video : स्तन्यपान आणि घ्यायची काळजी

डॉ. अमोल अन्नदाते 
Friday, 31 January 2020

पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये दर दोन-तीन तासांनी व रात्री चारवेळा स्तन्यपान द्यावे. त्यानंतर सहसा बाळ रडेल तेव्हाच व ४ ते ६ तासांनी स्तन्यपान करावे.

दूध बाहेर काढण्याची पद्धत :
स्तनांमध्ये दुधाचा साठा जास्त होत असल्यास दूध बाहेर काढणे हितावह असते. त्यामुळे अशक्त बाळाला हेच दूध, वाटी-चमच्याद्वारे पाजता येते. दूध काढल्यामुळे छातीतून दूध कमी होते व दूध बनण्याची क्रिया चालू राहते; तसेच कामावर जाणाऱ्या स्त्रिया हे दूध साठवून ठेवू शकतात आणि ते नंतर पाजू शकतात. साठवलेले दूध खोलीच्या तापमानाला सहा तासांपर्यंत व फ्रिजमध्ये ४ डिग्री सेल्सिअस तापमानाला २४ तासांपर्यंत चांगले राहते. फ्रिजमधून काढल्यावर दूध तापवण्याची गरज नसते. त्यापेक्षा रूम तापमानाला ठेवले की, त्याचे तापमान नॉर्मल होते. छातीतून दूध हाताने काढता येते किंवा त्यासाठी ब्रेस्ट पंपचाही वापर करता येईल.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाळाला किती वेळा पाजावे : 
पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये दर दोन-तीन तासांनी व रात्री चारवेळा स्तन्यपान द्यावे. त्यानंतर सहसा बाळ रडेल तेव्हाच व ४ ते ६ तासांनी स्तन्यपान करावे. रात्री २ ते ३ वेळा स्तन्यपान दिले तरी पुरे. ६ महिन्यांपर्यंत स्तन्यपान सुरू असेपर्यंत बाळाला पाणी किंवा इतर कुठल्याही गोष्टीची गरज नसते. अगदी कडक उन्हाळ्यातही स्तन्यपान करणाऱ्या बाळाला पाण्याची गरज नाही.

बाळाला स्तन्यपानानंतर नीट थापटले नाही, तर उलट्या होऊ शकतात. थोपटण्यासाठी बाळाला उभे धरून त्याचे तोंड आपल्या कानाजवळ येईल अशा प्रकारे आपल्या छातीच्या एका बाजूला धरावे. त्यानंतर त्याला आवाज येईल इतपत उभ्या हाताने थोपटावे. बाळ दूध पिताना सुरुवातीला जोरात आणि घाईने दूध पिते. नंतर हळू रमत गमत पिऊ लागते. सुरुवातीचे घाई ने पिणे संपले की, एकदा आणि त्यानंतर वेळ घेत पिणे संपल्यावर दुसऱ्यांदा असे दोन वेळा बाळाला थोपटावे लागते.  

स्तन्यपान करताना येणाऱ्या समस्या -
उलटे होऊन आत गेलेले स्तनाग्र (निपल)

निपल आत गेलेले असतील तर बाळाला दूध नीट चोखता येत नाही. त्यासाठी सिरींज समोरच्या भागात कापून, उलट्या बाजूने आतला पंप टाकून, कापलेल्या पुढच्या बाजूमध्ये निपल ठेवून दुसऱ्या बाजूने पंपाने ओढून सरळ करता येते. 

निपलला चिरा पडणे -
बाळाचे ओठ निपलभोवती काळ्या भागाऐवजी निपलवर असतील आणि ते फक्त निपल चोखत असल्यास निपलला चिरा पडतात. नंतर बाळ पीत असताना निपल दुखते व आग होते. साबण व पाण्याने वारंवार धुतल्याने किंवा बाळ पीत असताना ओढून बाजूला करतानाही निपलला चिरा पडू शकतात. यासाठी सर्वोत्तम औषध म्हणजे बाळाचे स्तन्यपान संपत असतानाचे येणारे दूध. हे आईचे स्वत-चे दूध चिरा पडलेल्या निपलला लावणे. नंतर थोडा वेळ टेबल फॅनच्या हवेत ते निपल वाळू देणे. चिरा पडलेल्या असताना निपल वारंवार धुवू नये.

स्तन भरणे व दुखणे -
यासाठी बाळाला नियमित स्तन्यपान द्यावे. स्तनांना गरम पॅक्सचा शेक द्यावा व दूध मसाज करून किंवा पंपाने काढून टाकावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Amol Annadate article Breastfeeding and care