video : जन्मानंतर बाळाला कावीळ झाल्यास काय काळजी घ्यावी....

डॉ. अमोल अन्नदाते
Friday, 17 January 2020

कावीळ कुठल्या दिवशी कुठल्या पातळीच्या वर गेली, की उपचार सुरू करायचे याचे गणित ठरलेले आहे. कावीळ झालेल्या सर्व नवजात बालकांपैकी पाच ते दहा टक्के बालकांना उपचाराची गरज पडते.

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
जन्मानंतर पहिल्या आठवड्यात जवळपास ६० टक्के बालकांना कावीळ होतेच; पण नवजात बालकाला होणाऱ्या काविळीला प्रत्येकवेळी उपचाराची गरज असतेच असे नाही. कावीळ कुठल्या दिवशी कुठल्या पातळीच्या वर गेली, की उपचार सुरू करायचे याचे गणित ठरलेले आहे. कावीळ झालेल्या सर्व नवजात बालकांपैकी पाच ते दहा टक्के बालकांना उपचाराची गरज पडते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या महिन्यात होणाऱ्या काविळीला नॉर्मल कधी म्हणायचे आणि उपचार कधी करायचे, हे समजून घेऊयात. नऊ महिन्यानंतर जन्मलेल्या बाळामध्ये तीन दिवसांनंतर कावीळ दिसू लागते, तिसऱ्या दिवशी सर्वाधिक असते आणि दहा ते बारा दिवसांपर्यंत आपोआप कमी होते. नऊ महिन्यांच्या आधी जन्मलेल्या बाळांमध्ये हे दिवसांचे गणित पुढे-मागे होते आणि कावीळ पंधरा दिवसापर्यंत लांबते. हा झाला काविळीचा नॉर्मल प्रवास. रक्तातील बिलीरुबीनची पातळी तपासून कावीळ नेमकी किती आहे, हे ओळखता येते. बिलीरुबीनची पातळी पहिल्या दिवशी ५, दुसऱ्या दिवशी १० व त्यानंतर कधीही १५च्या पुढे गेली, तर कावीळ नॉर्मल न राहता त्यासाठी उपचार सुरू करावे लागतात. मोठ्या व्यक्तीप्रमाणे बाळाची कावीळ डोळ्यांत बघत नाहीत. पूर्ण शरीरावर कावीळ दिसते, पण ती नेमकी किती आहे हे ओळखण्यासाठी रक्ताच्या तपासणीला पर्याय नाही.

नॉर्मल असलेली बिलिरुबीनची पातळी थोडीफार वाढल्याने कावीळ होते. शिवाय आई व बाळाच्या रक्तगटात तफावत असेल किंवा इतर कुठल्याही कारणाने बाळाच्या शरीरात रक्तस्राव झाल्यास किंवा बाळाला जंतुसंसर्ग झाल्यास कावीळ वाढते. कावीळ झालेले बाळ दूध कमी पीऊ लागते, त्याच्या हालचाली मंदावतात. बाळ शी व शू कमी प्रमाणात करू लागते. शरीर पिवळसर दिसू लागते. 

कावीळसाठी उपचाराचा मुख्य मार्ग म्हणजे बाळाला विशिष्ट प्रकारच्या निळ्या व पांढऱ्या लाइट खाली ठेवावे लागते. याला बालरोगशास्रात ‘फोटोथेरपी’ म्हणतात. या लाइटखाली ठेवताना डोळ्यांना व जननेंद्रियांना नीट झाकावे लागते. ‘फोटोथेरपी’ म्हणजेच लाइट खाली ठेवल्याने दोन-तीन दिवसांत कावीळ कमी होऊ लागते. आधी सांगितल्याप्रमाणे नॉर्मल असलेल्या काविळीला अशा उपचारांची गरज नसते. फोटोथेरपी सुरू असताना बाळाला अधूनमधून किंवा रडल्यास बाहेर काढून आईने पाजण्यास हरकत नसते. फोटोथेरपी चालू असताना बाळाला जुलाब होतात. याबद्दल काळजी करण्याचे कारण नसते; पण वेळोवेळी पाजून किंवा सलाइन देऊन बाळाच्या शरीरातील पाण्याची पातळी नॉर्मल ठेवणे गरजेचे असते.

काविळीची पातळी १८ ते २०च्या पुढे गेल्यास ती मेंदूसाठी घातक ठरू शकतो. अशा बाळाला वाढलेल्या काविळीमुळे झटके येऊ शकतात. अशा वेळी बाळाला लाइट देणे पुरेसे नसते, तर बाळाच्या शरीरातील रक्ताचा काही भाग काढून बाळाला चांगले रक्त द्यावे लागते.

प्रत्येक गरोदर स्त्रीच्या नवजात बाळाचा रक्तगट तपासून घ्यावा. आईचा रक्तगट आर. एच. निगेटिव्ह असल्यास त्या बाळाला काविळीचा धोका जास्त असतो व त्याच्यावर काविळीसाठी जास्त लक्ष ठेवावे लागते. तसेच असे झाल्यास पुढे जन्माला येणाऱ्या दुसऱ्या बाळाची कावीळ टाळण्यासाठी आईला पहिल्या बाळाच्या जन्मानंतर लगेच अॅन्टी-डी हे इंजेक्शन द्यावे लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Amol Annadate article Jaundice