esakal | तापदायक ‘ताप’ 
sakal

बोलून बातमी शोधा

तापदायक ‘ताप’ 

तापाचे पूर्ण निदान होण्यासच कधी कधी चार ते पाच दिवस लागतात. तापाचा पॅटर्न व सोबतची लक्षणे पुढे येण्यास वेळ लागतो. म्हणून तापाचे उपचार करताना तापाला घाबरून जाऊ नये, धीर धरावा. 

तापदायक ‘ताप’ 

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते

अंग गरम असल की ताप आला अस पालकांना वाटत. परंतु ताप मोजल्याशिवाय व तो कसा किती काळ टिकतो हे पहिल्याशिवाय ताप आला आहे, असे म्हणता येत नाही. 

ताप म्हणजे नेमकी काय? 
ताप हा शत्रू नसून, एकाप्रकारे मित्र असतो. शरीरात कुठला तरी संसर्ग सुरू झाला असल्याची सूचना देणारा सुरक्षारक्षकच असतो. शरीर संसर्गाविरुद्ध लढत असल्याचे ते द्योतक असते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

किती तापमान म्हणजे ताप? 
ताप मोजण्यासाठी थर्मामीटर उपलब्ध असतात. सध्या घरोघरी इन्फ्रारेड थर्मामीटर उपलब्ध आहेत. याचा वापर नेमका कसा करायचा हे डॉक्टरांकडून शिकून घ्यावे. ६ डिग्री फॅरनहाईट असले, तरी एखाद्या दिवशी ९९.५ ते १००पर्यंत तापमान नॉर्मल असू शकतो. ताप किती येतो यापेक्षा तो किती दिवस येतो, कसा जातो व त्यासोबत काही लक्षणे काय आहेत हे महत्त्वाचे असते. ताप १००च्या पुढे दोन दिवस असल्यास बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. 
९६.८ – ९९.५ – नॉर्मल 
९९.५ – १०२.२ – ताप 
१०२.२ च्या पुढे – खूप जास्त ताप 

ताप आल्यास पुढे काय? 
ताप शक्यतो अंगात ठेवू नये. ताप अंगात राहिल्यास ६ महिने ते ५ वर्ष या वयोगटात तापात झटके येण्याची शक्यता असते. प्रत्येकाच्या घरात तापाचे पॅरॅसिटॅमॉल हे औषध असले पाहिजे. १५ मिलिग्रॅम प्रती किलोग्रॅमप्रमाणे एका वेळेला पॅरॅसीटॅमॉल द्यावे. ५ एमएलमध्ये किती मिलिग्रॅम आहे, हे औषधाच्या बाटलीवर लिहिलेले असते. ते बघून न घाबरता पॅरासिटॅमॉल द्यावे. पॅरासिटॅमॉलचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. पॅरासिटॅमॉलसोबत इतर आयब्यूप्रोफेन किंवा अन्य कुठले ही औषध एकत्रित वापरू नये. पॅरासिटॅमॉल दिल्यावर ताप जाण्यास एक तासासाठी वाट बघा. या औषधासोबतच बाळाचे अंग पाण्यात बुडवलेल्या कपड्याने पुढून मागून, काखेत चेहऱ्यावर असे पुसून घ्यावे. अंग ओल्या कपड्याने पुसणे ही औषधासोबतच एक परिणामकारक पद्धत आहे. औषध दिल्यावर थंडी वाजत नसल्यास बाळाला उघडे ठेवावे, पाणी पाजावे. ताप आलेले बाळ असलेल्या खोलीत हवा खेळती ठेवा व दार, खिडक्या उघडे ठेवा. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तापासोबत इतर चाचपणी 
पुढील लक्षणे असल्यास तातडीने बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
१) बाळ जास्त झोपेत राहते आहे. 
२) बाळ खेळत नाही. 
३) बाळ नेहमीपेक्षा कमी लघवी करते, दिवसातून ६ वेळा पेक्षा कमी. 
४) बाळ जेवण करत नाही. 

तापासाठी डॉक्टरकडे जाताना 
१) ताप कधीपासून आहे? 
२) तो किती वाजता येतो व किती असतो याची नोंद ठेवून डॉक्टरांसमोर तो कागद ठेवा. 
३) तापासोबत सर्दी, खोकला, लघवी करताना जळजळ, पोटदुखी, जुलाब, उलट्या यापैकी कुठली लक्षणे आहेत व कधीपासून आहेत हे नीट सांगा. 

तापाबद्दल गैरसमज 
१) डोक्यावर पट्या ठेवल्याने ताप उतरत नसतो. डोक्यावर पट्टी ठेवून ताप जातो हा चित्रपटांमुळे पसरलेला गैरसमज आहे. 
२) ताप कमी करण्यासाठी इंजेक्शन देण्याची गरज नसते. 
३) तापामध्ये कुठले पाणी, अन्न, दूध वर्ज्य नसते. 

तापासाठी उपचार सुरू केल्यावर लगेचच ताप जात नाही. कधी आजार बरा होतो, तरी ताप राहतो व तो नंतर जातो. तापाचे पूर्ण निदान होण्यासच कधी कधी चार ते पाच दिवस लागतात. तापाचा पॅटर्न व सोबतची लक्षणे पुढे येण्यास वेळ लागतो. म्हणून तापाचे उपचार करताना तापाला घाबरून जाऊ नये, धीर धरावा. 

loading image