वुमनहूड : घंटा आणि खुर्ची!

Radhika-Deshpande
Radhika-Deshpande

फोटोत मी तुम्हाला ज्या खुर्चीवर बसलेली दिसते आहे, ती कोणा सरकारी कर्मचाऱ्याची किंवा कोणा नेत्याची नाही. ‘घंटा-खुर्ची’ खेळातली तर नाहीच नाही. ही खुर्ची आहे बालगंधर्व रंगमंदिरातल्या पहिल्या रांगेतील माझी राखीव खुर्ची. काल रात्री आम्ही देशपांडे म्हणजेच सासू-सासरे, नवरा, मुलगी आणि मी एकत्र नाटक पाहायला गेलो. नाटक!

मराठी माणूस हा नाटकप्रेमी. नाटक हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे असं म्हणायला हरकत नाही. लॉकडाऊनचा कडक उपास झाल्यानंतर नाटकाला एकत्र जाण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. आम्ही छान तयार होऊन एखादा पंचतारांकित सोहळा साजरा करायला जातो आहोत असे निघालो. पहिली घंटा झाली आणि आम्ही खुर्चीवर जाऊन बसलो. देखण्या कलाकारांनी सादर केलेलं चुरचुरीत ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक सुरू व्हायला थोडा वेळ होता. मी मनातल्या मनात रंगदेवता नटेश्र्वराला म्हटलं - ‘‘मला जरा तुझ्या वास्तूला डोळे भरून पाहू दे, तुझ्या माझ्या अंतरातल्या जड लालबुंद, उंच, झालरी असलेल्या, फुलासारख्या डौलणाऱ्या मलमली मऊ पडद्याला पाहू दे. मंद दिव्यांचा प्रकाश सोडणाऱ्या त्या लाईट ऑपरेटरला त्याच्या कॉकपिटसारख्या जागेत बसलेलं पाहू दे, माझ्यासारख्या सहस्र संख्येनं आलेल्या प्रेक्षकांवर एकदा नजर फिरवू दे. आजूबाजूचे प्रेक्षक अंतर राखून कुजबुज करताहेत, थोडे कान मोठे करून ऐकू दे... माझ्याच इतके उत्साहात आनंदात ते एकमेकांशी काय बोलताहेत ते...’’ 

तेवढ्यात दुसरी घंटा झाली आणि माझं लक्ष डाव्या-उजव्या बाजूला रिकाम्या ठेवलेल्या खुर्च्यांकडे गेलं. त्या चक्क बोलायला लागल्या की माझ्याशी. त्या म्हणाल्या, ‘‘काय सांगू राधिका, नुसतं बसून बसून कंटाळा आला होता. अचानक आलेलं रिकामपण सहन होईना. दिवस आणि रात्र गाजवल्या आहेत आम्ही. जेमतेम पाच तासांची झोप असायची आमची. या लॉकडाउनमध्ये दिवस आणि रात्र एकसारखेच. काही दिवस आम्ही एकमेकांशी बोललो. पडदे भिंतींशी, भिंती रांगमंचाशी, रंगमंच आमच्याशी. गोड आठवणींमध्ये जगलो. आठवून आठवून हसलो, रडलो. माझ्या खुर्चीत एकदा डॉ. श्रीराम लागू, आशालता वाबगावकर, रत्नाकर मतकरी बसले होते. आणि तुझ्या बाजूच्या खुर्चीत निर्माते, दिग्दर्शक आणि तू ज्या खुर्चीत बसली आहेस त्यावर अनेकदा जास्तकरून लहान मुलंच बसली आहेत. आम्हाला आवडलं असतं तू इथं बसली असतीस तर; पण नाही ना बसू शकत कोणी...’ मी म्हटलं ‘का?’ ‘ते बुकिंग चार्ट बनवणारे आम्हाला नाही आवडत. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगमुळे हिच्यावर नंबर लावला आणि आमच्यावर फुली. आम्हाला हे अजिबात आवडलं नाहीये. आम्हाला पण संधी द्यायला हवी का नको?’’ मी म्हटलं, ‘अशा हिरमुसून जाऊ नका. हे बघा, हेही दिवस जातील. परत चांगले दिवस येतील.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उजवीकडची खुर्ची म्हणाली, ‘येतील म्हणजे येतीलच. तुला सांगते राधिका, काही लोक म्हणत होते- आता नाट्यसृष्टीचं काही खरं नाही. गेले ते दिवस भरभराटीचे, गेले ते दिवस हाऊस फुल्ल बोर्डाचे, त्याची जागा ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी घ्यायला सुरुवात केली आहे.’ डावीकडची खुर्ची म्हणाली, ‘‘तुला सांगते, सिनेमांचा जोर वाढला तेव्हा, दूरदर्शन आलं तेव्हाही लोक हेच म्हणाले, की आमचा उपयोग राहणार नाही. खूप पाहिलीत अशी माणसं, बदलणारे ऋतू! अगं, कोरोना आला आहे. काही जगबुडी झाली नाहीये. नाटक ही जिवंत कला आहे. ती एक अनुभूती आहे, एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. शब्द, नाद, हालचाली, कृती, भाव, रंग एकत्र येऊन तयार झालेलं हे शक्तिपीठ आहे. दिवस चांगले-वाईट येत राहातील. जिवंत कलेला मरण नाही. आम्हाला तुमच्या मनातले विचार कळतात. तुमच्या खदाखदा हसण्याने, मुसुमुसू रडण्याने, टाळ्यांची, वाह-वाहची दाद ऐकून आम्हीसुद्धा सुखावतो!’’

...तेवढ्यात तिसरी घंटा झाली. मी म्हणाले, ‘‘खुर्च्यांनो, आता शांत बसा. नाटक सुरू होतं आहे.’’ हळूहळू प्रेक्षागृहातला प्रकाश मंदावला. पडद्यावरचा प्रकाश उजळला. संगीत नसानसांमध्ये शिरायला लागलं. पडदा उघडला आणि वास्तव आणि काल्पनिक जागेमध्ये राहिली ती निव्वळ अस्पष्ट, तरल रेषा. नाटक सुरेख होतं. उत्तम लेखन, दिग्दर्शन, कलाकार आणि निर्मितीचा चुरचुरीत खट्टा-मिठा चिवडा! जाता जाता मी बसलेली खुर्ची म्हणाली, ‘‘माझ्या मैत्रिणींवर पण प्रेक्षकांना आलटूनपालटून बसवायला सांग. विसरू नकोस गं मुली.’’ मी म्हणाले, ‘‘तू म्हणशील तसं. तथास्तु! आणि हो अशाच व्यक्त होत रहा. येते मी.’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com