श्वास रोखून धरण्याची सवय 

श्वास रोखून धरण्याची सवय 
Updated on

रडत असताना श्वास रोखून धरण्याची सवय ६ महिन्यांपासून ते १८ महिन्यांपर्यंतच्या मुलांना असते. सहसा हट्टी मुले आपल्या मनाप्रमाणे गोष्टी न झाल्यास, एखादे खेळणे किंवा गोष्ट हवी असल्यास सतत रडून असे करतात. याला वैद्यकीय भाषेत ‘ब्रेथ होल्डिंग स्पेल’ असे म्हणतात. 

कारणे 
आपल्या शरीरात अंतर्गत अवयवांवर नियंत्रण ठेवणारे आणि मेंदूला ‘लढावे की पळावे’ हा निर्णय घेण्यास मदत करणरे एक नसांचे जाळे असते. याला ‘ऑटॉनॉमिक नर्व्हस सिस्टम’ असे म्हणतात. लहान मुलांमध्ये ही अजून विकसित झालेली नसल्याने त्यांना राग आल्यावर कसेवागावे, हे नीट कळत नाही. पालकांवर अधिक दबाव टाकण्यासाठी ते अजाणतेपणाने मोठे व लांब उसासे घेऊन रडू लागतात, पण असे करताना एखाद्या लांबलेल्या उसाशाने त्यांचा श्वास अडखळतो आणि तो तसाच रोखलेला राहतो. यामुळे मुलगा बेशुद्ध होऊन काळानिळा पडतो. यात मेंदूला काहीवेळ रक्तप्रवाह खंडित झाल्यामुळे झटके येऊ शकतात. तोंडातून फेस येऊ शकतो. या मानसिक कारणांसोबतच श्वास रोखून धरणाऱ्या मुलांमध्ये शरीरात लोहाची (आयर्न) कमतरता असते. 

मुलांनी श्वास रोखण्याची कारणे 
सहसा असे करणारी मुले एकुलती एक किंवा दोन असल्यास इतरांपेक्षा अधिक लाडकी असतात. पहिल्यांदा श्वास रोखून धरल्यावर मूल कितीही लहान असले तरी त्याला हे कळते, की असे केल्यावर पालक घाबरतात व नंतर हवे ते देतात. म्हणून याचा वापर मुलाकडून हवे ते मिळवण्यासाठीही होऊ लागतो. 

उपचार 
पालकांनी घाबरून न जाता खंबीर राहणे तसेच श्वास रोखून धरण्याची सवय ही तात्पुरती आहे, हे ओळखणे सर्वांत महत्त्वाचे. याने मुलाच्या जीवाला कुठलाही धोका नाही, तसेच श्वास रोखून धरल्यावर झटके आल्यास पुढे आयुष्यात झटके येत नाहीत. हे पालकांनी समजून घेतले नाही, तर या सवयीमुळे घाबरलेल्या पालकांचे मुलांकडून मानसिक, भावनिक ब्लॅकमेलिंग निश्चित आहे. 

पालकांनी पुढील गोष्टी कराव्यात 
- आपण घाबरलो आहोत, हे मुलाला मुळीच जाणवू न देणे. 
- मुलाचे कपडे सैल करणे. 
- घरच्यांनी मुलाभोवती गर्दी करून गोंधळ करू नये. 
- मुलाला सरळ करावं, शांततेत त्याच्या चेहऱ्यावरून ओला हात फिरवावा. 
- पायावर टिचकी मारून हलवून श्वास पुन्हा चालू करावा. 
- एकदा श्वास सुरू झाला की, दुर्लक्ष करून आपले इतर काम सुरू करावे. 
- मूल हट्ट करून श्वास रोखण्याची शक्यता वाटली की, आधी मुलाचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न करा. ते शक्य झाले नाही तर दुर्लक्ष करा. फक्त श्वास रोखून धरण्यास सुरुवात होते आहे का, यावर आपले घरातील काम मुलाच्या नकळत सुरू ठेवा. 
- श्वास रोखून धरल्यामुळे मुलाचा हट्ट पूर्ण करू नका. 
- यासाठी टाइम आउट ही कृती सुचवतो. खेळाताना एखादा खेळाडू चुकीचा खेळला की, त्याला थोडा वेळ खेळू देत नाहीत. तसाच मुलांचा श्वास पूर्ववत झाला की लगेचच १ ते ५ मिनिटे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे. 

औषधोपचार – 
लोहाचे (आयर्न) योग्य डोसामध्ये तीन ते सहा महिने द्यावे लागते. 
वाढविकास तज्ज्ञ डॉ. अंजली बँगलोर अशा पालकांना समुपदेशन करताना नेमके हे शब्द वापरतात – 
‘तुम्ही फार प्रेमळ पालक आहात आणि तुमचा मुलगा चतुर, हुशार आहे. त्याला घरात राजासारखे वागायचे आहे आणि तुम्हाला प्रजा बनवायचे आहे. तुम्ही आज्ञा पाळली नाही म्हणून मुलाने तुम्हाला दिलेली शिक्षा म्हणजे श्वास रोखून धरणे. तुम्हाला दुर्लक्ष करून घरात कोणीही राजा प्रजा नसून, सर्व सदस्य समान आहेत ही भावना प्रस्थापित करावी लागेल.’ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com