
अभिनेता अशोक फळदेसाई आणि अभिनेत्री विदुला चौगुले या दोघांचीही कलर्स मराठी वाहिनीवरची ‘जीव झाला येडापिसा’ ही पहिलीच मालिका. या मालिकेतून त्यांनी सिद्धी आणि शिवा बनून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आणि आपली छाप पाडली. या दोघांची पहिली भेट ही या मालिकेच्या ऑडिशनच्या वेळी झाली होती. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना विदुलाने एक गमतीशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, ‘‘मी या मालिकेच्या ऑडिशनला आले होते, तेव्हा शिवा या भूमिकेसाठी अशोकचं कास्टिंग आधीच झालं होतं.
अभिनेता अशोक फळदेसाई आणि अभिनेत्री विदुला चौगुले या दोघांचीही कलर्स मराठी वाहिनीवरची ‘जीव झाला येडापिसा’ ही पहिलीच मालिका. या मालिकेतून त्यांनी सिद्धी आणि शिवा बनून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आणि आपली छाप पाडली. या दोघांची पहिली भेट ही या मालिकेच्या ऑडिशनच्या वेळी झाली होती. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना विदुलाने एक गमतीशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली, ‘‘मी या मालिकेच्या ऑडिशनला आले होते, तेव्हा शिवा या भूमिकेसाठी अशोकचं कास्टिंग आधीच झालं होतं. सिद्धी या भूमिकेच्या ऑडिशनच्या वेळी अशोक तिथं उपस्थित होता आणि तो ऑडिशनला येणाऱ्या मुलींची माहिती वगैरे लिहिण्याचं काम तिथं बसून करत होता- कारण त्या वेळी तो या मालिकेच्या प्रॉडक्शन टीमचा एक भाग होता. त्यानंतर सिद्धीच्या भूमिकेसाठीचे आमचे वर्कशॉप्स साधारण आठवडाभर चालले आणि ते ७-८ दिवस वेगवेगळ्या पातळ्यांवर आमच्या ऑडिशन झाल्या. त्या दिवसांत आमची ओळख झाली.’’
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विदुलाच्या स्वभावाविषयी अशोक म्हणाला, ‘‘विदुला वयानं लहान आहे; पण ती खूप मॅच्युअर आहे. तिला सीन्स माझ्यापेक्षा चांगले कळतात असं मी म्हणेन. ती खूप मन लावून काम करते. सुरुवातीच्या दिवसांत एक इमोशनल सीन होता आणि तो तिनं खूप छान केला होता. मी आतापर्यंत अनेक नाटकं केली; परंतु अशा प्रसंगी डोळ्यांतून पाणी येणं हे फार अवघड असतं आणि सगळ्यांनाच इतकं पटकन जमत नाही. तेव्हा मी तिच्या कामानं प्रभावित झालो. बाकी सेटवर ती खूप छान असते. सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. विदुलाला तिच्या आयुष्यात आलेला प्रत्येक माणूस कायम सोबत राहावा असं वाटत असतं. एखादा माणूस वाईट वागत असेल, तर त्यामागे काहीतरी कारण असेल, हे ती समजून घेते. हा विदुलाचा गुण सिद्धीशी मिळताजुळता आहे.”
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अशोकच्या स्वभावाबद्दल विदुला म्हणाली, ‘‘अशोक हा प्रॉडक्शनमध्ये असल्याने मी त्याला सर म्हणायचे. नंतर मला कळलं, की हा प्रमुख भूमिका साकारतोय आणि मग त्या सरचं ‘अशोक’ झालं. मग सेटवर आम्ही मजा मस्ती करायला लागलो. अशोकचा मला आवडणारा गुण म्हणजे त्याचं सगळ्यांशी पटतं. प्रत्येक व्यक्तीशी तो खूप छान वागतो. अभिनेता म्हणून तो माझ्यापेक्षा फार अनुभवी आहे. त्यानं अनेक नाटकांत भूमिका केल्या आहेत. त्याविषयी आमच्या भरपूर गप्पा होतात. तो नेहमीच त्याचे अनुभव माझ्याशी शेअर करत असतो. त्याचं वाचन खूप आहे. यासोबत तो मलाही मी काय वाचलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करत असतो.”
मालिकेतल्या भूमिकेबाबत अशोक म्हणाला, ‘‘गेले अनेक महिने मी शिवा ही भूमिका साकारत आहे. शिवानं मला संयम बाळगायला शिकवला, जास्त समजूतदार बनवलं आणि शांतपणे विचार करून निर्णय घ्यायला शिकवलं.’’ विदुला तिच्या भूमिकेबद्दल म्हणाली, ‘‘मालिकेत सिद्धी आता गरोदर झाली आहे. खऱ्या आयुष्यात आतापर्यंत माझ्या ओळखीत मी कधीच गरोदर बाईला जवळून पाहिलं नाहीये. त्यामुळे आता माझ्यासाठी ही भूमिका आणखी थोडी आव्हानात्मक असणार आहे.’’
(शब्दांकन : राजसी वैद्य)
Edited By - Prashant Patil