बालकांचे अवघड जागेचे दुखणे 

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ 
Saturday, 25 April 2020

मुलांमध्ये दोन्ही बाजूला बीजांडे एका कातडीने तयार झालेल्या भागात असतात. या बीजांडांना टेस्टीज, तर ते असतात त्या भागाला स्क्रोटम म्हणतात. 

मुलांमध्ये दोन्ही बाजूला बीजांडे एका कातडीने तयार झालेल्या भागात असतात. या बीजांडांना टेस्टीज, तर ते असतात त्या भागाला स्क्रोटम म्हणतात. साधारण जन्म होताना ही बीजांडे स्क्रोटममध्ये खाली येतात आणि दोन्ही बाजूला हाताला लागतात व फुगवट्याच्या रूपाने बाहेरूनही दिसतात. जन्माच्या वेळेला ४.५% मुलांमध्ये बीजांडे खाली येत नाहीत, तर ९ महिन्यांआधी जन्माला येणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ३०% असते. अशावेळी घाबरून जाण्याचे कारण नाही. वयाच्या चौथ्या महिन्यापर्यंत ही बीजांडे आपोआप खाली येतात. म्हणून आधी जन्मावेळी बाळाची बीजांडेखाली आली आहेत का, याची तपासणी करून घ्यावी. नसतील तर परत चार महिन्याला करून घ्यावी. चौथा महिना संपेपर्यंत जी बीजांडे खाली येत नाहीत, ती पुढे आपोआप खाली येण्याची शक्यता नसते व यासाठी उपचारच करावे लागतात. काहीवेळेला चौथ्या महिन्याला खाली येऊनही ही बीजांडे वर जातात. अशावेळीही उपचारांची गरज असते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीजांडे खाली न आल्यास काय होते?– 
- स्क्रोटममध्ये नसून वर असलेल्या बीजांडांमध्ये कॅन्सरची शक्यता जास्त असते. 
- निसर्गाने बीजांडे शरीराच्या बाहेर लटकत्या स्थितीत ठेवण्याचे काही कारण आहे. बीजांडांमध्ये वीर्य उत्पादन होत असते. वीर्योत्पदनासाठी शरीरापेक्षा दोन-तीन डिग्री कमी तापमान आवश्यक असते. त्यामुळे बीजांड शरीराबाहेर खाली वेगळे ठेवले आहे. म्हणून खाली न उतरलेले बीजांड वीर्य तयार करू शकत नाही व यामुळे पुढे वंध्यत्वाच्या समस्या येऊ शकतात. 
- खाली न उतरलेल्या बीजांडाला मार लागू शकतो, तसेच ते स्वतःभोवती फिरून पीळ बसल्याने टॉरशन नावाची गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामुळे हर्नियाची शक्यताही वाढते. 
- खाली न उतरलेल्या बीजांडामुळे मुल मोठे झाल्यावर याचे मानसिक परिणाम होऊ शकतात. 

उपचाराची योग्य वेळ 
सहा महिन्यानंतर लगेचच याचे उपचार करता येतात. एका शस्त्रक्रियेद्वारे बीजांड खाली स्क्रोटममध्ये आणण्यात येते व तिथून परत वर जाऊ नये असा उपाय केला जातो. सहसा ९ ते १५ महिन्यांपर्यंत ही शस्त्रक्रिया केली जाते. 

शस्त्रक्रियेला उशोर केल्यास 
चार महिन्यांपर्यंत खाली न आलेले बीजांड पुढेही येणार नाही व त्यासाठी शस्त्रक्रियाच लागते, हे सांगूनही ऑपरेशन टाळण्यासाठी पालक अनेक डॉक्टरांना सांगत असतात. कुठलातरी डॉक्टर शस्त्रक्रिया नको, हे सांगेल ही पालकांना आशा असते. काहीजण कुठल्या औषधांचा प्रयोगही करून बघतात, पण यासाठी शस्त्रक्रियाच करावी लागते. १५ महिन्यांनंतर उशीर केल्यास याचे बीजांडावर दुष्परिणाम होतात. बीजांड नंतर खाली घेतले तरी, त्याची वीर्योत्पादनपाची क्षमता कमी होते. तसेच इतर गुंतागुंतीचे प्रमाणही वाढते. म्हणून खाली न येणाऱ्या बीजांडांच्या उपचारांना उशीर करू नये. पण १५ महिन्यांनंतर शस्त्रक्रिया करावीच लागते. कारण थोड्या प्रमाणात वीर्योत्पदानासाठी खाली घेतलेल्या बीजांडाचा उपयोग होतो. याशिवाय कॅन्सर व इतर गुंतागुंत टाळण्यासाठीही शस्त्रक्रिया करावीच लागते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. amol annadate writes about Ovule