‘परवानगीशिवाय आत येण्यास सक्त मनाई आहे.’ सुखांना मात्र मी वाटून घेते. तिथं कुठलीही पाटी नाही. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराजवळील वटवृक्षासारखी : ‘या, घरटं बांधा, आनंदात राहा.’ मग मी माझ्या दुःखांना घेऊन करते काय? ती जातात कुठं? त्याचं उत्तर माझ्या दुसऱ्या बाजूजवळ आहे. तिला ते माहीत असतं.

बऱ्याच वेळा माणसाची एक बाजू लंगडी, दुखरी असते; तर दुसरी बाजू प्रतिभावंत आणि समृद्ध. प्पं करून सांगायचं, तर डोंगराच्या एका बाजूला खडकाळ खोल दरी, तर दुसऱ्या बाजूला खळखळ वाहणारी नदी. माझंही साधारण तसंच आहे; पण फरक हा आहे, की एका बाजूला उनाड, अल्लड, अवखळ, बेधुंद नदी आहे; तर दुसऱ्या बाजूला पठार आहे, जिथं हिरवंगार शेतकाम सुरू असतं. माझ्यातला शेतकरी जेवढं जास्त काम करेल, तेवढं पीक उगवेल. हे काम झाल्यावर आनंद होतो; पण दुःख असल्याशिवाय आनंदाची परिभाषा कोणाला करता आली आहे? कलाकाराच्या आयुष्यात तर दुःखं असावीच म्हणतात. एखाद्या गरोदर महिलेप्रमाणं. प्रसूतिकाळात मरणप्राय यातना होतात; पण एकदा का बाळ जन्माला आलं, की सगळ्याचा हिशेब लागतो. एखाद्या भूमिकेचा शोध घेताना, कविता कागदावर उमटवताना अशीच अनुभूती होते.

मी कोण आहे? मला नेमकं काय करायचं आहे? मला कुठं जायचं आहे? काय मिळवायचं आहे आणि काय द्यायचं आहे..? असे प्रश्न प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी भंडावून सोडतात. मलाही अशा प्रश्नांची लाट आजही अस्वस्थ करते. तेव्हा खरं तर माझी दुसरी बाजू बोलायला लागते. शोध सुरू होतो. ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन’, हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेल. त्याला अचूक पर्यायी वाक्प्रचार आपल्या मराठीत नाही; पण त्याच्या जवळचाच म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’. या वाक्यामुळे माझ्या आयुष्यातली अनेक वर्षं संभ्रमात गेली. शेतजमीन नांगरायची राहिली म्हणून समजा. हा लेख अशा लोकांसाठी आहे ज्यांना आयुष्यात बरंच काही करायचं आहे आणि ज्यांना वारंवार सांगण्यात आलं आहे, की ‘तू आयुष्यात एकच गोष्ट कर’. का म्हणून आपण दुसऱ्याचं ऐकायचं?

आपल्याला आपला शोध लागला नाही म्हणून, का त्यांना चार गोष्टी करता आल्या नाही म्हणून? माझी एक बाजू अभिनेत्री म्हणून कार्यरत असते, तेव्हा माझी दुसरी बाजू पेंटिंग, ट्रेकिंग, सायकलिंग, लिखाण, कल्पनाविष्कार करत असते. माझ्या आतलं रसायन वेगळं आहे. मला हे करायला भाग पाडतं. आणि म्हणूनच मी लोकांना आनंदी दिसते. मी हे सगळं थांबवलं, काहीच केलं नाही, तर मी अस्वस्थ होते. मी ‘एकच गोष्ट कर’ सांगणाऱ्या लोकांची बाजू समजू शकते; पण माझ्या दुसऱ्या बाजूचं काय? ती मलाच समजून घ्यावी लागणार. हाती घेतलेल्या कुठल्याही कामात आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न असतोच. किंबहुना करतेच; पण कधीतरी मन आणि शरीर क्षीणतं. माणूस आणि मशीन यातला हाच काय तो फरक. माझी दुसरी बाजू लंगडी, दुखरी न होता माझ्याकडून वेळ मागते. प्रेम करायला सांगते. यावर उपाय एकच असतो. त्या क्षणी मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आत शोधायचं आणि तसं वागायचं.

शेतकाम करत असताना आहेत काही जमिनी न नांगरलेल्या, काही ओसाड, काही प्रयत्न करूनही फळ न लागलेल्या, मनासारखं काम न झालेल्या; पण म्हणून काय हातावर हात ठेवून बसतं का कुणी? शोध सुरू ठेवायचा, काम करत राहायचं. स्ट्रेस हॉर्मोन्स ना डोपामाइन आणि ऑक्सिटॉसिनमध्ये परिवर्तित करण्याचं शेतकाम करत राहायचं. माझ्यासारख्या अभिनेत्रीला ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स’ असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं जाऊन साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत जिवंतपणा जाणवतो. तूर्तास एवढं तरी मला कळलं आहे. दुसऱ्यांकडं बघताना त्यांच्याही दोन बाजू असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्या कोणत्या बाजूला आहात, हे तपासून पाहा. एका वेळेला एकच बाजू स्पष्ट होते; पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, समजो वा न समजो.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write radhika deshpande on my Second Side