लहान मुलांमधील खोकला 

डॉ. अमोल अन्नदाते
Saturday, 27 June 2020

बालरोगतज्ज्ञांच्या बाह्यरुग्ण विभागात ६० टक्के रुग्ण खोकल्याचे असतात.आम्ही बालरोगतज्ज्ञ खोकल्याचे निदान करताना आमची विचार प्रक्रिया काय असते, हे आईने समजून घेतल्यास आईची काळजी कमी होते. 

बालरोगतज्ज्ञांच्या बाह्यरुग्ण विभागात ६० टक्के रुग्ण खोकल्याचे असतात. खोकला आईसाठी खूप काळजीत टाकणारे लक्षण. त्यातच काही वेळा खोकला बरेच आठवडे जात नाही. त्यामुळे आम्ही बालरोगतज्ज्ञ खोकल्याचे निदान करताना आमची विचार प्रक्रिया काय असते, हे आईने समजून घेतल्यास आईची काळजी कमी होते. त्यासाठी घरी खोकल्याबद्दल बाळाचे नीट निरीक्षण करून आईने डॉक्टरांना त्याचा वैद्यकीय इतिहास समजून सांगावा. म्हणजे योग्य निदान होऊन योग्य उपचार मिळतात. 

यासाठी आईने डॉक्टरांकडे जाताना पुढील गोष्टींची नोंद करून घ्यावी - 
- खोकला अचानक सुरू झाला की हळूहळू? 
- खोकला नुकताच सुरू झाला की जुना आहे? 
- ओला आहे की कोरडा? 
- ताप आहे की नाही? 
- सर्दी आहे की नाही? 
- सोबत इतर लक्षणे काय आहेत? 
- दिवसाच्या कोणत्या वेळेला खोकला येतो? 
- खोकला वारंवार येतो का? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रश्‍नांची उत्तरे मिळाल्यावर अगदी गणिती पद्धतीने खोकल्याचे निदान करता येते. 
- कोरडा खोकला + सर्दी – ताप (म्हणजे तापाशिवाय फक्त सर्दी आणि खोकला) = सहसा अॅलर्जी. 
- कोरडा खोकला + सर्दी + ताप = विषाणूजन्य व्हायरल सर्दी खोकला. 
- कोरडा खोकला + इतर भागाची लक्षणे, उदाहरणार्थ जुलाब = शरीरात विषाणू संसर्ग – व्हायरल इन्फेक्शन. 
- व्हायरल सर्दी व ताप गेला, पण खोकला जात नाही, श्‍वास घेतला की खोकला येतो – व्हायरल सर्दी खोकल्यामुळे श्‍वसनाचा वरचा भाग संवेदनशील झाल्यामुळे येणारा खोकला. हा बऱ्याचदा तीन ते चार आठवडेही चालतो व आपोआप कमी होतो. 
- हा खोकला ओला झाला तर – कदाचित बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले आहे. 
खोकल्यासोबत जास्त प्रमाणात ताप, श्‍वास घेण्यास त्रास, बाळ जेवण करत नाही व अस्वस्थ वाटते – न्यूमोनिया. 

खोकल्याच्या वेळेवरून कारणे - 
-झोपल्यावर अर्ध्या ते एक तासाने खोकला येऊन बाळ उठते, खोकला आल्यामुळे नीट झोप लागत नाही व दुपारी झोपले तेव्हाही असे होते – नाकातील सर्दी खाली घशात पडत असल्याने खोकला – याला पोस्ट नेझल ड्रीप असे म्हणतात. 
- मध्यरात्री दोननंतर, पहाटे चारच्या सुमारास व संध्याकाळी खोकला येणे – बाल दमा/अॅलर्जीमुळे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कसा सुरू झाला यावरून कारणे - 
- बाळ आधी नॉर्मल होते व एकदम ठसका लागून खोकला सुरू झाला – घशातून फुफ्फुसात कुठली तरी गोष्ट जाणे. (फॉरेन बॉडी) 
- हळूहळू सुरू होणे – विषाणूजन्य व्हायरल सर्दी खोकला, न्यूमोनिया. 
- ३-४ आठवडे लांबलेला खोकला – डांग्या खोकला/व्हायरल सर्दी खोकल्यानंतर श्‍वसन मार्गाची संवेदना वाढल्यामुळे येणारा खोकला. 

यापलीकडे अजून एक कारण असते जे निदान करण्यास अजून खोलात जाऊन इतिहास घ्यावा लागतो, तो म्हणजे कुठल्याही आजार/संसर्गामुळे नसलेला मानसिक कारणामुळे येणारा खोकला - 

यात मूल डॉक्टरांच्या केबिनमध्ये/रिसेप्शनमध्येच जास्त खोकते, खोकला वरवरचा जाणवतो/इतर वेळी खेळताना/टीव्ही बघताना खोकला येत नाही. पालकांनी बघितले व खोकल्याविषयी विचारले तरच खोकला येतो व बाळाला कुठला तरी तणाव असतो. या खोकल्याला फक्त समुपदेशनाची गरज असते. 

पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr amol annadate writes article about Cough in children