वुमन हेल्थ  : रोम रोमातुनी... 

women-health
women-health

आपल्याला कोणत्याही गोष्टीने अतिशय आनंद झाल्यास अंगावर रोमांच फुलतात. म्हणजेच आनंद-उत्सुकता याने शरीरावरील केस उभे राहतात. मात्र, शरीरावर नको तेथे रोम म्हणजे केस उगवू लागल्यास स्त्रियांसाठी ते काळजीचे आणि लज्जेचे कारण बनते. सर्वच स्त्रियांना चेहऱ्यावर, शरीरावर बारीक लव असतेच, पण त्याचा रंग अतिशय फिका आणि स्पर्श मुलायम असतो. नको असलेले केस स्पर्शाला जाडसर आणि रंगाने गडद असतात. असे केस शरीरावर उगवण्याचे कारण म्हणजे ‘हिरसूटीझम’ नावाची अवस्था. नको असलेले केस प्रामुख्याने चेहरा, हात, पाठ, छाती, ओटीपोट अशा ठिकाणी उगवतात. असे केस असणाऱ्या महिलांमध्ये पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण अधिक असते. हा विकार ५ ते १० टक्के महिलांना असतो. याने अपाय नसला, तरी स्त्री एकदम अवघडल्यासारखी होते आणि हार्मोन्सचे संतुलन बिघडलेलेच राहिल्यास स्वास्थ्यावर परिणाम होतो. 

अनावश्यक केस उगवण्याची कारणे : 
- अँड्रोजनची व टेस्टोटेरॉनची निर्मिती आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्यास अनावश्यक केस उगवतात. काही वैद्यकीय कारणांमुळे अँड्रोजनची पातळी वाढते. याने पुरुषांसारखे केस येणे किंवा आवाज घोगरा होणे, असे बदल होतात. 

- पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हे हिरसूटीझमचे एक नेहमीचे कारण आहे. अंडाशयावरील सिस्टमुळे हार्मोन्सच्या निर्मितीत बदल होऊन पाळी अनियमित होते, प्रजनन क्षमता कमी होते, मुरूमे येतात आणि वजन वाढते, तसेच अनावश्यक केसही येतात. 

- अड्रेनाल ग्रंथीत बिघाडामुळेही हार्मोन्सच्या पातळीत असंतुलन निर्माण होते. अड्रेनल ट्युमर, हायपरप्लासिया तसेच कुशिंग विकार हे अड्रेनल ग्रंथींतील बिघाडामुळे होणारे काही विकार. प्रमाणाबाहेर वजन, डोकेदुखी, साखर कमी-जास्त होणे ही देखील अड्रेनल ग्रंथीच्या बिघाडाची लक्षणे आहेत. मात्र, ही कारणे क्विचित आढळून येतात. 

- मायनोक्सिडील, अनॅबोलिक स्टीरोईड, टेस्टोटेरॉन वाढवण्यासाठी घेतलेल्या पूरक औषधांमुळेही अनावश्यक केसांची समस्या उद्‍भवते. 

हिरसूटीझमचे निदान 
हिरसूटीझमचे निदान करताना डॉक्टर तुमचा वैद्यकीय इतिहास बारकाईने पाहतात. हार्मोन्सची पातळी बघण्यासाठी रक्ताची चाचणी सांगतात आणि अंडाशयाचे परीक्षण करण्यासाठी सोनोग्राफी किंवा ‘एमआरआय’देखील करायला सांगतात. 

अनावश्यक केसांच्या समस्येवर उपचार : 
तुमचे वजन जास्त असल्यास डॉक्टर तुम्हाला वजन कमी करायला सांगतील. जाडीमुळे हार्मोन्सच्या पातळीत असमतोल निर्माण होतो. वजन नियंत्रणात ठेवल्यास औषधाशिवायही अँड्रोजनची पातळी आटोक्यात राहते. पीसीओएस किंवा अड्रेनल बिघाडामुळे अनावश्यक केस आले असल्यास औषधोपचारांची गरज असते. संततीनियमनाच्या गोळ्या किंवा अँटीअँड्रोजन औषधे घेऊन हार्मोन्सचा समतोल राखता येतो. काही चिन्हे दिसल्यास तुमच्या डॉक्टरचा सल्ला अवश्‍य घ्या. 

केस काढून टाकणे : वॅक्स, शेव्ह, केस काढणारी क्रीम वापरून अनावश्यक केस काढता येतात, लेझर ट्रीटमेंटमध्ये लाईट रेज वापरून केस काढले जातात, तर इलेक्ट्रोलायसिसमध्ये विद्युत प्रवाहाद्वारे एक-एक केस काढला जातो. औषधांबरोबर हे उपचार केल्याने परिणाम लवकर मिळतो. 

अनावश्यक केसांची समस्या दूर व्हायला धीराने, दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. हार्मोन्सची पातळी आटोक्यात आणल्यावर हा प्रश्न सुटतो, पण बिघाड झाल्यास केस पुन्हा येतात. मुलींना अवघडल्यासारखे वाटून नैराश्य येते. म्हणूनच त्यांना समजून घेणे, धीर देणे व घरी किंवा बाहेर टिंगल न करणे गरजेचे आहे. शरीरामध्ये घडणाऱ्या या नैसर्गिक गोष्टी असून, मुले आणि मुलींनी हे बदल स्वीकारण्याची गरज आहे. कुटुंबातील व्यक्तींनीही समजून घेऊन धीर द्यावा. 

तुमच्या समस्येच्या कारणानुसार अल्पकालीन किंवा दीर्घकालीन उपचाराने या समस्येचे निराकरण नक्की करता येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com