सौंदर्यखणी : रेखानं ओळख दिलेली कांजीवरम; सोळाव्या शतकापासूनचा इतिहास

रश्मी विनोद सातव
Friday, 1 January 2021

स्त्रीचं सौंदर्य खऱ्या अर्थानं खुलवणारं वस्त्रप्रावरण म्हणजे साडी. या साडीचे कित्येक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार तितकाच सुरेख. त्यांची ओळख करून देणारं हे सदर.

स्त्रीचं सौंदर्य खऱ्या अर्थानं खुलवणारं वस्त्रप्रावरण म्हणजे साडी. या साडीचे कित्येक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकार तितकाच सुरेख. त्यांची ओळख करून देणारं हे सदर.

अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या अदाकारीनं आजही भुरळ घालणारी लावण्यवती अभिनेत्री म्हणजे रेखा. अलीकडच्या काळात कोणत्याही ॲवॉर्ड शोमध्ये जेव्हा जेव्हा रेखा दिसली आहे, तेव्हा नाजूकपणे मोकळे केस सावरत वावरणाऱ्या रेखाच्या साडीकडं आपलं लक्ष गेलं नसेल तर नवलच. हीच ती कांजीवरम साडी. रेखाकडं कांजीवरम साड्यांचा हटके असा संग्रह आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात नववधूची लग्नातील साडी म्हणजे कांजीवरम. अलीकडे महाराष्ट्रातही नववधूच्या साड्यांमध्ये कांजीवरम साड्यांचा ट्रेंड दिसतो. या साडीत प्रामुख्यानं मलबेरी सिल्कचा धागा वापरतात. साडीत वापरण्यापूर्वी हा धागा तांदळाच्या पाण्यात बुडवून वाळवला जातो; जेणेकरून तो चिवट आणि मजबूत होतो. मलबेरी सिल्कसोबत एक खास ‘जर’ वापरतात. कांचीपुरम साडीचा मधला भाग, काठ आणि पदर वेगवेगळे विणले जातात. नंतर ते काठ आणि पदर मुख्य साडीला इतक्या सफाईदारपणे जोडले जातात, की संपूर्ण साडी अखंडच विणल्याप्रमाणे वाटते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

साडीच्या या वैशिष्ट्यामुळे काही सिनेतारकांचे ड्रेस डिझायनर खूप हटके अशा रंगसंगतीत काठ, पदर आणि मधली साडी कारागिरांना ऑर्डर देऊन बनवून घेतात. म्हणजेच, कांचीपुरम ही एक पारंपरिक साडी असली, तरी आपण तिला एक डिझायनर टच देऊ शकतो. कांजीवरमची खासियत म्हणजे रुंद आणि कॉन्ट्रास्ट काठ जे साडीच्या मधल्या रंगाला अजूनच खुलवतात. कांजीवरम साडीवरच्या नक्षीकामात दाक्षिणात्य मंदिरांमधील कोरीवकामाचा आणि पौराणिक संदर्भांचा प्रभाव दिसतो. या साडीला बऱ्याचदा टेम्पल बॉर्डरही असते. कधीकधी चौकटी किंवा पट्टे किंवा बुट्टेही विणलेले असतात. अशी ही खास कांजीवरम साडी आपल्याही साड्यांच्या खजिन्यात असावीच, नाही का?

कांचीपुरम की कांजीवरम?
कांजीवरम साडीचा इतिहास असा, की सोळाव्या शतकात कृष्णदेवराय राजाच्या कालखंडात तमिळनाडूमध्ये ‘देवंगास’ आणि ‘सालीगर’ नावाच्या विणकर जमाती येऊन स्थायिक झाल्या. हे रेशमी साड्या विणणारे कुशल कारागीर होते. त्यांनी कांचीपुरम इथं मलबेरी झाडाच्या पानांवर पोषण झालेल्या रेशमांच्या किड्यांनी बनवलेलं खास ‘मलबेरी सिल्क’ आणि गुजरातची दर्जेदार ‘जर’, या दोन गोष्टींचा सुंदर मिलाफ करून अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा साड्या विणायला सुरुवात केली. त्यांनी विणलेल्या या साडीलाच, त्या ठिकाणच्या नावावरून ‘कांचीपुरम साडी’ असं नाव रूढ झालं. हीच साडी आता ‘कांजीवरम साडी’ या नावानं देखील प्रसिद्ध आहे. या साडीमुळेच, कांचीपुरम शहराला ‘रेशमाची राजधानी’ अशी ओळख प्राप्त झाली आहे. २००५ मध्ये सरकारकडून या साडीला ‘भौगोलिक स्थानदर्शक’ हे प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आलं आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Rashmi Vinod Satav on Kanjivaram saree